महिला क्रिकेटचा इतिहास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-May-2018
Total Views |




“कोण जिंकतंय?”
“मी फक्त भारत पाकिस्तान च्या मॅचेस बघते!”
“मला फक्त वर्ल्डकप बघायला आवडतो!”
“वर्षभर सतत काय ते क्रिकेट टीव्हीवर सुरू असतंच!”
“सचिन रिटायर झाला आणि आम्ही क्रिकेट बघणं सोडलं!’
“धोनी कित्ती हँडसम आणि क्युट आहे!”
“ मी फक्त विराट आणि धोनीसाठी मॅच बघते!”
अश्या प्रतिक्रिया, असं बोलणं बहुतेकवेळी स्त्रियांकडून, मुलींकडून क्रिकेट संदर्भात ऐकायला मिळतं.
अगदीच क्रीडा पत्रकार मुली आणि काही अपवाद सोडता, सामान्यतः सगळ्या मुली, स्त्रिया क्रिकेट संदर्भात ‘अपडेटेड’ असतातच किंवा त्यांना तितका रस असतोच असे नाही. सर्वसामान्य कुटुंबात एरवी मुलांनाच खेळांसाठी प्रोत्साहन कमी मिळतं तिथं मुलींचा ओढा क्रिकेटकडे कमीच असतो. एरवी मुली व्हॉलीबॉल, रनिंग, जिमनॅस्ट यांत शाळा कॉलेजपासून भाग घेतात पण क्रिकेटमध्ये सर्वसामान्यपणे कमीच.
परिणामी एकूणच महिला क्रिकेटला कित्येक वर्षे ‘ग्लॅमर’ नव्हतं. शिवाय पुरुष क्रिकेटकडे संपूर्ण ओढा, ग्लॅमर, स्टारडम असल्यामुळेही महिला क्रिकेटकडे लोकांचा विशेषतः भारतात प्रेक्षकांचा रस कमी होता.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातील अॅशेस पहाटे उठून बघतात, वेळ पडल्यास रिकाम्या स्टेडियममधील पीएसएल बघून पाकिस्तानमधील स्थानिक क्रिकेटर्सचे नावे कळतील पण भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट टीममधील महिला क्रिकेटर्सचे नावेही प्रेक्षकांना माहिती नसतात. किंबहुना नसायची. पुरुष क्रिकेट टीमकडेच माध्यमांचा ओढा असायचा. आणि ते साहजिकही होतं. पुरुष क्रिकेटला ग्लॅमर, जाहिराती, टीआरपी जास्त असल्याने तांत्रिक गोष्टींचा विचार करता पुरुष क्रिकेट हेच भारतात प्रमुख मानलं जातं. शिवाय वेळोवेळी पुरुष क्रिकेट संघामध्ये, सुनील गावस्कर, कपिल देव, सचिन तेंडुलकर, विराट कोहली सारखे स्टार्स मिळत गेलेत त्यामुळेही महिला क्रिकेट झाकोळलं गेलं. पण आता तसं नाही.
नुकत्याच आटोपलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय महिला खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली. दक्षिण आफ्रिका दौरा हा क्रिकेटमधील एक कठीण दौरा मानला जातो. तिथे भारतीय महिला क्रिकेट टीमने दक्षिण आफ्रिकेला दक्षिण आफ्रिकेत वन-डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट मालिकेत यश मिळवले. हा दक्षिण आफ्रिका दौरा भारतीय क्रिकेट इतिहासातील एक सुवर्णपान ठरणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेची दाणादाण उडवली.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या महिला वन-डे क्रिकेट वर्ल्डकपपासून महिला क्रिकेट टीम संबंधित गोष्टी बदल्यात.
कपिल देवच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये झालेला 1983 चा वर्ल्डकप भारताने जिंकल्यावर भारतात क्रिकेट लोकप्रिय खेळ बनला. खेळात पैसा आला. तश्याच प्रकारे 2017 च्या इंग्लंडमधील वर्ल्डकपनंतर महिला क्रिकेट मॅचेसही चॅनेल्स आता नियमितपणे दाखवू लागलेत.
आजवर मिथाली राज, झुलन गोस्वामी, अंजुम चोप्रा याच खेळाडू त्यांनी चांगली कामगिरी केल्यामुळेच लोकांना माहिती होत्या. अंजुम चोप्रा निवृत्त होऊन काळ लोटला. मिथाली राज आणि झुलन गोस्वामी शेवटच्या टप्प्यात आहेत. पण आता मात्र महिला क्रिकेट टीमला चांगले दिवस आले आहेत.
देर आये दुरुस्त आये! म्हणतात ते हेच... स्मृती मंधाना, जेनिमा रोड्रिक्स ह्या आता स्टार खेळाडू आहेत. त्यांना मीडियाद्वारे लोक ओळखायला लागले आहेत.
महिला क्रिकेट इतिहासाचा विचार केल्यास क्रिकेटमधील बॉल थेट सतराव्या शतकात इंग्लंड येथील ससेक्स गावात जाऊन पडतो. महिला क्रिकेटचा प्रथम सामना तेथे खेळला गेला. अर्थातच इंग्लंड हा क्रिकेटचा जन्मदाता असल्याने महिला क्रिकेटही तेथेच जन्माला आलं. स्कर्ट्स परिधान करून तत्कालीन महिला प्रथम क्रिकेट सामना खेळल्या होत्या.
इंग्रजांनी जगात जेथे जेथे राज्य स्थापन केले तेथे क्रिकेट आणि चहाचं व्यसन लागत गेलं. इंग्रज गेले पण क्रिकेट आणि चहा मागे ठेवून गेलेत. पुढे देशोदेशी क्रिकेट बहरत गेलं. स्त्री पुरुष भेदाच्या पलीकडे गेलं.
 
