होमियोपॅथीबद्दलचे समज - गैरसमज- भाग-6

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
होमियोपॅथिक औषधशास्त्राबद्दलच्या समज आणि गैरसमज या विषयावर आपण गेले काही दिवस माहिती घेत आहोत. ही औषधे घेणार्‍या रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना अनेक शंका असतात. त्या सर्व शंकांचे निरसन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या लेखांमधून करण्याचा मी प्रयत्न करत आहे. साधारणपणे लोकांमध्ये अजून एक समज असतो की, होमियोपॅथीची औषधेही फार काळ घेत राहावी लागतात व त्यामुळे ही प्रचंड लांबणारी उपचारपद्धती आहे. याबाबत आपण सत्यपरिस्थिती जाणून घेऊ.
 
 
जसे आपण मागील भागात पाहिले की, रुग्णाला होणार्‍या आजारांचे स्वरुप वेगवेगळे असते. प्रत्येक आजाराला बरे होण्यास किंवा तो नियंत्रणात येण्यास ठराविक वेळ हा द्यावाच लागतो. साधारणत: असे दिसून येते की, इतर सर्व उपचारपद्धती करुन झाल्यावर रुग्ण होमियोपॅथीकडे औषधासाठी येतो. अशा वेळी होमियोपॅथिक तज्ज्ञाला अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात.
 
 
१.  आजार किती जुना आहे?
२.  या आधी कुठली व कशा प्रकारे औषधे घेतली गेली आहेत?
३.  आजाराचे स्वरुप कसे आहे?
४.  आजाराचे कारण काय आहे?
५.  हा आजार रुग्णाने कसा जुळवून घेतलाय? (Adaptation to the disease) इत्यादी.
 
 
सर्वप्रथम हे पाहिले जाते की, हा आजार किती जुना आहे व त्याच्या जुनाटपणामुळे त्याचे शरीरावर कसे व कुठल्या प्रकारचे दुष्परिणाम झाले आहेत? आजाराचे जुनाट स्वरुप (chronic nature of the disease) जाणून घेतल्यावरच त्याच्या औषधोपचाराची पद्धत ठरवली जाते. (mode of treatment) 
 
 
जेव्हा आजार सुरु होतो तेव्हापासून होमियोपॅथिक उपचारांपर्यंत कुठली कुठली औषधे घेतली गेली आहेत, याची नीट चौकशी केली जाते. घेतल्या गेलेल्या औषधांचे परिणाम व त्यांच्यामुळे झालेल्या दुष्परिणामांचा अभ्यास केला जातो. होमियोपॅथीमध्ये सर्वप्रथम या इतर औषधांच्या दुष्परिणामांना दूर केले जाते.हे दुष्परिणाम दूर झाले की मग आजाराचे खरे स्वरुप पृष्ठभागावर येते व त्यानुसार आजारावर उपचार करण्यास सोपे जाते. हे सर्व होण्यास काही कालावधी जातो.
 
 
आजाराचे स्वरुप कसे आहे, या आजारामुळे शरीरातील कुठल्या कुठल्या संस्थांना त्याची इजा पोहोचते आहे व त्यामुळे कुठली शारीरिक व मानसिक लक्षणे दिसत आहेत, याचा अभ्यासही करावा लागतो व त्यानुसारच औषध शोधून द्यावे लागते. रुग्णाचे वय व शारीरिक व मानसिक क्षमता याचाही विचार करुन मगच औषधाची मात्रा ठरवावी लागते. बरेचदा रुग्ण अशक्त असतो किंवा वयस्कर असतो. अशा वेळी त्यांच्या शरीरावर काही दुष्परिणाम होणार नाहीत, अशा सौम्य मात्रेमध्ये सुरुवातीला औषधे चालू करावी लागतात व जसजशी ती औषधे शरीराला साजेशी होतात व आजारावर लागू पडतात, तसतशी त्या औषधांची मात्रा व त्यांची शक्ती वाढवत नेली जाते.
 
 
रुग्णाच्या आरोग्याच्या दृष्टीने हे फार महत्त्वाचे असते. या सर्व गोष्टी नीट करण्यात काही काळ जावा लागतो. आजाराचे मूळ कारण शोधून त्याप्रमाणे जर औषध दिले, तरच तो आजार मुळापासून निघून जातो. म्हणून आजाराचे मूळ कारण शोधून काढून, त्याच्या मुळावरच घाव घालण्याचे कार्य होमियोपॅथीची औषधे करतात. त्याचप्रमाणे झालेल्या आजाराशी त्या रुग्णाने कसे जुळवून घेतले आहे किंवा त्या आजाराशी निगडीत शरीर व मन कुठल्या प्रकारची लक्षणे दाखवत आहेत, या सर्वांचा सविस्तर अभ्यास होमियोपॅथीमध्ये केला जातो. या सर्व गोष्टी साध्य करण्यात थोडा कालावधी जावा लागतो. त्यामुळे रुग्णांना असे वाटते की, ही औषधे बराच काळ घ्यावी लागतात. परंतु नीट पाहिले तर असे लक्षात येतं की, यात सर्व बाजूने रुग्णाचा फायदा असतो. कारण आजार मुळापासून घालवण्याचे कार्य होमियोपॅथी करत असते.
 
 
प्रत्येक आजाराच्या बाबतीत हे नसते. नवा आजार बरा होतो, तसे तज्ज्ञ औषध थांबवण्याचा सल्ला देतात. त्यामुळे हा गैरसमज काढून टाका की, ही औषधे आयुष्यभर खावी लागतात.
 
 
पुढील भागात आपण अजून काही शंकांचे निरसन करु. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@