जेरुसलेमवरुन वादंग...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-May-2018   
Total Views |
 
 
 
 
 
 
सीमावाद हे केवळ भारत-पाकिस्तान किंवा भारत-चीनपुरते मर्यादित नाहीत, तर जगभरात या सीमावादावर कित्येक युद्ध छेडली गेली. पण, आज २१ व्या शतकातही सीमावादांमुळे उद्भवणार्‍या तणावाला आणि युद्धसदृश प्रसंगांना अजूनही पूर्णविराम लागलेला नाही. इस्रायल-पॅलेस्टाईन सीमावाद आणि संघर्ष हा त्याचेच एक धगधगते उदाहरण...
 
 
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये इस्रायलची राजधानी तेल अवीव असतानादेखील तेथील अमेरिकन दूतावास जेरुसलेममध्ये हलविण्याची ऐतिहासिक घोषणा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. त्यांच्या या आणखी एक धक्कादायक आणि अनपेक्षित घोषणेमुळे जगभरात टीकात्मक सूर आळवणार्‍या प्रतिक्रिया उमटल्या. युरोपीय महासंघानेही अमेरिकेच्या या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली पण, ट्रम्प यांनी इस्रायलला अगदी झुकते माप देत जेरुसलेमला अमेरिकी दूतावास सुरू करून दाखवलाच. दूतावासाच्या औपचारिक उद्घाटनाचा जंगी सोहळा जेरुसलेममध्ये सोमवारी पार पडला. यावेळी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंसह अनेक उच्चपदस्थ अमेरिकी-इस्रायल अधिकार्‍यांसह इवान्का ट्रम्प यांनीही हजेरी लावली. पण, जेरुसलेमला दूतावास हलविण्याबाबत अत्यंत आग्रही असलेले, या मागणीचे जनक डोनाल्ड ट्रम्प यांची अनुपस्थिती मात्र साहजिकच चर्चेचा विषय ठरली. त्यामुळे एकीकडे जेरुसलेमच्या या नूतन अमेरिकी दूतावासात अमेरिकी राष्ट्रगीताचे सूर घुमत होते, तर दुसरीकडे इस्रायल-पॅलेस्टाईन सीमेवर मात्र अशांतता वाढत होती.
 
 
इस्रायलच्या सैन्याने सीमेवरील कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न करणार्‍या पॅलेस्टिनी आंदोलनकर्त्यांवर अश्रुधुराच्या मार्‍यासह गोळ्याही झाडल्या. इस्रायली सैन्याच्या या गोळीबारात ४३ नागरिकांचा मृत्यू झाला असून ३०० हून अधिक पॅलेस्टिनी जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. त्यामुळे गाझा पट्टीसह इस्रायल-पॅलेस्टाईन सीमेवरील तणाव वाढला असून पॅलेस्टाईनला नियंत्रित करणार्‍या हमासने मंगळवारी बंदची हाक दिली आहे. पॅलेस्टाईनचा इस्रायलचा अमेरिकी दूतावास जेरुसलेममध्ये आणण्याचा तीव्र विरोध होता. कारण, अजूनही जेरुसलेम आणि त्याच्या शहरी सीमांवरून वाद आहेतच. त्यातच अमेरिकेचा दूतावास हा पश्‍चिम जेरुसलेमधील ‘नो मॅन्स लँड’च्या क्षेत्रात उभारला असल्याचाही पॅलेस्टाईनचा आक्षेप आहे. त्यामुळे हा तिढा प्रलंबित असताना आणि लोकांचा विरोध असताना जेरुसलेमवर पूर्ण हक्क सांगणार्‍या इस्रायलचा पॅलेस्टाईनने विरोध दर्शविला आहे. तसेच, पॅलेस्टाईनला भविष्यात एक स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळाल्यास जेरुसलेमचा पूर्व भाग हा त्यांच्या राजधानीच्या शहरासाठी प्रस्तावित आहे. त्यामुळे अशाप्रकारे इस्रायलच्या ७० व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून अमेरिकी दूतावास जेरुसलेममध्ये आणणे, हे अरबबहुल पॅलेस्टाईनला साहजिकच रुचणारे नाही. त्यामुळे विरोधासाठी मोठ्या संख्येने पॅलेस्टिनी नागरिकांनी इस्रायलच्या सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला आणि हिंसाचार उफाळून आला. २०१४ नंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने पॅलेस्टिनी नागरिकांना इस्रायलींनी कंठस्नान घातले आहे. त्यामुळे इस्रायल आणि नेतान्याहू यांच्याविरोधातील रोषात अधिकच भर पडली आहे. 
 
 
जरी जेरुसलेम हे ज्यूंसाठी एक पवित्र शहर असले, त्यांची मंदिरे-स्मारके तिथे असली तरी पॅलेस्टिनी अरबांसाठीही जेरुसलेमचे इस्लामिक महत्त्व आहेच. शिवाय, जेरुसलेममध्ये तीन लाखांहून अधिक अरबी लोकसंख्या असल्याचेही म्हटले जाते. त्यामुळे वादंगाने वेढलेल्या या जेरुसलेममध्ये ट्रम्प आणि अमेरिकेने आपला इस्रायलमधील दूतावास स्थानांतरित केल्याने अमेरिकेने इस्रायलवरील जेरुसलेम शहरावरचा पूर्ण हक्क मान्य केल्याचेच प्रतीत होते. त्यामुळे पॅलेस्टाईनकडून त्याचा तीव्र विरोध होऊन, अशी परिस्थिती उद्भवणार याची इस्रायललाही कुठे तरी कल्पना होतीच. म्हणूनच इस्रायलनेही सीमावर्ती भागात आपल्या सैनिकांचा चोख बंदोबस्त ठेवला होताच आणि म्हणूनच सीमेवर इस्रायल विरुद्ध पॅलेस्टाईन संघर्षाची पुनश्‍च परिणती पाहायला मिळाली.
 
 
त्यातच ट्रम्प यांनी जेरुसलेमला जरी इस्रायलच्या राजधानीचा दर्जा दिला असला तरी सीमावाद इस्रायल आणि पॅलेस्टाईनने चर्चेने आणि सामोपचाराने सोडवावा, असे म्हटले आहे. म्हणजे, पुढे पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळाल्यास जेरुसलेम या पवित्र शहराचा काही भाग इस्रायलमध्ये, तर काही पॅलेस्टाईनमध्ये असेल काय, हे येणारा काळच ठरवेल.  
 
 
 -विजय कुलकर्णी
 
 
@@AUTHORINFO_V1@@