शरीफ कबुलीजबाब

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-May-2018
Total Views |



पाकिस्तानातील घटनात्मक सरकारच्या मानगुटीवर लष्कर, आयएसआय, मुस्लीम कट्टरपंथी आणि दहशतवादी संघटनांच्या तलवारी कायम टांगलेल्या असतात. आपल्या वक्तव्यातून शरीफ यांनी हेच मान्य केले. शरीफ यांना आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात मुंबईवरील हल्ल्याबाबत चकार शब्दही न काढण्याची हिम्मत या समांतर सरकारांच्या भीतीमुळेच झाली नसावी.

जे गुपित सार्‍या जगाला माहिती होते, ते पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी जाहीररित्या कबूल केले. मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात पाकचा हात असल्याचे त्यांनी नुकतेच एका मुलाखतीत मान्य केले. त्याआधी शरीफ यांच्याविषयी सांगण्यासाखे म्हणजे, भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन्ही देशांत शांतीपूर्ण व सौहार्दमय संबंध निर्माण होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देणारी व्यक्ती अशीही नवाज शरीफ यांची ओळख आहे. १९९९ साली जनरल मुशर्रफ पाकचे अध्यक्ष असताना पाकने भारतावर लपत-छपत हल्ला केला, याबद्दलही शरीफ अनभिज्ञच होते. शरीफ यांची ही एक बाजू झाली, पण शरीफ यांची दुसरी बाजू या बाजूपेक्षा जास्तच काळीकुट्ट आहे. कारण २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला आता जवळपास १० वर्षे पूर्ण झाली. त्यानंतर शरीफ यांनी पाकिस्तानचे पंतप्रधानपदही उपभोगले. २०१३ ते २०१७ या दरम्यान ते पाकच्या पंतप्रधानपदी होते, त्यावेळी शरीफना आपल्या कृष्णकृत्यांची कबुली द्यायची उपरती का झाली नाही? आपल्या कार्यकाळात शरीफ यांनी या दहशतवादी हल्ल्यातील सहभागी दोषींविरोधातील खटल्याची सुनावणी का पूर्ण केली नाही? तेव्हा त्यांना या लोकांविरोधात कारवाई करण्यापासून कोणी अडवले होते? की नवाज शरीफ फक्त नामधारी प्रमुख होते आणि देशाची सारीच सत्तासूत्रे कोणा दुसर्‍याच्याच ताब्यात होती? याचे उत्तरही नवाज शरीफ यांनी याच मुलाखतीत दिले, हेही बरे झाले.

पाकिस्तानात दहशतवादी संघटना सक्रिय असल्याचे त्यांनी मुलाखतीत सांगितले. ज्या दहशतवादाच्या आरोपांमुळे पाकची उरलीसुरली लाज जगाच्या वेशीवर टांगली गेली, त्या दहशतवादाची जन्मभूमी नव्हे तर नंदनवन आमचाच देश असल्याची ही कबुली होती. ते म्हणाले की, “तुम्ही अशा देशाचा कारभार हाकू शकत नाहीत, जिथे दोन वा तीन समांतर सरकारे चालत असतील. त्यांना रोखायला हवे. देशात केवळ एकच घटनात्मक सरकार असावे.” म्हणजेच नवाज शरीफ पंतप्रधानपदी असताना त्या देशात घटनात्मक सरकारला काडीचीही किंमत नव्हती आणि अन्य दुसरी-तिसरीच कोणतीतरी समांतर सरकारे अस्तित्वात होती, हेच सिद्ध होते. शरीफ यांनी मुलाखतीत त्या समांतर सरकारांची नावे घेतली नाहीत, पण ती समांतर सरकारे कोणती हे जगजाहीरच आहे. पाकिस्तानातील घटनात्मक सरकारच्या मानगुटीवर लष्कर, आयएसआय, मुस्लीम कट्टरपंथी आणि दहशतवादी संघटनांच्या तलवारी कायम टांगलेल्या असतात. आपल्या वक्तव्यातून शरीफ यांनी हेच मान्य केले. शरीफ यांना आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात मुंबईवरील हल्ल्याबाबत चकारही शब्द न काढण्याची हिम्मत या समांतर सरकारांच्या भीतीमुळेच झाली नसावी. आता मात्र सत्तेतून पायउतार झाल्यावर शरीफ पोपटासारखे बोलायला लागलेत. पाकिस्तानी न्यायालयाने शरीफ यांना राजकारणाबाहेर काढल्याने त्यांच्याकडे मिळवण्यासारखे आणि गमावण्यासारखेही काही राहिलेले नाही. त्यामुळेच ही अशी आपल्या पापांची कबुली देण्याची बुद्धी त्यांना झाली असावी.