1934 साली प्रथम महिला कसोटी सामना खेळला गेला. तो सामना झाला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड महिला संघादरम्यान.
1973 मध्ये भारतात वुमन्स क्रिकेट असोसिएशन स्थापन झालं. या सार्वभौम संस्थेखाली 1976 साली वेस्ट इंडिज विरुद्ध प्रथम भारतीय महिला कसोटी क्रिकेट सामना खेळला गेला.
भारतीय महिला क्रिकेट संघाने आपला पहिला कसोटी विजय वेस्ट इंडिज विरुद्ध नोव्हेंबर 1978 मध्ये मिळवला. तेव्हा भारतीय महिला संघाचे नेतृत्व करत होत्या शांता रंगस्वामी. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या पहिल्या कर्णधार डायना एडूलजी या होत्या.
1978 च्या महिला क्रिकेट विश्वकपमध्ये भारतीय महिला संघाने आपला प्रथम एक दिवसीय सामना खेळला. तो विश्वकप भारतातच खेळला गेला होता.
तिथून महिला क्रिकेट देशात खेळले गेले पण हवे तसे रुजले नाही. किंबहुना सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहचले नाही. 2005 नंतर वूमन्स क्रिकेट असोसिएशन हे आयसीसीमध्ये एकरूप झाले आणि तिथून महिला क्रिकेटची प्रगती वेगाने होऊ लागली.

पुढे मिथाली राज ही स्टार खेळाडू भारतीय महिला संघाची कर्णधार बनली. ती पहिली महिला क्रिकेट ग्लॅमरस खेळाडू म्हणता येईल.
 
मिथाली राज ही महिला क्रिकेट जगतातील सगळ्यात जास्त वन-डे रन्स केलेली महिला खेळाडू आहे. ती सगळ्यात यशस्वी भारतीय महिला कर्णधारसुद्धा आहे. सगळ्यात जास्त विजय तिच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने मिळवले आहेत.
आजवर तेरा महिला भारतीय क्रिकेट टीमच्या कर्णधार झाल्यात. डायना एडूलजी, शांता रंगस्वामी ते आजच्या मिथाली राज, हरमनप्रीत कौरपर्यंत. सध्या वन-डे आणि कसोटी संघाचं नेतृत्व मिथाली राज तर ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट संघाचं नेतृत्व हरमनप्रीत कौर करते. डायना एडुलजी यांनी भारतीय महिला क्रिकेटसाठी खूप मेहनत घेतली. त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.

