आशादायी प्रयत्नांचे प्रेरणादायी यश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-May-2018
Total Views |
 

आनुवंशिक आजारामुळे सहा महिने अंथरूणावर पडून राहावे लागले. नाना वैद्यकीय उपचार करावे लागले. त्यातच राष्ट्रीय स्पर्धेत सातत्याने होणारी अनपेक्षित सुमार कामगिरी काय करावे? मालेगावच्या शेतकर्‍याच्या मुलीने, लहानूने ठरवले की, आपण यश खेचून आणायचे. तीच डॉ लहानू जाधव...
साल 2002, राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत मालेगावच्या शेतकरी कन्येला कांस्य पदक मिळाले. ते पदक तिच्यासकट सहखेळाडूंना आणि तिच्या सायकलिंगच्या गुरूजनांना सुवर्णपदकापेक्षाही मोठे वाटले. कारण, त्या आधी मोजून सहा वेळा लहानू राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत जोमाने उतरत होती, पण अपेक्षित गुण काही तिला प्राप्‍त करता आले नव्हते. लहानू सगळ्यांपेक्षा चांगला सराव करायची. तिला सायकलिंग क्रीडाप्रकाराचे सर्व ज्ञानही होते. तिच्या गुरूजनांना तिच्याबद्दल नेहमीच आशा असायची, पण का कोण जाणे स्पर्धेमध्ये तिला यशच मिळायचे नाही. इतक्या स्पर्धांमध्ये खेळूनही हवे ते यश का मिळत नाही, हा विचार करून लहानू आणि संबंधित सर्व विचार करीत. एके दिवशी आरोग्य चाचणीमध्ये कळले की, लहानूला आनुवंशिक आजार आहे. त्यामुळे तिच्या रक्‍तपेशींमध्ये काहीतरी समस्या होती. त्यामुळे ती स्पर्धेमध्ये योग्य ते यश मिळवू शकत नव्हती. एकतर इतके खेळून, सराव करूनही स्पर्धेत चांगली कामगिरी होती नव्हती. त्यातच या शारीरिक कमतरतेची माहिती झाली. जवळ जवळ सहा महिने लहानूला अंथरूणाला खिळून राहावे लागले. सहा महिने औषधोपचार झाले.
 
 
या काळात लहानूने विचार केला की, आता काय करायला हवे? आपण तर स्वप्नातही विचार केला नव्हता की, क्रीडा क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्तरावर आपण खेळू, पण ती संधी मिळाली. आता येणार्‍या संधीचे सोने करायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याचे स्वप्न पाहिले, अत्यंत जिद्दीने, कष्टाने, विश्‍वासाने ते पूर्ण केले. आपले ते आराध्य दैवत. त्यांचे नाव घेऊन आपणही या आजारातून उठून नव्याने आयुष्याचा आणि सायकलिंग स्पर्धेचा श्रीगणेशा करायचा, असे तिने ठरविले. 
बस, तो दिवस आणि लहानू आजारातून उठली. पुन्हा तिने सराव केला. पुन्हा राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत ती सहभागी झाली आणि तिने कांस्यपदक जिंकले. त्यानंतर लहानूने कधीही मागे वळून पाहिले नाही. लहानूने त्यानंतर राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि तीन कांस्य पदके मिळवली. 
 
