बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी संवेदनशीलतेची गरज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-May-2018
Total Views |

राज्य बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांचे आग्रही प्रतिपादन

जळगाव, १२ मे :
बालकांचे हक्क, सुरक्षा हा सर्वार्थाने सर्वाधिक चिंतेचा आणि म्हणून प्राधान्याचा विषय आहे. त्यांचे संरक्षण व्हावे.वय वर्ष ० ते १८ वर्षदरम्यानच्या बालकांचा सर्वांगिण विकास व्हावा, ही सर्व समाजघटकांची जबाबदारी आहे. त्यासाठी संवेदनशीलतेची गरज आहे, असे आग्रही प्रतिपादन महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी आज येथे केले.
केशवस्मृती प्रतिष्ठानच्या समतोल प्रकल्पातर्फे शनिवारी अल्पबचत भवनात ‘बालहक्क काळजी व सुरक्षा कायदा’ या खान्देशस्तरीय मोफत कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मंचावर त्यांच्यासह ‘समतोल’चे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव (मुंबई), रेल्वेचे सिनियर डीसीएम सुनील मिश्रा, केशवस्मृती प्रतिष्ठानचे सचिव रत्नाकर पाटील, ‘समतोल’च्या व्यवस्थापिका सपना श्रीवास्तव होत्या.
बालकांचे हक्क, काळजी व त्यांची सुरक्षितता आणि कल्याणासाठी विविध कायदे अस्तित्वात येत आहे. उन्नाव आणि कठूवा आणि सातत्याने कुठे ना कुठे वाढणारे अत्याचार या पार्श्वभूमीवर ही खान्देशस्तरीय कार्यशाळा झाली. बालकांच्या विषयात संबंधित यंत्रणांमधील अधिकारी, पदाधिकारी आणि सेवा कार्यात सहभागी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविकात रत्नाकर पाटील यांनी ‘समतोल’च्या कार्याची ओळख, गरज, उपलब्धी आणि कार्यशाळेच्या हेतूंबाबत विवेचन केले. घुगे यांचे स्वागत प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष आणि निवृत्त शिक्षणाधिकारी नीळकंठ गायकवाड आणि मिश्रा यांचे स्वागत रत्नाकर पाटील यांनी केले. दीपप्रज्ज्वालन कोथळी ता.मुक्ताईनगरचा राष्ट्रपती शौर्य पुरस्कारप्राप्त विद्यार्थी निलेश भील याच्या हस्ते झाले. रेल्वे स्थानकावर आढळणार्या एकाकी मुलांना आधार देत परिवारात परत पाठविणे वा पुनर्वसन या ‘समतोल’ च्या अलौकिक कार्यासंबंधीची माहितीपर चित्रफीत दाखवण्यात आली.
३ सत्रात अभ्यासपूर्ण मार्गदर्शन
नंतर विविध एकूण ३ सत्रात अभ्यासपूर्ण मार्गदर्शन झाले. ‘बाल सुरक्षा व कायदे’ यावर ऍड. अर्चना भदादे आणि ‘पॉस्को कायदा २०१२ आणि बाल हक्क’ यासंबंधी विख्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रदीप जोशी यांनी पावर पाईंटद्वारे मार्गदर्शन केले.
भयावह वास्तव
बालकांवरील विविध प्रकारच्या अत्त्याचारांबाबतचे भीषण वास्तव (ते ही परिवारात आणि परिचितांकडून जास्तच) तसेच नमुन्यादाखलची आकडेवारी चिंतीत करणारी ठरली. तिसर्या सत्रात ‘बाल हक्क कायदा व वास्तव आणि आपला सहभाग’ यावर विजय जाधव आणि समतोलच्या समन्वयिका आरती नेमाणे (मुंबई) यांनी संवाद साधला. त्यांचे स्वागत प्रतिष्ठानचे संचालक कांतीलाल बडाले आणि माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे सचिव स्वप्निल चौधरी यांनी केले.
समारोप सत्र
समारोप रेल्वेचे डी.आर.एम.आर. के. यादव, केशवस्मृती सेवासंस्था समुहाचे प्रमुख भरतदादा अमळकर, समतोल फाउंडेशनचे सचिव विजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रतिष्ठानचे जनसंपर्क अधिकारी कृणाल महाजन यांनी केले. आयोजक संस्थांच्या पदाधिकारी, सहकार्‍यांनी परिश्रम घेतले.
 
