दहशतवादी संघटना व इतर इस्लामी दहशतवादी गटांशी संबंध - भाग १

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-May-2018   
Total Views |




काही रोहिंग्या मुस्लिमांचे म्यानमार - बांगलादेश सीमेवर सार्वभौम मुस्लिम राष्ट्र करण्याचे उद्दिष्ट आहे व त्यादृष्टीने बऱ्याच दहशतवादी संघटना कार्यरत आहेत. १९८० च्या सुरुवातीला 'रोहिंग्या एकता संघटना' (आरएसओ- RSO- Rohingya Solidarity Organization) स्थापन झाली. त्यांच्या हालचाली व कार्यपध्दती अफ़गणिस्तानातील तालिबान व काश्मीरमधील ‘हिज्ब-उल्-मुजाहिदीन’ यासारख्या दहशतवादी संघटनांसारखी आहे. 'जमातुल मुजाहिदीन बांगलादेश' (JMB) व ‘हरकत-उल-जिहाद-अल-इस्लामी-बांगलादेश’ (हुजी-बी) ह्या दोन बंदी असलेल्या जिहादी संघटनांसोबत आरएसओ कार्यरत असल्याचा आरोप आहे. आरएसओने हे आरोप नाकारले आहेत. नुरुल इस्लाम हा आरएसओचा प्रमुख मानला जातो. ‘मवाळ’ असलेल्या ‘अराकन रोहिंग्या राष्ट्रीय संघटने'शी- (अरनो- ARNO- Arakan Rohingya National Organization) विलीनीकरण फ़सल्यानंतर आरएसओची अनेक शकले झाली. सर्वच गट स्वत:ला आरएसओ असे नाव लावतात. यांपैकी दोन गटांनी ‘अरकन रोहिंग्या इस्लामिक फ़्रंट’ नामक संघटनेशी १९९८ साली हातमिळवणी करून 'अरनो' नामक संघटनेत विलीन होण्याचा निर्णय घेतला. हे सर्व गट म्यानमार-बांगलादेश सीमेवर कार्यरत आहेत. अरनो, आरएसओ, आरएसओची विद्यार्थी शाखा म्हणून ओळखली जाणारी इस्तेहाबुल तुल्लाबुल मुसलेमीन (ITM) व अराकन संयुक्त राष्ट्रीय पक्ष (NUPA- National United Party of Arakan) हे सर्व बांगलादेशातील चित्तगावमधील कॉक्स बाजार, बंदरबन, खग्राछरी, रंगमती येथे सक्रिय आहेत. यासारख्या सर्व दहशतवादी गटांची एकूण संख्या सुमारे एक हजार असून त्यांचे जागतिक स्तरावरील अनेक इस्लामी दहशतवादी संघटनांशी लागेबांधे आहेत. आरएसओच्या किमान एका गटाला बांगलादेश व पाकिस्तान या देशांतील ‘जमात-ए-इस्लामी’, अफ़गाण सरदार गुलबुद्दीन हेकमत्यार याच्या नेतृत्वाखालील ‘हिज्ब-ए-इस्लामी’, 'हुजीब’ अशा विविध दहशतवादी संघटनांकडून आर्थिक व तांत्रिक साहाय्य मिळते असे दक्षिण आशियातील गुप्तचर संघटनांचे अहवाल आहेत. या सर्व संघटनांचा अल्-कायदाशी संबंध असल्याचे सांगितले जाते. ऑक्टोबर २००१ मध्ये अमेरिकन सैन्य अफ़गणिस्तानात शिरल्यावर त्यांच्या हाती बांगलादेशातील बंदरबन भागातील रोहिंग्या मुजाहिदीन प्रशिक्षण शिबिरांच्या चित्रफ़ीती पडल्या. अमेरिकन सैन्याविरूध्द लढणाऱ्या तालिबानी सैन्यात काही रोहिंग्या सैनिक सामील झाले होते. इस्लामी नेटवर्क तज्ञ सुबीर भौमिक अनुसार काश्मीर व चेचेन्या (रशिया) मध्ये जिहाद लढण्यासाठी रोहिंग्या स्वयंसेवक गेले होते. म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत अशी तक्रार ओसामा बिन लादेनने किमान एका ध्वनिफ़ितीत केली होती.

