आश्वासक वसा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
संघाच्या सरकार्यवाहपदाचे एवढे मोठे दायित्व आणि वेळेची टंचाई असताना भैय्याजींनी गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या तिरावरील प्रा. रविंद्र भुसारी यांच्या मूळ वसा गावाला आवर्जून भेट दिली. त्यांचा एक पूर्ण दिवस दिला. गावकर्‍यांशी आत्मीयतेने संवाद साधला. गावकर्‍यांनी पिकविलेल्या फळांचे कौतुक केले. गावकर्‍यांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटले. 
 
 
गडचिरोली जिल्ह्यात वसा गावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांना गावच्या सरपंच मंगलाताई भोयर आणि पंचायत समिती सदस्य जास्वंदा गेडाम यांनी फळांची परडी दिली. पारंपरिक पद्धतीने पिकवलेली टवटवीत फळे पाहून भैय्याजी चकित झाले. गावकर्‍यांनी पिकवलेली कलिंगड, भोपळा, टरबूज अशी फळे. त्याला भरपूर मागणी आहे. टरबूज विदेशात निर्यात होतात आणि 1750 लोकसंख्येच्या एवढ्याशा गावात परकीय चलन येते, हे सांगितल्यावर भैय्याजी समाधानाने हसले. ‘सेवा’ हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. ग्रामीण भागाबद्दल त्यांना विशेष आस्था आहे. संघाच्या सरकार्यवाहपदाचे एवढे मोठे दायित्व आणि वेळेची टंचाई असताना त्यांनी या गावाला आवर्जून भेट दिली. एक पूर्ण दिवस दिला. गावकर्‍यांशी आत्मीयतेने बोलले. त्यांनी पिकविलेल्या फळांचे कौतुक केले. गावकर्‍यांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटले.
 
 
वसा गाव गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा नदीच्या तीरावर वसले आहे. गडचिरोली हिरवा जिल्हा आहे. फार मोठी वनसंपदा आहे. बहुतेक वस्ती आदिवासी समाजाची. नक्षलवाद्यांमुळे हा जिल्हा बातम्यांमध्ये असतो. नक्षलवादी कारवाई घडली, तरच राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील प्रसिद्धीमाध्यमांचे इकडे लक्ष वळते. सरकारी यंत्रणेसाठीही हा जिल्हा सांभाळणे म्हणजे एक ‘लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन’ असते. माध्यमांनी जिल्ह्याचे असे काही रूप उभे केले आहे की, येथे सदासर्वकाळ केवळ हिंसाचार आणि गोळीबार होत असावा, असे वाटावे. सरकारी यंत्रणेला गडचिरोली पोस्टिंग आव्हानात्मक वाटते. कर्तव्य म्हणून बडे लोक जिल्ह्यात येतात, काम करून निघून जातात. माध्यमांमधील हे चित्रण किती एकांगी आहे, याचा अनुभव गेले आठ महिने घेत आहे.
 
 

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश संघटनमंत्रिपदाची जबाबदारी गेल्या वर्षी जुलैमध्ये सोडली. त्यानंतर आम्हा भुसारी कुटुंबाच्या वसा या मूळ गावी परतलो. नागपुरात शिक्षण, प्राध्यापकी, संघाचे काम, प्रचारक म्हणून प्रवास, संघटनात्मक घडामोडी, भाजपचा अनुभव, राजकारणाची धामधूम, 2014 चा ऐतिहासिक विजय, मोदीजींचे पंतप्रधानपद, राज्यात भाजपचे सरकार, देवेंद्रजी मुख्यमंत्री कितीतरी घटना, घडामोडी अनुभवल्या. या घटनांचा साक्षीदार झालो. काही वेळा त्यामधला घटकही. अशा पार्श्वभूमीवर आमच्या मूळ गावी परतणे म्हणजे पुन्हा मुळाशी जोडून घेणे. मी संघटनमंत्रीपद सोडून गावी परतण्याचा निर्णय घेतल्यावर माझ्याबद्दल आपुलकी असणार्‍यांना काळजी वाटली. इतकी वर्षे मोठ्या शहरात राहिल्यानंतर आणि समाजाचा मुख्य प्रवाह जवळून अनुभवल्यावर गावात कसे होणार? असे सर्वांना वाटले. वयाची साठ वर्षे पूर्ण झाली म्हणून संघटनमंत्रिपदाचे दायित्व सोडण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी संघातील वरिष्ठांची परवानगी घेतली. त्यांनीही आस्थेने विचारले,”एका छोट्या खेड्यात राहायला जमेल का?”
 