डायना एडुलजी यांनी पुढाकार घेतल्याने, त्यांच्या नेतृत्वाखाली महिला क्रिकेटमध्ये खूप सकारात्मक बदल घडलेत. महिला क्रिकेट बीसीसीआयमध्ये सामील झाल्यावर त्यांनी खूप त्यांनी महिला क्रिकेटसाठी खूप काम केलं. त्यामुळे आता महिला क्रिकेटपटूला पेंशन मिळू लागलीये. शिवाय महिला क्रिकेटपटूला एक हाती रक्कम मिळू लागली. त्यांना नुकताच सी. के. नायडू पुरस्कार देण्यात आला. पण काही तांत्रिक कारणामुळे त्यांनी तो परत केला.
"संगीता कामत" या सुद्धा एक लढाऊ अष्टपैलू मराठी क्रिकेटपटू होत्या. त्यांच्या दोन्ही गुडघ्यावर शस्त्रक्रिया होऊन देखील योग्य शारीरिक व्यायामामुळे, फिटनेसमुळे त्या पुढे आणखी तीन वर्षे खेळल्या.
भारतीय महिला संघाने आजवर वर्ल्डकप जिंकला नाही. पण दोनदा वर्ल्डकप फायनलमध्ये पोहचले आहेत. मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्डकपमध्ये भारतीय टीम फायनलमध्ये पोहचली होती. अंतिम सामना यजमान इंग्लंड संघाविरुद्ध झाला. पण अगदी हातातोंडाशी आलेला विजय निसटला. त्या सामन्यात शेवटचा बॉल पडला आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे काही वेळापूर्वी पाऊस पडून सामना रद्द झाला असता तर तो सामना दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसऱ्या दिवशी खेळला गेला असता. वर्ल्डकप अंतिम सामन्यात डकवर्ड लुईस सिस्टीम अवलंबल्या जाणार नव्हती.
भारत अंतिम सामना हरला मात्र तिथून महिला संघासाठी गणिते योग्यप्रकारे बदली. महिला संघाचे माध्यमांद्वारे कधी नव्हे इतके कौतुक झाले. भारतीय महिला संघाची कामगिरी आणि खेळाडू लोकांपर्यंत पोहचली.
झुलन गोस्वामी ही भारतीय ज्येष्ठ खेळाडू आहे. ती जगातील सर्वश्रेष्ठ वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. नुकताच तिने आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोनशे बळी घेणारी प्रथम गोलंदाज म्हणून विक्रम केला आहे.
पुरुष क्रिकेट आणि महिला क्रिकेटमध्ये काही तांत्रिक फरक आहेत. महिला क्रिकेट सामन्यात सीमारेषा ही पुरुष क्रिकेट सामन्यात असलेल्या सीमारेषेपेक्षा छोटी असते. महिला क्रिकेटमध्ये वापरला जाणारा बॉल हा वजनाने पुरुषांच्या क्रिकेट सामन्यातील बॉलपेक्षा हलका असतो. यामागे शारीरिक शक्ती संबंधित कारणे आहेत. महिला क्रिकेट निवड समिती ही तीन सदस्यीय आहे. माजी क्रिकेटर हेमलता काला या अध्यक्ष असून लोपामुद्रा बॅनर्जी आणि शशी गुप्ता हे इतर दोन सदस्य आहेत.
सध्या भारतीय महिला संघाची स्टार खेळाडू आहे ती सांगलीची स्म्रिती मंधाना. ही डावखोरी सलामीवीर आहे. ‘नजाकत’ असलेले क्रिकेटमधील सर्व शॉट्स खेळते. ऑन साईड, ऑफ साईड दोन्हीबाजू तिचे बलस्थाने आहेत. हूक पूल, ड्राइव्ज सर्व शॉट्स तिच्याकडे आहेत. शिवाय ती आक्रमक फलंदाजी करते. एक अत्यन्त नम्र, हसमुख, जमिनीवर पाय असलेली ती फलंदाज ती आहे. तिच्या मुलाखती दरम्यानही तिची देहबोली अगदी नम्र, आणि क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटणारी खेळाडू प्रमाणे असते. नुकताच तिने ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक करण्याचा मान मिळवला आहे. ती एक चांगली क्षेत्ररक्षकसुद्धा आहे. शारीरिक उंची लाभल्यामुळे ती सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करते. नुकताच आटोपलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सीमारेषेवर स्म्रिती मंधानाने अप्रतिम झेल पकडलेत आणि सुरेख क्षेत्ररक्षण केले होते. भारतीय महिला संघाची स्म्रिती मंधाना ही भविष्य आहे. पुढील कर्णधार तीच असणार आहे.
