'शुश्रुषा'चे तुलसियानी रूग्णालय हे समर्पणाचे ज्वलंत उदाहरण : फडणवीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
सुमन रमेश तुलसियानी रूग्णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन 
 

मुंबई : शुश्रुषा सिटिझन्स को-ऑपरेटिव्ह हॉस्पिटल हा ५० वर्षांपूर्वी उभा राहिलेला उपक्रम दिवसेंदिवस वाढत गेला आणि आज तो एक वटवृक्ष बनला आहे. शुश्रुषाचे सुमन रमेश तुलसियानी रूग्णालय हे समर्पणाचे ज्वलंत उदाहरण आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 
 
 
शुश्रुषा सिटिझन्सद्वारे मुंबईतील विक्रोळी येथील कन्नमवार नगर - १ येथे उभारण्यात आलेल्या तुलसियानी रूग्णालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक उपस्थित होते. तसेच, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, सहकार मंत्री सुभाष देशमुख, आमदार राम कदम, सरदार तारासिंग, प्रसाद लाड, माजी खासदार एकनाथ गायकवाड, माजी आमदार प्रसाद लाड, शुश्रुषाचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर लाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले की, एखाद्या प्रकल्पाचे भूमीपूजन ज्या मुख्यमंत्र्याने केले, त्याच मुख्यमंत्र्यांने प्रकल्पाचे उद्घाटनही करावे हे विलक्षण आहे. मला हाच प्रश्न पडला आहे की, शुश्रूषाने काम लवकर केले की मी जास्त दिवस मुख्यमंत्री आहे. कारण, आपल्या राज्याचा इतिहास बघता एवढे दिवस मुख्यमंत्री राहणे तसे अवघड आहे, अशी कोपरखळी फडणवीस यांनी मारताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. ते पुढे म्हणाले की, ५० वर्षांपूर्वी उभा राहिलेला शुश्रुषा सिटिझन्स को-ऑपरेटिव्ह हॉस्पिटल हा उपक्रम आज वटवृक्ष बनला आहे. मात्र, आजही संस्थेत हाच भाव आहे की, आपल्याला सर्वसामान्य रूग्णांची सेवा करायची आहे. माफक दरात आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यायची आहे. अलीकडच्या काळात अन्न, वस्त्र, निवारा यांसह आरोग्यसेवा हीदेखील मुलभूत गरज बनली आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्र हे सेवा क्षेत्र आहे, नफा मिळवण्याचे क्षेत्र नाही. हा भाव या क्षेत्रातील व्यक्तींकडे असणे आवश्यक असून येथील व्यक्तींमध्ये तो भाव दिसतो, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी संस्थेची प्रशंसा केली. तसेच, या उपक्रमाला आवश्यक ती सर्व मदत सरकारतर्फे केली जाईल, असे आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. 
 
 
कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्यपाल राम नाईक यावेळी म्हणाले की, शुश्रूषाशी माझा अनेक वर्षांचा संबंध आहे. त्यामुळे संस्थेच्या तुलसियानी रूग्णालयाचे उद्घाटन होणे, हा माझ्यासाठी आनंदाचा प्रसंग आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात सहकाराचा दबदबा मोठा आहे. मात्र, वैद्यकीय क्षेत्रात शुश्रुषाचे हा सहकार तत्वावरील एकमेव प्रकल्प आहे. हा प्रकल्प इतकी वर्षे निष्ठेने चालवल्याबद्दल नाईक यांनी संस्थेचे अभिनंदन केले. तसेच, जसे देशभरातील कर्करोग रूग्ण टाटा मेमोरियलकडे आशेने येतात, तसेच महाराष्ट्रातील रूग्णांनी तुलसियानी रूग्णालयाकडे आशेने येतील, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हे रूग्णालय देशातील आरोग्यसेवेचा दीपस्तंभ ठरावा, अशा शब्दांत राज्यपाल राम नाईक यांनी शुश्रूषा सिटिझन्सला शुभेच्छा दिल्या. 
 
 
सुमन रमेश तुलसियानी रूग्णालयाविषयी :
शुश्रुषा सिटिझन्स को-ऑपरेटिव्हचे सुमन रमेश तुलसियानी रूग्णालय (सुपर स्पेशालिटी) हे विक्रोळी येथे पूर्व द्रुतगती मार्गाजवळील कन्नमवार नगर - १ येथे उभारण्यात आले आहे. या सहा मजली रूग्णालयाची क्षमता १४० खाटांची असून ईएमएस, डेकेअर, सामान्य विभाग, प्रसुती विभाग, मॉड्युलर शस्त्रक्रिया विभाग, २४ खाटांचा अतिदक्षता विभाग, पीआयसीयु, एनआयसीयु बेड्स, इमर्जन्सी आणि अपघात युनिट आदींचाही या रूग्णालयात समावेश आहे.  
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@