येचुरींचा नवा कम्युनिजम...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-May-2018
Total Views |

साम्यवादातील लवचिकता दाखविण्यासाठी येचुरी चीनकडे बोट दाखवित आहेत. याहून मोठा विनोद नाही. भारतातल्या डाव्यांना काही कार्यक्रमच नाही, पण मोदीद्वेषाने सगळ्यांना एकत्र बांधले आहे.

 
सीताराम येचुरी म्हणतात की, “मार्क्सवाद हा कालबाह्य झालेला नसून तो आज जास्त लागू होत आहे.” जगभरातील मार्क्सवादाची आजची दयनीय स्थिती पाहिली की, सीताराम येचुरी नेमका कोणता मार्क्सवाद मांडत आहेत, असाच प्रश्‍न पडू शकतो. रुढ अर्थाने आज मार्क्सवादाची अनेक रूपेे आहेत. एक मूळ जो मार्क्सने मांडला, नंतर दुसरा जो लेनिनने अवलंबिला आणि नंतर माओचा जो बहुसंख्य भारतीय डाव्यांनी अनुसरला. यातल्या कम्युनिजमला ‘आमचा’ म्हणण्याचे धाडस आज डाव्यांमध्ये नाही. कुठला तरी ताबूत डोक्यावर घेऊन नाचायचे काम हे लोक करीत आहेत. नाचताना आपल्या डोक्यावर काय आहे, याचीदेखील खरी कल्पना या मंडळींना नाही. पर्यायाने या सगळ्यांनाच संघद्वेषाने पछाडले आहे. भारतीय डावे आज लोकशाहीच्या सर्वच सदनातून हळूहळू हद्दपार होत आहेत. हे का घडत आहे, याचे स्पष्टीकरण डाव्यांकडे नाही. त्यांना त्यांच्या या अपयशाचे खापर अन्य राजकीय पक्षांवर फोडायचे आहे. राजकारणात पैसा वापरला जात असल्याने राजकीय पक्ष जिंकतात, असे त्यांचे म्हणणे असते. करात दाम्पत्य असेल किंवा सीताराम येचुरी, या सगळ्यांनीच हा सूर नेहमी आळवला आहे.
 
विचारातली धूसरता, नव्या कार्यकर्त्यांची उणीव, जुन्यांना टिकविण्यात आलेले अपयश या सगळ्याचे अपयश आपण कुणाच्या माथी मारायचे तर ते संघाच्या, हा डाव्यांचा खाक्या होऊन गेला आहे. आज मार्क्स लागू होत आहे. असेच जर का असेल तर ते येचुरींचे दिवास्वप्न असू शकेल. कारण, मार्क्स लागू होतोय आणि मार्क्सवादी पक्षाची कार्यालये ओस पडत आहेत, हे अजबच म्हणावे लागेल. त्याचे खरे कारण समाजाशी तुटलेले नाते आणि डाव्यांमध्ये असलेली परस्परांमधली विसंगती यात दडले आहे. येचुरींनी आपल्या भाष्यात अनेक विधाने केली आहेत. मूळ मुद्दा हा यात कुठल्याही प्रकारची सुसंगती नाही. चीनमध्ये कालानुरूप बदल केल्यामुळे कम्युनिजम यशस्वी झाला, असे येचुरींचे म्हणणे आहे. चीनमध्ये खरोखरच कम्युनिजम आहे. जिनपिंग यांनी नुकताच स्वत:चा राज्याभिषेक करून घेतला. त्यांनी ज्या काही कसरती केल्या, त्यावरून त्यांना आयुष्यभर चीनच्या सर्वोच्च स्थानावर बसून राहायचे आहे, यात शंका नाही. येचुरींनाही असेच राज्यसभेवर कायम राहायचे होते. मात्र, त्यांच्या पक्षानेच त्यांचे पंख कापले, हा भाग अलहिदा. जगातला सर्वात मोठा भांडवलदार म्हणून चीन समोर येत आहे. आशियातील लहानमोठ्या देशांना गुंतवणुकीची आमिषे दाखविण्याचे काम सध्या चीनच्या माध्यमातून सुरू आहे. आता यालाच ‘कम्युनिष्ठांनी’ नव्याने ‘कम्युनिजम’ म्हणायला सुरुवात केली आहे का, हाच मोठा प्रश्‍न आहे.
 
