सकारात्मक शिस्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-May-2018
Total Views |
 

जवळच्याच घरातून दोन वर्षांच्या मुलाच्या आईने दारावर आलेल्या फळविक्रेत्याला हाक मारलेली मी ऐकली. तिचे पुढचे वाक्य मात्र अनपेक्षित होते, “ओ फळवाले काका, याला घेऊन जा हो तुमच्याबरोबर. फार दंगा करतोय सकाळपासून.” मुलाने साहजिकच अजून आक्रस्ताळ्या आवाजात भोकाड पसरले. पुढे मग दोन धपाटे आणि अधिक मोठ्या आवाजात रडणे. माझे विचारचक्र सुरु झाले. ही आई तिच्या मुलाला असे कुणा अनोळखी व्यक्तीबरोबर प्रत्यक्षात पाठवेल का? मग हे स्वतःच्याच वचनाशी प्रतारणा करण्यासारखे नाही का? आणि असे सतत होत राहिले तर तिच्या मुलाचा तिच्या शब्दांवर काही भरवसा उरेल का?
 
’चटका देईन’; ’कोंडून ठेवीन’; ’घरातून हाकलून देईन’; ’बागुलबुवाला घेऊन जायला सांगीन’; ’बोर्डिंगला पाठवून देईन’ या आणि अशा अनेक धमक्या दुर्दैवाने अजूनही घराघरांतून ऐकू येतात. यातल्या बर्‍याचशा धमक्या पोकळ असतात. काही प्रत्यक्षात अंमलात आणल्या जात असतील तर ते अजूनच धोकादायक आहे. पण, या पोकळ धमक्या देखील मुलांच्या मनावर खूप खोलवर आणि आयुष्यभर न भरणारे ओरखडे ओढतात. अशा धमक्यांमुळे मुले सुरुवातीला भीती, मग चिंता, मग तीव्र विरोध, त्यानंतर दुःख आणि शेवटी टोकाचा अविश्वास अशा भावनिक आंदोलनातून जात राहतात. अशा त्रासदायक भावनांमधून नकळतपणे प्रवास केल्यानंतर मग ‘मूल कोडगे झाले आहे’ अशी तक्रार घेऊन पालक येतात. मुलांच्या या ’कोडगेपणा’ने पालक खूप दुखावतात व हतबल होतात.

मध्यंतरी एक मैत्रीण म्हणाली, “ते ‘चाईल्ड सायकॉलॉजी’ वगैरे काही आमच्या घरच्यांना पटत नाही. त्यांचं म्हणणं असतं की, मुलांना शिस्त ही लावायलाच हवी. मुलांशी सारखं गोड बोलून ती डोक्यावर बसतात.” मुलांच्या मानसशास्त्राविषयी हा मोठा गैरसमज अजूनही समाजात आहे हे पुन्हा लक्षात येऊन मी कपाळावर हात मारून घेतला. ‘मुलांना शिस्त लावणे हा विकासाच्या मानसशास्त्राचा अतिशय महत्वाचा भाग आहे’, याबाबत जगातल्या कुठल्याही मानसतज्ज्ञाचे दुमत असणार नाही. शिस्त लावण्यासाठी वापरण्याचे तंत्र, मात्र मानसशास्त्र जास्त नैसर्गिक व शास्त्रीय पद्धतीने मांडते.

दोन-तीन वर्षांपर्यंत मुलांची तार्किक विचार करण्याची क्षमता विकसित होऊ लागलेली असते. या क्षमतेचा वापर शिस्त लावताना खूप चांगला करता येतो. मानसशास्त्राला शिस्तीच्या बाबतीत, ’शिक्षा’ या शब्दाच्या मराठी भाषेतील अर्थापेक्षा हिंदी भाषेतील अर्थ जास्त अपेक्षित आहे; ‘शिक्षा म्हणजे शिक्षण’. शिक्षण जसे ’काय शिकायचे आहे’ त्या उद्दिष्टानुसार आखले जाते, तशीच शिक्षा देखील ’काय शिस्त लावायची आहे’ याचा विचार करून आखलेली असेल तर ती जास्त परिणामकारक ठरते. या वयापर्यंत मुलांना कारण-परिणाम हे समीकरणही उमजू लागलेले असते. त्यामुळे शक्य तितक्या वेळेला वेगळी काही शिक्षा न देता, चूक निस्तरण्याची कृती मुलांना करायला सांगता येते. जसे, पाण्याचा पेला हातातून पडून पाणी सांडले तर फक्त ते पुसायला सांगणेही पुरेसे असते. त्यातून पुढच्या वेळी जास्त काळजी घेण्याचे विचार नकळत रुजतात. भगवद्‍गीतेमध्ये सांगितलेला कर्मसिद्धांत हादेखील कारण-परिणामाचे समीकरण विशद करतो. ’आपल्या प्रत्येक बर्‍या-वाईट कृतीचा काही ना काही परिणाम आपल्यावर होणारच आहे’ हे जितक्या लहान वयात उमगू लागेल तितके चांगले नाही का?

पालकांचे व इतरांचे अवधान (अटेन्शन) मिळवणे ही या वयातल्या मुलांची गरज असते. ते योग्य प्रमाणात न मिळाल्यास मुले चिडचिड, तोडफोड, आक्रस्ताळेपणा करू शकतात. अवधान मिळवण्याचे सकारात्मक मार्ग मुलांना शिकवता येतात. त्यातून अकारण होणारी चिडचिड तर टळतेच, शिवाय मुलांचे पौगंडावस्थेतील भरकटलेपण रोखण्याचे संस्कारही घडत जातात. मारणे, कोंडून ठेवणे यासारख्या शारीरिक शिक्षांमधून मुले दुखावली जातात हे तर आहेच, शिवाय ’शारीरिकदृष्ट्या जास्त सक्षम असताना दुसर्‍याला इजा करून आपण अधिकार गाजवू शकतो’ असा घातक संदेश मुलांना मिळतो. त्यापेक्षा आपल्या सबलतेचा संरक्षणात्मक वापर करून, मुलांच्या वर्तनामागची भावनिक कारणे जाणून, योजलेल्या शिस्तीच्या तंत्रातून हवा तो परिणाम साधणे जास्त शक्य होते.
 
 
- गुंजन कुलकर्णी

 
(लेखिका नाशिक येथे बाल व
कुटुंब मनोविकासतज्ज्ञ आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@