वाराणसीमध्ये उड्डाणपूल कोसळून १२ नागरिकांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-May-2018
Total Views |


वाराणसी :
अर्धवट बांधकाम झालेल्या उड्डाणपुलाचा काही भाग कोसळून तब्बल बारा नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना वाराणसी येथे घडली असून जवळपास ५० नागरिक पुलाखाली अडकून पडल्याची भीती स्थानिक प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान पुलाखाली अडकून पसलेल्या नागरिकांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी तसेच नागरीकांच्या मदतीसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहे.
वाराणसीमधील कॅन्ट रेल्वे स्थानकाजवळ गेल्या काही वेळापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून कॅन्ट स्थानकाजवळ एका उड्डाणपूलाचे काम सुरु आहे. आज संध्याकाळी काम सुरु असताना अचानक पुलाचा एक भाग अचानक खाली कोसळला. यावेळी पुलाखाली असलेले चार चारचाकी, दोन रिक्षा, एक मिनी बस आणि काही दुचाकी वाहने या पुलाखाली सापडले. यानंतर आजूबाजूच्या परिसरामध्ये एक गदारोळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने आपत्कालीन व्यवस्थेला पाचारण करत नागरिकांच्या मदतीसाठी प्रयत्न सुरु केले. यूपी प्रशासनाकडून सध्या नागरिकांच्या मदतीसाठी एनडीआरएफची पाच पथके तैनात करण्यात आली आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या तिघांनीही या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख तर जखमींना २ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच येत्या ४८ तासांमध्ये या घटनेचा विस्तृत अहवाल सादर करण्याचे आदेश देखील दिले आहेत.
 


 



 
 
@@AUTHORINFO_V1@@