दुसरीकडे शरीफ यांनी देशातील समांतर सरकारांवर कारवाई करण्याचाही उपदेश विद्यमान घटनात्मक सरकारला केला, पण शरीफ ज्यावेळी स्वतः पंतप्रधानपदी होते, त्यावेळी त्यांनी का कधी अशी कारवाई केली नाही? स्वतःकडे पंतप्रधानपद असताना शरीफ यांना हे दुष्टचक्र का तोडता आले नाही? म्हणजेच पाकिस्तानात मारल्या जाणार्‍या लोकशाहीच्या गप्पा या फुकाच्या बाता असल्याचे, तो देश प्रत्यक्षात लष्कर, आयएसआय, मुस्लीम कट्टरपंथी, दहशतवादी संघटनांच्या मर्जीवर चालत असल्याचे आणि तिथले पंतप्रधानपद याच लोकांच्या हातचे बाहुले असल्याचेच शरीफ यांच्या विधानांतून स्पष्ट होते.
 
जगभरात पाकिस्तान एकाकी पडल्याचे आणि अफगाणिस्तानचे म्हणणे जग ऐकत असल्याचे वैषम्यही शरीफ यांनी मुलाखतीदरम्यान बोलून दाखवले. भारताच्या ताब्यातून काश्मीरचा घास घेण्यासाठी जन्माला घातलेल्या दहशतवादाचा भस्मासूर आता त्या देशालाच पोखरत आहे. पाकिस्तानची सध्याची अवस्था दिवाळखोरासारखी झाली असून कुठलेही उद्दिष्ट नसलेला भात्यातून सुटलेला बाण अशी त्याची वर्तणूक आहे. त्यातच भारतावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात कोणतीही कारवाई केली नाही. यावरून रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनीही पाकचे कान टोचले. जगभरातून पाकिस्तानवर टीकेचा भडीमारही झाला, पण ज्या गोष्टीमुळे जगात आपली पत राहिली नाही, ती गोष्ट बंद करण्याची बुद्धी पाकिस्तानला कधीही झाली नाही. अशावेळी पाकिस्तान जगात एकाकी पडण्याव्यतिरिक्त दुसरे काही घडूही शकत नव्हते, तेच झाले तर आता शरीफना वाईट वाटायला लागले.

पण पाकिस्तानची जगात उत्तम प्रतिमानिर्मिती करण्याचे कामही पंतप्रधानपदी असताना शरीफ यांचेच होते ना? की आता पंतप्रधानपदी नसल्याने आपल्याकडून राहून गेलेली कामे त्यांना आठवत आहेत? तसेही शरीफनी आपल्या कार्यकाळात पाकिस्तानचे जगात वेगळे आणि प्रभावशाली स्थान निर्माण व्हावे म्हणून असे कोणते काम केले? तर काहीही नाही. पाकिस्तानचे दहशतवादाला जन्म देण्याव्यतिरिक्त असे कोणते कार्य आहे की, ज्यामुळे जगाने त्याचे ऐकावे आणि त्याभोवती फेर धरून नाचावे? तर कसलेच नाही. उलट हेकेखोरपणा, कांगावा, भारतद्वेष करून त्या देशाने आपली अवस्था केविलवाणी करून टाकली. ज्यामुळे आता त्या देशाचे काही ऐकून घ्यावे, अशी जगातल्या देशांची मानसिकताच राहिली नाही. आता त्याबद्दल वैषम्य वाटून काही उपयोगही नाही. हे शरीफ यांनी समजून घेतले पाहिजे आणि जसे मुलाखतीत त्यांनी मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात पाकचा हात असल्याचे कबूल केले, तसे न्यायालयातही कबूल करावे, दहशतवाद्यांना शिक्षाही द्यावी. त्यामुळे तरी एखाद्या देशाचे म्हणणे ऐकण्याएवढी त्या देशाची पत वाढली तर वाढेल.

@@AUTHORINFO_V1@@