जेनिमा रॉड्रिक्स ही एक अत्यंत गुणवान सतरा वर्षाची अस्सल मुंबैया खेळाडू. घरगुती सामन्यात द्विशतक केल्याने ती चर्चेत आली. आणि भारतीय संघात तिला स्थान मिळाले. क्षेत्ररक्षक म्हणूनही ती फार चपळ आहे. शिखा पांडे ही भारतीय वायुसेनेत काम करते. ती वेगवान गोलंदाज आहे. इंग्लंडमध्ये वर्ल्डकपमध्ये तिने चांगली कामगिरी केली होती.
पूनम यादव ही भारतीय संघातील लेग स्पिनर आहे. लेग स्पिन हे क्रिकेटमधील विशेष कौशल्य असते. जे जास्त वेळ दुर्लक्षिल्या जाऊ शकत नाही. पण लेग स्पिनरकडे एक महत्त्वाची गोष्ट असावी लागते ती म्हणजे हिंमत. धैर्य. लेग स्पिनर खेळाडू नेहमी प्रतिस्पर्धी संघाची विकेट मिळवून देणारा आक्रमक गोलंदाज असतो. तिथे घाबरून जाऊन ‘सुरक्षित’ गोलंदाजी करणे हा ऑफ स्पिनरकडे असलेला पर्यायच उपलब्ध नसतो. “आर या पार” हेच नेहमी लेग स्पिनर करत असतो. कारण बरेचदा लेग स्पिनरला प्रतिस्पर्धी फलंदाज आपलं लक्ष करतो. लेग स्पिनरची खरी शक्ती असते ती बॉल देण्यात येणाऱ्या ‘फ्लाईट’ मध्ये. फ्लाईट.. उंची शिवाय लेगस्पिनर म्हणजे दात, नखे नसलेला वाघ होतो. भारताची पूनम यादव ही सर्वगुणसंपन्न अशी लेग स्पिनर आहे. तिच्यात प्रचंड हिंमत, धैर्य आहे. अगदी शेवटच्या हाणामारीच्या षटकांतसुद्धा ती बॉलला उंची देते. अनुजा पाटील ही आणखी एक मराठी खेळाडू भारतीय संघात आहे. ती अष्टपैलू खेळाडू आहे. फलंदाज आणि ऑफ स्पिन गोलंदाजी ती करते. पूजा वस्त्रकार या मराठी खेळाडू सोबत तिचा मराठीतील बोलणं स्टंपमाईकमधून ऐकू येत राहतं. वेदा कृष्णमूर्ती ही आघाडीची फलंदाज आहे. तिचाही खेळ वर्ल्डकप आणि नुकत्याच आटोपलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात बहरला होता.

हरमनप्रीत कौर! ही पंजाबी कुडी टीममधील अँग्री यंग वुमन आहे. ती अत्यंत आक्रमक फलंदाज आहे. वर्ल्डकपमधील तिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमिफायनलमध्ये काढलेले शतक प्रसिध्द आहे. हरमनप्रीत कौर ही ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये भारतीय संघाची कर्णधार आहे. भारतीय महिला संघाची घोडदौड वेगाने सुरू आहे.

स्म्रिती मंधाना आता जाहीरातीमध्येही दिसायला लागली आहे. प्रेक्षक आणि टीव्ही ब्रॉडकास्टर्स आता महिला क्रिकेटला गांभीर्याने घेताहेत. ऑगस्टमध्ये भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघाचा खडतर असा इंग्लंड आणि डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौरा आहे. महिला आणि पुरुष क्रिकेट संघ आता बरोबरीने क्रिकेट खेळायला लागले आहेत. ज्या प्रकारे भारतीय महिला संघ कामगिरी करतो आहे त्यावरून भारतीय महिला क्रिकेटचे अच्छे दिन आता सुरू झाले आहे असे म्हणायला हरकत नाही.


- अभिजीत पानसे
@@AUTHORINFO_V1@@