दादासाहेब फाळके आणि भारतीय चित्रपटसृष्टीची व्यावसायिक वाटचाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-May-2018
Total Views |

 
१९१३ ला दादासाहेब फाळके यांनी मराठी चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. मुळात चित्रपटाला एक व्यवसाय म्हणून स्थापन करण्याचा उद्देश हा दादासाहेब फाळके यांचा होता. पुढे त्याच दृष्टिकोनातूनच त्यांनी वाटचाल केली. म्हणूनच दादासाहेब तोरणेंनी १९१२ साली प्रदर्शित केलेला ‘भक्त पुंडलिक’ चित्रपट हा काहीजण पहिला मानतात. तरी कलात्मकता आणि व्यावसायिक दृष्टिकोन याबाबतीत त्या चित्रपटात अनेक कमतरता होत्या. तो चित्रपट म्हणजे फक्त एका नाटकाचं कॅमेरा लावून एकाच अँगलमध्ये केलेलं चित्रीकरण होतं, तर संपूर्ण लांबीचा कथानक असलेला प्रथम भारतीय चित्रपट हा ‘राजा हरिश्‍चंद्र’ होता आणि त्याचं श्रेय दादासाहेब फाळके यांना जातं. दादासाहेब फाळके यांनी चित्रपट निर्मिती शिकण्यासाठी परदेश दौरा केला आणि चित्रपट तयार करण्यासाठी अगदी बायकोचे दागिने गहाण ठेवले. घरातल्या वस्तूही विकल्या. या सगळ्या गोष्टी सगळे जाणतातच आणि ‘हरिश्‍चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटात विस्तृतपणे प्रेक्षकांनी दादासाहेबांच्या चित्रपटनिर्मितीच्या कळा अनुभवल्याच. मात्र, त्यांना विदेशातून ‘ऑफर’ असताना ती ‘ऑफर’ धुडकावून त्यांनी भारतामध्येच चित्रपट निर्मितीच्या व्यवसायाला सुरुवात केली. मे महिन्यात त्या घटनेला १०५ वर्षं होत आहेत आणि १०५ वर्षांमध्ये चित्रपट उद्योगाचे स्वरूप हे आंतरबाह्य बदलेले आपल्याला दिसते.

१९१० च्या दशकामध्ये चित्रपटसृष्टीला सुरुवात झाल्यानंतर मुकपटांच्या त्या काळात एखादा चित्रपट किती दिवस चालतो, यावर त्या चित्रपटाचे यशापयश ठरवले जायचे. मग कालांतराने मुकपटांची जागा बोलपटांनी घेतली आणि बोलपट आल्यानंतर चित्रपट किती आठवडे चालतो, यावर चित्रपटाचे यश मोजता येऊ लागले. त्यावेळी एखादा चित्रपट चार आठवडे चालला म्हणजे तो खूप चालला, असे म्हटलं जातं.

स्वातंत्र्यानंतर भारतीय चित्रपटांचा सुवर्णकाळ सुरु झाला आणि त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणावर अतिशय हरहुन्नरी, मेहनती आणि सर्जनशील असे लोक चित्रपटसृष्टीशी जोडले गेले. के. आसिफ, राज कपूर, देवानंद, गुरु दत्त, बिमल रॉय, सत्यजित रे, व्ही. शांताराम, मेहबूब खान अशी अनेक नाव यात आपल्याला घेता येतील आणि त्यामुळे भारतीय चित्रपट हा व्यवसाय म्हणूनही स्थिरावला. तसेच परदेशात सुद्धा भारतीय चित्रपटांची कीर्ती पोहोचली. कालपरत्वे मग भारतीय चित्रपटसृष्टीची यशाची गणितंही बदलली आणि चित्रपट ५० दिवस चालला तर ‘हिट’, १०० दिवस चालला तर ‘सुपरहिट’, २५ आठवडे चालला तर ‘सिल्वर ज्युबली’, ५० आठवडे चालला तर ‘गोल्डन ज्युबली’ आणि ७५ आठवडे चालला तर ‘प्लॅटिनम ज्युबली’ अशी चित्रपटाच्या कीर्तिमानाची वर्गवारी. मात्र, त्या काळात चित्रपट निर्मिती खर्चिक होती आणि तो एक धोक्याचा व्यवसाय मानला जायचा. म्हणजे, जितकी अनिश्चितता ही चित्रपटाच्या व्यवसायात आहे, तितकी अनिश्चितता इतर कोणत्याही व्यवसायामध्ये नाही, असे आपण नक्कीच म्हणू शकतो. त्यामुळे अनेक लोकांनी या उद्योगामध्ये आपले हात पोळून घेतले.

