आयुष्याशी का खेळता?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-May-2018
Total Views |
 
 
 
 
शनिवारी या मोसामातील सर्वात मोठी लग्नतिथी संपताना झालेल्या अपघातांनी सर्वांनाच चिंतेत टाकले आहे. या दिवशीच्या सर्व वर्तमानपत्रांनी दखल घेतलेली ठळक बातमी अपघातांचीच होती हे विशेष! मराठवाड्यातील लातूर-मुखेड मार्गावर वर्‍हाड्यांच्या टेम्पोला भरघाव टँकरने धडक दिल्याने १० जणांना प्राण गमवावे लागले. ही घटना सकाळी नऊ-साडेनऊची. यात जखमी झालेल्या २५ जणांपैकी काहींची स्थिती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा नक्की वाढू शकतो. दुसरी घटना जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील. दळवेल गावाजवळ पहाटे ५ वाजेच्या सुमारास भरधाव ट्रकच्या धडकेने कारमधील पाचोरा येथील वाणी कुटुंबियातील ५ जणांचा बळी घेतला. शिंदखेडा तालुक्यातील भरवस येथून पैठणला वर्‍हाड्यांसह विवाहासाठी जाणार्‍या नवरदेवाचे नशीब बलवत्तर म्हणून तो सहीसलामत वाचला. त्यांच्या बोलेरोने दुभाजकाला धडक दिल्याने २० जण जखमी झाले. डोके आणि पाय वगळता इतरत्र मार न लागल्याने नवरदेवाने ‘समाधान’ व्यक्त केले.
 
 
 
या तर केवळ वर्तमानपत्रात प्रसिध्द झालेल्या घटना. पण ज्यांची नोंदच घेण्यात आली नसेल वा टाळण्यात आली असेल त्या अपघातांचे काय? ती घटना वा त्यात किती जणांना या जगाचा निरोप घ्यावा लागला, या गोष्टी कधीही बाहेर येत नाही. पण त्यामुळे त्याची तीव्रता अधिक वाढते. चिंता वाढते आणि भीतीही वाढते. कारण या मोसमात रेल्वेगाड्यांचे रिझर्व्हेशन मिळणे कठीण. एस.टी.बसही भरभरून वाहत असतात. त्यामुळे अनेकजण नाईलाजाने खासगी वाहतूक गाड्यांचा आधार घेतात. अगदी टेम्पोपासून तर बोलेरो, स्कॉर्पिओ, मिनी बस, इनोव्हा ते पार कालीपिलीपर्यंत जे मिळेल ते साधन शोधतात अन् प्रवास करतात.
 
 
 
पण त्या वाहनाची प्रवासीक्षमता किती आणि त्यात बसवतात किती? याचा काहीही ताळमेळ नसतो. जनावरे कोंबल्यासारखी माणसं भरली जातात अन् मग वर्‍हाड निघते लग्नाला. या दिवसात अशा वाहनांच्या चालकाची ना झोप पुरेशी होते ना जेवण वेळेवर घेता येते. मिळेल ते खावून ते वाहन चालवत असतात. अशा स्थितीत थकव्यामुळे त्यांना डुलकी येण्याचीच शक्यता अधिक असते अन् होतेही तसेच. पहाटे डोळ्यावर पेंग आल्याने वाहने एकमेकांना धडकून झालेल्या अपघातांचे प्रमाण खूप मोठे आहे. पाचोर्‍याच्या वाणी कुटुंबियातील ५ जणांना प्राण गमवावे लागले ती वेळ पहाटे पाचचीच होती. कुठल्यातरी वाहनाच्या चालकास आलेल्या क्षणाच्या झपकीमुळे एका हसत्या-खेळत्या कुटुंबातील पाच जणांच्या प्राणावर बेतले. भरवसच्या नवरदेवाच्या बोलेरोमध्येही क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी असल्याचे आढळून आले. हे असे जाणूनबुजून अपघाताला सामोरे जाणे म्हणजे ‘आ बैल मुझे मार’ म्हणण्यासारखेच आहे.
 
 
 
लग्नाची तारीख, वेळ जर ठरलेली आहे तर त्याप्रमाणे नियोजन करायला हवे. मात्र बर्‍याचदा ‘बुक’ केलेली वाहने इतरत्र गेलेली असतात. त्यामुळे ती परत आली की दुसर्‍या ऑर्डरवर पाठवली जातात. मुहूर्त टळायला नको भरधाव जाणे जीवावर बेतते. आनंदाच्या क्षणाची लयलूट करण्याऐवजी घरादारावर दु:खाचे सावट येते. मंगलाचे एका क्षणात अमंगल होते. संबंधित यंत्रणेला दोष दिला जातो. हे टाळता येईल पण, त्यासाठी प्रत्येकाला मनाचा तसा निर्धार करावा लागेल. प्रवासी कोंबून भरलेल्या वा चालक मद्याच्या नशेत असलेल्या वाहनात मी बसणार नाही, एवढे ठरवून त्याची अंमलबजावणी केली तरी किमान एक म्हणजे तुमचा तरी जीव वाचू शकेल ना? कारण अपघाताला कुठलाही चेहरा नसतो, पण अनेकांचे चेहरे आणि संपूर्ण आयुष्यही ते विद्रूप करतात. म्हणून सांभाळा, किमान स्वत:ला तरी!
 
 
दिनेश दगडकर 
 
 
@@AUTHORINFO_V1@@