लिबिया, सौदी अरेबिया, पाकिस्तान व इराण या सर्व इस्लामी देशांचा रोहिंग्या मुस्लिमांना सक्रिय पाठिंबा आहे. सौदी अरेबियाच्या ‘रबिता अल्-आलम् अल्-इस्लामी’ (शब्दश: अर्थ जागतिक इस्लामी परिषद) यांसारख्या धनाढ्य इस्लामी संस्थांकडून सशस्त्र रोहिंग्या गटांना अर्थसाहाय्य दिले जाते. बांगलादेशातील कॉक्स बाजार भागात शस्त्रास्त्रांची मोठ्या प्रमाणावर तस्करी होते. दक्षिण आशियातील जिहादी गटांना ही शस्त्रास्त्रे पुरवली जातात. 'आंतरराष्ट्रीय इस्लामी सहाय्य समिती' (International Islamic Relief Committee) सारख्या धर्मादाय संस्था रोहिंग्या निर्वासितांना सहाय्य करत असतात. नोबेल शांतता पुरस्कार विजेती अशासकीय संघटना 'मेदेसिन्स सॅन्स फ्रंटियर' (MSM- Medecins sans Frontieres) संयुक्त राष्ट्रसंघाची निर्वासित संघटना 'संयुक्त राष्ट्रसंघ निर्वासित उच्च आयोग' (UNHCFR- United Nations High Commissions For Refugees) रोहिंग्यांना सहाय्य करण्यासाठी नेहमी अग्रभागी असतात. 'मेदेसिन्स सॅन्स फ्रंटियर'ने २६ नोव्हेंबर १९९२च्या प्रसिध्दीपत्रकात संकटात असणाऱ्या जगातील १० गटांपैकी एक अशी रोहिंग्यांची नोंद केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघसंबंधित इतर संघटना नेहमी म्यानमार सरकारला खलिते पाठवून रोहिंग्यांच्या स्थितीविषयी चिंता व्यक्त करून स्पष्टीकरण मागवत असतात. मानवतावादी संघटना 'अम्नेस्टी इंटरनॅशनल' म्यानमारने रोहिंग्यांशी कसे वागावे किंवा कसे इतर राष्ट्रांनी म्यानमारवर दडपण आणावे इत्यादी अनाहूत सल्ले देत असतात. ह्या so called मानवतावादी संघटना काश्मिरी पंडितांच्या छळाकडे नेहमीच दुर्लक्ष करतात व मूग गिळून गप्प बसतात. ह्याला सोयीस्कर किंवा निवडक मानवता म्हणतात.

अराकन रोहिंग्या साल्व्हेशन आर्मी (अर्सा- ARSA) चे अल्-कायदा, जमात-उद-दावा (JuD) व आखातस्थित इतर जिहादी गटांशी संबंध असल्याचा संशय आहे. कराची जन्मलेला, रोहिंग्या मूळ असलेला व मक्केत राहणारा मूलतत्त्ववादी नेता 'अताउल्लाह उर्फ अमीर अबु अमर, अबु अमर जुनूनी' अर्सा व 'हरकत-उल-याकिन' दोन्हीचा प्रमुख समजला जातो. काही सूत्रांनुसार 'अर्सा' ही संघटना हरकत-उल-याकिन मधूनच जन्मलेली आहे. ऑक्टोबर २०१६ मध्ये म्यानमारमधील सीमा सुरक्षा दलांवर झालेल्या हल्यानंतर अर्सा संघटना चर्चेत आली, ह्या हल्ल्यात ९ जण मृत्युमुखी पडले. इंटरनॅशनल क्रायसिस ग्रुपनुसार हरकत-उल-याकिन किंवा अर्साचे चालक पाकिस्तान, भारत व बांगलादेशातील ह्याचप्रकारच्या गटांशी जोडलेले आहेत.३

संदर्भः


१. Ozturk, Cem. Myanmar's Muslim sideshow, Asia Times Online, 21 October 2003


२. गोडबोले, डॉ.श्रीरंग; बौध्द-मुस्लिम संबंध- आजच्या संदर्भात, तक्षशिला प्रबोधिनी प्रकाशन, २००९, पृष्ठ ११२


३. Dutta, Prabhash K. Why Centre may have a point in calling Rohingya Muslims a security threat, India Today, 15 September 2017
 
 
- अक्षय जोग 
@@AUTHORINFO_V1@@