येचुरी, करात वगैरे मंडळींनी सध्या त्यांचा एक हिरो शोधून काढला आहे. गेली दोन वर्षे तोच डाव्यांसाठी नव्या पिढीचा प्रवक्ता आहे. कन्हैय्याकुमारच्या नावाने या सगळ्यांना मोदींना पर्याय देणारा कुणी सापडला, असे वाटायला लागले होते. ही सगळी मंडळी गोपिका बनून कन्हैय्याभोवती फेर धरून नाचली होती. मात्र, हा तारणहार फारसा काही चालला नाही. एका खाजगी वाहिनीच्या कॉन्क्‍लेव्हमध्ये कन्हैय्या म्हणतो,“स्टॅलिनने कम्युनिजम नीट राबविला नाही.” चीन स्वत:च भांडवलदार झाला आहे. मग त्यांच्याकडून आपण कम्युनिजमची अपेक्षा कशी ठेवणार? कन्हैय्याचे बरोबरच आहे, येचुरी वगैरेंना आता कुणी विचारत नाही. सध्या त्यांच्या पक्ष संघटनेतले सर्वोच्च पद त्यांच्याकडे असले तरी त्या पक्षाची अवस्था तोळामासा झाली आहे. कन्हैय्याला अजूनही लोकांमध्ये जाण्याची हौस आहे, तिथे त्याला या सगळ्यांची उत्तरे द्यावी लागतात. आज ज्या लवचिकतेचा मुद्दा येचुरी उपस्थित करीत आहेत, तो सर्वच साम्यवादी देशांनी पुरेपूर वापरला आहे. चीन असो, रशिया असो अथवा स्वत:ला ‘साम्यवादी’ म्हणविणारे अन्य देश; हे सगळेच डाव्यांच्या भाषेतले ‘नवभांडवलदार’ झाले आहेत. येचुरी किंवा कन्हैय्यासारखे लोक त्यांचे काहीच बिघडवू शकत नाहीत. भारतातल्या डाव्यांना जनतेने संधी दिली नव्हती, असे नाही. मात्र, डाव्यांनी त्या संधीची मातीच केली होती. कारण, डाव्यांना मिळणारा जनमताचा कौल हा काँग्रेसला पर्याय म्हणून होता. मात्र, डाव्यांनी आपली सगळी शक्ती काँग्रेसच्या मागे उभी केली. यामुळे परंपरागत मतदारांनीही डाव्यांना नाकारले.
 
 
आता येचुरी ‘न्यूयॉर्क टाइम्स’चा दाखल देत मार्क्स कसा कालबाह्य झालेला नाही, याचा दाखला देत आहेत. मार्क्स कालबाह्य झाला नसेल, तर मार्क्सची भाकितेही खरी ठरायला हवी होती. “भांडवलवादाचा अंत होऊन कामगारांचा काळ अवतरेल,” हे मार्क्सचे भाकीत किमान त्याच्या 200व्या जयंतीला तरी खरे व्हायला हवे होते. मात्र, या सगळ्याच्या अगदी उलट होताना दिसत आहे. एका गोष्टीत हे सगळे डावे मात्र एकत्र आहेत आणि ते म्हणजे दलितांबाबत केली जाणारी ओरड. यामागे काही डाव्या विचारांची बैठक वगैरे आहे, असे मुळीच नाही. इथे मोदी आणि भाजपद्वेषाचा सामायिक अजेंडा आहे. मार्क्स आणि आंबेडकरी युवक यांची सांगड घालण्यात डाव्यांना जे काही यश मिळाले आहे, त्यात धांदात खोटे बोलण्याचा मोठा वाटा आहे. दलित आणि अल्पसंख्याकांवर हल्ले आणि अत्याचार यात वाढ झाल्याने दलित आणि डाव्यांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे आता येचुरी सांगत आहेत. जमले तर माओवादी आणि जमले तर दलित राजकारण, असा खेळ सध्या सुरू आहे. साम्यवादी चळवळीपासून दूर राहण्याचा बाबासाहेबांचा सल्ला दुर्लक्षित करून काही मंडळी सध्या या अपप्रचाराला बळी पडली असली तरी हे फार काळ चालणार नाही.
 
साम्यवादातील लवचिकता दाखविण्यासाठी येचुरी चीनकडे बोट दाखवित आहेत. याहून मोठा विनोद नाही. भारतातल्या डाव्यांना काही कार्यक्रमच नाही, पण मोदीद्वेषाने सगळ्यांना एकत्र बांधले आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@