 
तसे पाहिले, तर मालेगावच्या विठ्ठल जाधव आणि लीलाबाई यांना पाच मुली आणि एका मुलानंतर जन्मलेली लहानू सर्वांत लहान कन्या. जन्माने सर्वांत शेवटची, म्हणजे लहान म्हणून तिचे नाव लाडाने ‘लहानू’ ठेवले गेले. घरची परिस्थिती बेताचीच. लहानूच्या मावशीला अपत्य नव्हते. त्यामुळे लहानू शिकण्यासाठी मावशीकडे गेली. तिथे ती शिकू लागली. तिथली आर्थिक परिस्थितीही तशीच असली, तरी एकुलती एक मुलगी म्हणून तिच्याकडे विशेष लक्ष दिले जात होते. दिवस बरे चालले होते. तिथे शिकता शिकताच तिला ‘बॅटरी ट्रायल’ या उपक्रमाअंतर्गत शारीरीक शिक्षण घेण्याची संधी मिळाली. 1996 साली ’बॅटरी ट्रायल’ या सरकारी उपक्रमांतर्गत पुण्याच्या बालेवाडी क्रीडा प्रबोधिनीत ती शिक्षणासाठी आली. या उपक्रमांतर्गत नऊ शारीरिक खेळांमध्ये उत्कृष्ट क्षमता दर्शविणार्‍या विद्यार्थ्यांना निवडले जाते. त्यांना सरकारी खर्चाने त्यांच्या क्षमतेनुसार आणि शारीरिक ऊर्जा तसेच कलांनुसार खेळांचे प्रशिक्षण दिले जात. 1996 ते 2005 या कालावधीत बालेवाडीच्या क्रीडा प्रबोधिनीत शारीरिक क्रीडा स्पर्धेचे धडे लहानू घेत होती.
 
 
लहानूने पुढे शिक्षणाची आणि सायकलिंगची कास सोडली नाही. बी. कॉम., क्रीडा क्षेत्रातले बीपीएड, एमपीएड शिक्षण घेतले. सायकलिंग या विषयावर पीएचडी करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. लहानूंचा विषय होता - 15 ते 17 वर्ष वयोगटातील राज्यस्तरीय खेळाडूंचा टाईम ट्रायल आणि इंडिव्हिज्युअल पर्स्यू या खेळप्रकारातील कार्यमान वाढण्यासाठी विशिष्ट प्रशिक्षण कार्यक्रम तयार करून परिणाम अभ्यासणे.
खेळ खेळता खेळता त्या खेळाचे आयाम, परिणाम वाढवण्यासाठी लहानूने संशोधन केले. इतकेच नव्हे, तर नाशिकमधल्या नवोदित खेळाडूंना शारीरिक क्षमतेविषयी त्या विनामूल्य मार्गदर्शनही करतात. आज मालेगावच्या पुष्पाताई हिरे महिला विद्यालयात त्या शारीरिक शिक्षण संचालिका म्हणून कार्यरत आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची खेळात रूची वाढावी. त्यांनी आपल्या आयुष्याला घडवताना मळलेल्या वाटांवरून न जाता क्रीडा क्षेत्रामध्येही कारकीर्द करावी, यासाठी डॉ. लहानू चव्हाण-जाधव नेहमी प्रयत्न करत असतात. 
 
 
डॉ. लहानू म्हणतात की, “गुरूजनांमुळे मला खेळाची महती कळली. अशोक शिरसाट सर असो,कमलाकार झेंडे सर असो अथवा संजय सातपुते सर असो, सर्वच गुरूजनांमुळे मी आयुष्यात खेळ क्षेत्राची आवड जोपासून, त्यामध्ये कारकीर्द करू शकले. आजही या सर्वांनी दिलेले धडे माझ्या लक्षात आहेत. गरीब परिस्थितीत माझे आईवडील, मावशी काका यांनी माझ्या खेळाच्या आवडीला जोपासले. पुढे विवाहानंतर पती आणि सासरच्यांनीही मला नेहमी सहकार्यच केले. इतकेच पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालयात मी काम करते तिथले आमचे संचालक आ. अपूर्व हिरे आणि सर्वच स्टाफ मला सहकार्य करत असतो. हे का सांगते, तर इतकेच की आपल्याला जेव्हा काहीतरी चांगले करायची प्रबळ इच्छा असते, त्यावेळी सगळे जग आपल्या इच्छापूर्तीसाठी शुभेच्छुक बनून सहकार्यच करते.”  शिवछत्रपती पुरस्कार मिळालेल्या डॉ. लहानू जाधवांचे म्हणणे खरेच आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@