‘समतोल’चे कार्य प्रशंसनीय, रेल्वे प्रशासन सहकार्य करील...
भुसावळ विभागात ‘ऑपरेशन मुस्कान’ द्वारे ३३५ मुलांना त्यांच्या परिवारात परत पाठवण्यात आले. रेल्वेस्थानकावर बेवारस, एकाकी आढळणार्‍या मुलांना आपल्या घरी कुटुंबात परत पाठवण्याचे कार्य ‘समतोल’ करते, हे कार्य प्रशंसनीय आहे. रेल्वे प्रशासन या कामी सहकार्य करील.
- सुधीर मिश्रा, रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक
मुलांना शिक्षण देणे हाच उत्तम पर्याय
मुलं ही देशाची संपत्ती आहे, तिची सर्वार्थाने काळजी घेत तिला मुख्य प्रवाहात आणण्याचे हे प्रामाणिक काम प्रशंसनीय आहे. अशा मुलांना खायलाप्यायला देण्यापेक्षा शिक्षण दिले तर ते त्यांचे आयुष्य उभे करु शकेल. रेल्वे प्रशासन आणि संबंधीत सारे या मानव-राष्ट्रसेवेच्या कार्यात सहकार्य करील. समाजानेही या सत्कार्याला साथ द्यावी.
- आर.के.यादव, व्यवस्थापक, भुसावळ रेल्वे विभाग (डीआरएम)
समाज आणि प्रशासनाच्या सजगतेची आवश्यकता
बालक आपल्या हक्काबाबत अनभिज्ञ आणि जाणीवविहिन असतात. म्हणून परिस्थितीवश संबंधित कायद्यांमध्ये दुरुस्ती, कठोर तरतुदी कराव्या लागताहेत. त्यांची सुरक्षितता, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विकास ही पालक, समाज आणि शासनाच्या संबंधित सर्व यंत्रणांची जबाबदारी आहे, बालसुरक्षा हा सर्वार्थाने सर्वाधिक प्राधान्याचा विषय आहे.
- प्रवीण घुगे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोग
क्षणचित्रे
* सकायदा व वास्तव यात समन्वय साधणे हे समतोलचे काम आहे. मुंबईत रेल्वेस्थानकावर एकाकी आढळलेल्या मुुलाला नांदेडला त्याच्या घरी पोहोचवण्यासाठी गेलो असता या कार्याची गरज जाणवली आणि १५ वर्षापूर्वीच ‘समतोल’ स्थापनेची प्रेरणाही मिळाली. कुणीही मुलगा अनाथ असत नाही, त्याची ओळख कायम राहावी आणि परिवारात राहाता यावे,यासाठी कुणीही वेगवेगळ्या पद्धतीने मदत करु शकतो. त्यासाठी निधीपेक्षा जास्त गरज आहे समाजाच्या दातृत्त्वाची, जागरुकतेची...तरच या बालकांवरील अनेकविध प्रकारच्या अत्याचार, उपेक्षेच्या समस्यांची तीव्रता कमी होईल.
- विजय जाधव, संस्थापक अध्यक्ष ‘समतोल’ प्रतिष्ठान, मुंबई
* मुलांवर होणारे शारिरिक, मानसिक, भावनिक अत्याचार घरात किंवा परिचितांकडून जास्त प्रमाणात होतात, ते रोखण्यासाठी विशेष यंत्रणा नाही. घराघराच्या उंबरठ्यावर अत्याचार पोहोचत आहेत. आमच्या या समाजसेवी उपक्रमांना पोलीस, रेल्वेचा सहभाग चांगला मिळत आहे. बालवयीन मुलामुलींच्या सुरक्षितता व मानवी हक्कांसाठी अधिक सजगता,संवेदनक्षमता आवश्यक आहे, ती सामाजिक कर्तव्यभावना व्हावी.
- भरतदादा अमळकर, अध्यक्ष, केशवस्मृती सेवासंस्था समूह
* ‘समतोल’ प्रकल्पातील लाभार्थी एकाकी मुलांसाठी निवारा परवाना (शेल्टर लायसन्स) येत्या २ महिन्यात मिळणार...
* ‘केशव स्मृती आणि समतोल’ १५ जूनपासून चाईल्ड लाईन सुरु करणार...
* आयोजन संस्थेच्या शिस्त नियोजन अतिशय आश्‍वीन व अनुशासनानुसार रेखीव होते. आश्‍वीव व राखीव होते. त्यानुसार कार्यशाळेत एकूण ५ सत्रे झालीत.
* प्रारंभी ‘समतोल’ प्रकल्पासंबंधी चित्रफित दाखवण्यात आली, ती समर्पक आणि प्रभावी ठरली.‘चलो हम सब बालप्रेमी बने’ असा संदेश तिने दिला.
* बाल सुरक्षा आणि कल्याणाशी संबंधित शासन, प्रशासनातील अधिकारी, प्रतिनिधी तसेच या क्षेत्रातील सेवाकार्याशी संबंधित प्रतिनिधी सहभागी झाले होेते.
* विषयाची व्याप्ती, गांभीर्य आणि त्याचे विविध पैलू, कंगोरे यावरील मनन, चिंतन, मंथन आणि मार्गदर्शन, त्यांचा आवाका मोठा आणि चिंतेचा विषय आहे, हे ठसवणारा ठरला.
* उद्घाटन अभिनव रितीने झाले. राष्ट्रपतीतर्फे प्रदान झालेला बालशौर्य पुरस्कारप्राप्त निलेश भील्ल याच्याहस्ते दीपप्रज्ज्वलन झाले.त्याच्या शिक्षणाची व्यवस्था केशवस्मृती सेवा संस्था समुहातील विवेकानंद प्रतिष्ठानच्या शाळेत करण्यात आली आहे. हे जाहीर होताच टाळ्यांचा कडकडात झाला. बालकांप्रती संवेदना बाळगण्याची जीवनदृष्टी मिळाली, असा सूर बहुतेक प्रतिनिधींनी व्यक्त केला.
 
 
@@AUTHORINFO_V1@@