एईपीडीएस प्रणालीने काळ्याबाजाराला लगाम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-May-2018
Total Views |

पुरवठा विभागातील अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांची पारदर्शकता महत्त्वाची ठरणार

 
 
जळगाव :
जिल्ह्यात पुरवठा विभागाकडून मिळणारे स्वस्त धान्य खर्‍या लाभार्थ्यांना न मिळता त्याची काळ्याबाजारात विक्री करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले होते. त्यातून कोट्यावधी रुपये कमाविण्याचा गोरखधंदा रेशनमाफियाकडून सुरुच होता.
 
 
ऐन सणासुदीच्या तोंडावर पुरवठा विभागाकडे आलेले धान्य हे खर्‍या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने वरिष्ठ अधिकार्‍यांकडे वाढत्या तक्रारी होत्या. जिल्ह्यात संपूर्ण संगणकीकरण प्रकल्पांतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेत संगणकीकरण प्रकल्प राबविले जात आहे. या प्रकल्पातर्ंगत सर्व दुकानात ई पॉस मशिन बसविले आहे. त्याद्वारे पात्र लाभार्थ्यांची बायोमेट्रिक ओळख पटल्यानंतरच धान्यांचे वितरण करण्यात येणार आहे. एईपीडीएस प्रणालीमुळे आता काळाबाजारात जाणार्‍या धान्याला लगाम बसणार आहे. मात्र, या कामांमध्ये पुरवठा विभागातील अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांची पारदर्शकताही तितकीच महत्त्वाची असणार आहे.
 
रुट ऑफिसर नॉमिनीवर मदार
एईपीडीस प्रणालीच्या कामी तलाठी, ग्रामसेवक व पोलीस पाटील हे रुट ऑफिसर नॉमिनी असणार आहे. त्यामुळे धान्य विक्रीच्या कामांची मदार आता त्यांच्यावर राहील. या प्रणालीचा वापर करुन जिल्ह्यातील कोणत्या स्वस्त धान्य दुकानदाराने वाटपासाठी किती धान्य नेले, किती धान्याचे वाटप केले आणि किती धान्य शिल्लक राहिले. जिल्ह्यात त्याची तपासणी एकाचदिवशी म्हणजे महसुल विभागातर्फे करण्यात येईल. याप्रणालीमुळे रेशनमाफियांचे धाबे दणाणले आहे. या प्रणालीमुळे स्वस्त धान्य वाटपात पारदर्शीपणा येणार असून बोगस लाभार्थी तसेच धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी मदत होणार आहे.
 
आधार जोडणीत ६ तालुके अव्वल
जळगाव जिल्ह्यात मे २०१८ पासून आधार इनाबल्ड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम सुरु केली आहे. जिल्ह्यातील १ हजार ९२८ पैकी १ हजार ९२१ स्वस्त धान्य दुकानातील पात्र लाभार्थ्याच्या १ लाख ३७ हजार ५४३ शिधापत्रिकांपैकी १ लाख ३७ हजार १७४ शिधापत्रिकांची आधार जोडणी झाली आहे. त्यात भडगाव, जळगाव, मुक्ताईनगर, यावल, धरणगाव व पाचोरा या तालुक्यात पैकीच्या पैकी काम झाल्याने हे तालुके अव्वल ठरले आहेत. इतर उर्वरित तालुक्यातील कार्डधारकांचे आधार जोडणीचे काम राहिले असून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न पुरवठा विभागाकडून सुरु आहे.
 
 
माफियांचा टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार
दैनंदिन जीवनात वाढती महागाईवर मात करण्यासाठी धान्य घेणे गरीब जनतेला परवडत नाही. अशावेळी धान्य घेण्यासाठी त्यांना स्वस्त धान्य दुकानाशिवाय पर्याय उरत नाही. मात्र, शिधापत्रिकेप्रमाणे दुकानदारांकडून अनेकवेळा हे धान्य खर्‍या लाभार्थ्यांपर्यंत न पोहोचता थेट काळ्याबाजारात जाऊन पोहचते. अनेकवेळा काळ्या बाजारात जाणारी धान्यांची वाहनेही सापडल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. एकीकडे धान्य मिळत नसल्याने लाभार्थ्यांच्या वरिष्ठांकडे तक्रारी वाढतात. दुसरीकडे रेशनमाफिया टाळूवरचे लोणी खात असल्याचा प्रकार वाढत्या प्रमाणात होता.
 
@@AUTHORINFO_V1@@