 
गावात आल्यावर मात्र मला धक्का बसला आश्चर्याचा, तोही सुखद. माध्यमांनी रंगवलेले चित्र आणि इथले वास्तव पूर्ण भिन्न होते. नितीनजी गडकरी कायम उल्लेख करतात, ‘परसेप्शन व्हर्सेस रिअ‍ॅलिटी,’ समज आणि वास्तवातील भेद. ऐकीव माहितीवर विसंबून राहू नये, तर आपण वास्तव जाणून घ्यावे. राजकारणात याची गरज पदोपदी जाणवते. माझ्या गावात राहायला आल्यानंतर मला याची वेगळ्या रितीने अनुभूती आली. गडचिरोली जिल्ह्याबद्दलच्या ऐकीव गोष्टी आधी कानावर आल्या होत्या. माध्यमांमुळे वेगळे ‘परसेप्शन’ निर्माण झाले होते. पण, आपल्या देशातील सामाजिक वास्तवाबद्दल आणि ग्रामीण भागाबद्दलही जे ऐकले, त्यापेक्षा भलतेच वेगळे अनुभवले. शेतकर्‍यांबद्दल, गावकर्‍यांबद्दल, आदिवासींबद्दल कसे चित्र निर्माण केले गेले आहे? लोक सहज बोलतात की, शहरे बकाल झाली आणि गावे ओसाड झाली. सगळीकडे नुसते दुःख आणि निराशा असल्याचे बोलतात. पण, गावांचे वास्तव काय आहे? शहराच्या मानाने आर्थिकदृष्ट्या गावाचा आकडा कमी असेल. तो लोकसंख्येचा असो, दरडोई उत्पन्नाचा असो, वीज वापराचा असो, इंटरनेट वापराचा असो, नाहीतर वैद्यकीय सुविधांचा असो पण, खेड्यातले जीवन भकास नसते. तेथे सर्व लोक एकमेकांना ओळखतात, मोठ्या कुटुंबाप्रमाणे राहतात, एकमेकांच्या आनंदात आणि दुःखात सहभागी होतात. लोकांना एकमेकांशी बोलायला, चौकशी करायला, गप्पा मारायला सवड असते आणि त्याची आवडही असते. भल्या पहाटे दिवस सुरू होतो. गावकरी-शेतकरी लगबगीने कामाला लागतात. पारंपरिक पद्धतीने जगतानाही पुरुषार्थ करतात. सरकारी यंत्रणेचा जनरेटर पाठीशी नसला तरीही निर्यात करण्याजोगी उत्पादने निर्माण करतात, जसे आमच्या गावातील शेतकर्‍यांनी भोपळे, कलिंगडे आणि टरबूज पिकवले. वसा गावात एक आगळी वेगळी प्रथा अनुभवली. एखाद्याच्या घरी निधन झाले तर भेटायला गेल्यावर तेथे ठेवलेल्या भांड्यात प्रत्येकाने आपल्या इच्छेनुसार आणि क्षमतेनुसार काही पैसे ठेवायचे. ज्याच्या घरी निधन होते, त्याला अंत्यसंस्कार आणि दिवस करण्यासाठी बराच खर्च होतो. अशा दुःखाच्या प्रसंगी आणखी बोजा त्याने कसा सोसावा? अशा वेळी दुःखातील माणसाला केवळ शब्दांचा दिलासा देण्याऐवजी काही ठोस मदत करावी, हा धडा प्रगतशील शहरी समाजाने ग्रामीण भागाकडून घेण्यासारखा आहे. अशा कितीतरी गोष्टी गावात अनुभवत आहे. वसा गाव व्यसनमुक्त, तंटामुक्त, हागणदारीमुक्त आहे. गावातील स्वच्छता अनुभवण्यासारखी आहे. पूर्वग्रह सोडून मोकळ्या मनाने पाहिले तर सर्व काही लख्ख दिसेल.
 
 
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी ‘एकात्म मानववाद’ मांडताना ‘चिती’ असा उल्लेख केला आहे. मनुष्याला जसा आत्मा असतो, तसाच समाजाचा आणि राष्ट्राचाही आत्मा असतो. त्यानुसार राष्ट्राचा स्वभाव बनतो. राष्ट्रामधील व्यवस्था, जीवनशैली, परंपरा यांची जडणघडण त्या स्वभावानुसार होते. राष्ट्राचा हा स्वभाव म्हणजे त्या राष्ट्राचा आत्मा असतो. त्याला शास्त्रकारांनी ’चिती’ म्हटले आहे. ‘चिती’ जन्मजात असते. तिच्या आधारे समाजाची निर्मिती होते. माझ्या वसा गावात मी या विचारांची अनुभूती घेत आहे. राष्ट्राप्रमाणे गावाचीही ‘चिती’ असते. वसा गावाचा आत्मा अद्याप दुर्बल झालेला नाही. म्हणून असेल कदाचित गडचिरोलीसारख्या व्यवस्थेने बाजूला टाकलेल्या जिल्ह्यात या गावात लोक गुण्यागोविंदाने राहतात. 
 