चित्रपटाचा एक व्यवसाय म्हणून ज्यावेळेला १९५० च्या दशकामध्ये विचार करायला सुरुवात झाली, तेव्हा १९ मार्च १९५६ ला चित्रपट उद्योगातील सात वेगवेगळ्या युनियन होत्या, त्या एकत्र आल्या आणि ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न सिने एम्प्लॉइज’ची स्थापना करण्यात आली. ज्यावेळेला त्याकाळातील चित्रपटातील निर्माता, दिग्दर्शक, लेखक, नृत्यकलाकार आणि ज्युनिअर कलाकार या सगळ्यांचा त्यात समावेश होता. त्यानंतर एक ‘व्यवसाय’ म्हणून चित्रपट चालवला गेला आणि अनेक व्यावसायिक चित्रपटांची निर्मिती सुरु झाली. चित्रपटांच्या यशापयशाचा एक विशिष्ट ‘फॉर्म्युला’ तयार करून आणि त्याच ‘फॉर्म्युल्या’मध्ये चित्रपट तयार करणं सुरु झालं. परिणामी, एकाच पठडीचे सुरुवातीला दिलीप कुमार, राज कपूर, देवानंद या त्रयींच्या काळात आणि नंतर अमिताभ बच्चन आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून विनोद खन्ना, जितेंद्र नंतरच्या काळात अनिल कपूर अशा अनेक नटांना घेऊन चित्रपट येत राहिले. त्यानंतर १९९० साली आर्थिक उदारीकरण झाले आणि चित्रपटसृष्टीनेही कात टाकली. चित्रपटाचे प्रेक्षक हे ग्रामीण आणि शहरी प्रेक्षक असे होते. मात्र, उदारीकरणानंतर अर्ध शहरी आणि ग्रामीण असे प्रेक्षक तयार झाले आणि नव्या धाटणीचे, नवीन कथानक, भव्य-दिव्य चित्रपट आवडणारे अशी प्रेक्षकांची विभागणी झाली. त्याचबरोबर उदारीकरणामुळे आर्थिक, सांस्कृतिक, कलेच्या क्षेत्रात जे काही बदल झाले आणि त्याचा जो परिणाम झाला, त्याचे पडसाद चित्रपटांवरही दिसून आले. विदेशात अनेक मोठ्या निर्मात्यांनी चित्रपट वितरणाची कार्ये सुरु केली. चित्रपटाला ‘उद्योग’ म्हणून दर्जा देण्यात आला तो १९९८ मध्ये आणि हा दर्जा दिल्यानंतर या क्षेत्रात अनेक बदल झाले. १९९८ साली जे काही पारंपरिक पद्धतीने चित्रपटांसाठी पैसे काढले जायचे, त्याला एक औपचारिक दर्जा मिळाला. अर्थातच, त्यानंतर काळा पैसा, माफिया डॉनचा पैसा हे आजही चित्रपटसृष्टीत गुंतवल्याचे आपण जाणतोच. पण, चित्रपटनिर्मितीला रीतसर ‘उद्योगा’चा दर्जा मिळाल्यामुळे त्यावेळी बर्‍याच निर्मात्यांना याचा फायदा चित्रपटासाठी पैसा उभारण्यासाठी झाला आणि भारतीय उद्योगिक विकास बँक म्हणजेच (IDBI Bank) यांनी यात पुढाकार घेतला. १२ जणांची समिती IDBI बँकेने निवडली, जी चित्रपटांच्या स्क्रिप्टपासून त्याच्या निर्मितीपर्यंत स्वतः लक्ष ठेवून असते आणि त्या दृष्टिकोनातून चित्रपटाला वित्त पुरवठा केला जातो.