 
मा. भैय्याजींसारखी श्रेष्ठ व्यक्ती गावात येणार म्हणून उत्साहाचे वातावरण पसरले. तयारीच्या बैठका सुरू झाल्या. संघ किती मोठा आहे, जगातील सर्वात मोठी संघटना आहे, देशातील सर्वोच्च पदांवर संघाचे स्वयंसेवक आहेत, यामुळे हा उत्साह नव्हता. गावातल्या अनेकांना या बाबी ठाऊकही नाहीत. कोठेतरी आत्म्याचे नाते जुळलेले असते, त्यामुळे भैय्याजींचे स्वागत घरच्या पाहुण्याप्रमाणे करावे, असे वातावरण निर्माण झाले. ते आले, त्यावेळी त्यांच्या गाडीला मार्ग दाखविण्यासाठी गावाच्या वेशीवर एक तरुण हातात झेंडा घेऊन उभा होता. गावात सर्वांनी उत्साहाने त्यांचे स्वागत केले. गावातील मंदिरातील साईबाबांच्या प्रतिमेचे अनावरण भैय्याजींच्या हस्ते झाले. गुरुदेव सेवा मंदिराच्या सभागृहात त्यांनी गावकर्‍यांसोबत संवाद साधला. मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवनाथजी कुंभारे यांच्या उपस्थितीत या निमित्ताने ग्रामसभाच झाली. युवक, महिला, ज्येष्ठ असे सर्वजण उपस्थित होते. अत्यंत सहज संवाद सुरू होता. जगातील सर्वात मोठ्या संघटनेच्या दुसर्‍या क्रमांकावरील अधिकार्‍याशी आपण बोलतोय, याचे कोणतेही दडपण गावकर्‍यांच्या बोलण्यात नव्हते. एखादा मान्यवर नातेवाईक घरी आल्यावर त्याच्याशी बोलावे ते आदराने, पण ते आत्मियतेने बोलत होते. भैय्याजीही त्यांच्या सर्वपरिचित सहज संवादाने उपस्थितांची मने वाचत होते. एका आगळ्यावेगळ्या संवादाचा मी साक्षीदार झालो होतो. दुपारी भैय्याजींनी गाईला नैवेद्य दाखविला आणि सर्वांचे सहभोजन झाले.
 
 
इतका सहज आत्मीय संवाद झाला. गावाचे हे सांस्कृतिक संचित आहे. इथल्या पारंपरिक व्यवहारांमुळे असेल किंवा सर्वांनी मिळून मिसळून राहण्याच्या प्रवृत्तीमुळे असेल, गावकर्‍यांमध्ये वेगळा आत्मविश्वास असतो. सहजता असते. त्याच्या बळावरच टरबूज निर्यात करणार्‍या या गावातील तरुण-तरुणी जिल्हा सत्र न्यायाधीश, सरकारी वकील, आयआयटी कानपूरचे पीएचडी, लष्करामध्ये जवान, आदिवासी महिला पोलीस अधिकारी, मुख्याध्यापक अशा विविध स्थानावर गेले. यापूर्वी गावाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, स्वर्गीय सरसंघचालक रज्जूभैय्या, विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, भूदान चळवळीचे अग्रदूत आर. के. दादासाहेब पाटील, ज्येष्ठ गांधीवादी ठाकूरदास बंग यांनी भेट दिली आहे. ‘पद्मश्री’ पुरस्कार सन्मानित डॉ. अभय बंग यांच्या कार्याची सुरुवात या गावातूनच झाली.
 
 
विचारवंत असे सांगतात की, ‘’चिती’ क्षीण झाली की राष्ट्र दुर्बल होते. ‘चिती’ जोमदार झाल्यास राष्ट्र सर्वांगांनी बहरते. ‘चिती’ लोप पावली तर राष्ट्र नाश पावते.” वसा गावात हे अनुभवत आहे. गावाची ‘चिती’ जोमदार आहे, म्हणून हे गाव सर्वांगानी बहरत आहे. गडचिरोली जिल्हा, नक्षलवाद्यांची सावली, माध्यमांचा अपप्रचार, सरकारी यंत्रणेचा गैरसमज, समाजाच्या मुख्य प्रवाहाची उदासीनता असे सगळे असूनही वसा गावाची ‘चिती’ जोमदार आहे, सांस्कृतिक संचित अबाधित आहे, सामाजिक आत्मीय भाव टिकून आहे. म्हणून तर गावाचे भैय्याजींशी सूर जुळले. माझ्यासाठी ही अनुभूती आहे. महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या इतर गावांमध्येही असाच आश्वासक सांस्कृतिक वसा आहे का? शोधावे लागेल. बहुधा असेलच, नाहीतर इतक्या संकटातून हा देश कसा टिकून राहतो? 
 
 
  प्रा. रविंद्र भुसारी
 
 
@@AUTHORINFO_V1@@