चित्रपटाच्या वितरणासाठी जे काही पारंपरिक प्रकार होते, त्यात ज्या तीन महत्त्वाच्या गोष्टी वितरणाच्या दृष्टिकोनातून होत्या, त्यातील एक म्हणजे चित्रपट थिएटर भाड्याने घेणे आणि भाड्याने घेतलेल्या थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित करणे. चित्रपटाच्या उद्योगात महत्त्वाचा दुवा म्हणजे, वितरक आणि प्रेक्षक भारतामध्ये सहा हजार सिंगल स्क्रीन थिएटर आहेत आणि दीड हजार मल्टिप्लेक्स थिएटर आहेत. मग यात fun republic, PVR, inox, big cinema ही काही मोठी नावं आहेत. या मल्टिप्लेक्सचे प्रस्थ उदारीकरणाच्या काळात वाढीस लागले. सिंगल स्क्रीनमध्ये जिथे दीड हजार प्रेक्षक यायचे, तिथे मल्टिप्लेक्समध्ये १५० ते ५०० पर्यंतचे मल्टिप्लेक्सच आले. त्याचप्रमाणे चित्रपट तयार झाल्यावर कमिशन म्हणून ते विकणे सुरु झाले, ज्यांनी तयार झालेले चित्रपट कमिशन स्वरूपात विकत घेतले आणि ते प्रदर्शित केले.

दुसरे म्हणजे, परदेशी असणारा भारतीय प्रेक्षकवर्गही या चित्रपटांमध्ये घेऊ लागला व यामुळे ‘डॉलर’ आणि ‘युरो’ मध्ये पैसा खेळू लागला. त्यानंतर चित्रपटांना कमाईसाठी नवीन साधनं उपलब्ध झाली. चित्रपट वितरण संबंधित एक म्हणजे चित्रपटाला प्रदर्शनवेळी मिळणारे पैसे. दुसरा म्हणजे चित्रपटाचे सीडी-डीव्हीडी तयार केले जातात ते आणि तिसरं म्हणजे, चित्रपटाचे टेलिव्हिजन विक्री, चौथे म्हणजे चित्रपटाच्या गाण्यांची विक्री आणि पाचवं म्हणजे चित्रपटाचे जागतिक, विदेशी अधिकार असे म्हटले जाते. तर या सर्वांतून चित्रपटसृष्टीला महसूल मिळतो.

तेव्हा असे म्हणता येईल की, चित्रपट उद्योग हा मोठ्या प्रमाणात विकसित झाला आहे. नुकतंच आमीर खान यांचा ‘पीके’, ‘दंगल’ भारतात तर तुफान चाललाच, परंतु चीनमध्ये ज्याने नाव कमावलं असा ‘The secret superstar’ हा चित्रपट, सलमान खानचा ‘बजरंगी भाईजान’, ‘बाहुबली’ हे चित्रपट विदेशात खूप चालले. ‘दंगल’ चित्रपटाने भारत आणि विदेशात मिळून दोन हजार कोटींचा व्यवसाय केला, तर त्यामुळे एक नवीन बाजारपेठ भारतीय चित्रपटाला मिळाली. आजच्या तारखेला भारतीय चित्रपटसृष्टीचा व्यवसाय हा १६ हजार कोटींचा आहे आणि दीड ते दोन हजार चित्रपट वर्षाकाठी बनतात आणि ते ही वेगवेगळ्या अशा २० भाषांमध्ये. त्यामध्ये साहजिकच हिंदी चित्रपटांचा मोठा वाटा आहे. त्याखेरीज चित्रपटाचा हा व्यवसाय २०२० पर्यंत २३ हजार कोटींपर्यंत जाईल, हे निश्चित.


- प्रा. गजेंद्र देवडा
@@AUTHORINFO_V1@@