माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांची आत्महत्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-May-2018
Total Views |




मुंबई : राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक तसेच माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांनी आज मुंबई येथे स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी हे कृत्य केले असून आपल्या आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास केला जात असून रॉय यांच्या आत्महत्येमुळे राज्यात मात्र एकच खळबळ उडाली आहे.


गेल्या अनेक दिवसांपासून रॉय हे कॅन्सरच्या आजाराने त्रस्त होते. आपल्या या आजरावर उपचार करण्यासाठी म्हणून त्यांनी याअगोदर अनेक वेळा गृह मंत्रालयाकडून रजा देखील घेतल्या होत्या. तसेच अनेक तज्ञ डॉक्टरांकडून त्यांच्या आजारावर उपचार सुरु होते. परंतु आजाराचे योग्य निदान होत नसल्यामुळे या आजाराला वैतागून त्यांनी स्वतःवर गोळी झाडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान रॉय यांचा मृतदेह पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतला असून मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृतदेह ठेवण्यात आला आहे.
 

कोण होते हिमांशू रॉय ?

रॉय हे १९८८ च्या महाराष्ट्र कॅडर बॅचचे आयपीएस अधिकारी होते. आपल्या ३० वर्षांच्या कारकीर्दीमध्ये राज्य पोलीस प्रशासनातील अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली होती. रॉय यांची सर्वात प्रथम १९९५ मध्ये नाशिक ग्रामीणमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर त्यांना नगरमधील आर्थिक गुन्हे विभागाची जबाबदारी देण्यात आली. यानंतर २००४ ते २००७ दरम्यान ते नाशिकचे पोलीस आयुक्त झाले. याच दरम्यान त्यांनी खैरलांजी प्रकरणाचा छडा लावला होता. त्यांच्या या कामगिरीनंतर त्यांना मुंबई पोलिसांचे सहआयुक्त करण्यात आले आहे. दरम्यान यानंतर त्यांना सायबर क्राईम सेल व त्यानंतर महाराष्ट्र एटीएसची जबाबदारी देण्यात आली. राज्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक पदाची देखील धुरा त्यांनी काही काळ सांभाळली होती.


रॉय यांनी अनेक महत्त्वाची प्रकरणी हाताळली असून ती सोडवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. यामध्ये दाऊद इब्राहीमचा भाऊ इकबाल कासकर याचा ड्रायव्हर अरिफवरील गोळीबार प्रकरणपासून ते २०१३ मधील आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणासारख्या अनेक हायप्रोफाईल गुन्ह्यांचा त्यांनी छडा लावला होता. रॉय यांच्या या कामगिरीमुळे पोलीस दलामध्ये त्यांना एक आदराचे स्थानप्राप्त झाले होते. त्यामुळे त्यांच्या कृतीमुळे पोलीस दलामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
 

रॉय यांनी सोडवलेली काही प्रकरणे

 १. दाऊद इब्राहीमचा भाऊ इकबाल कासकर याचा ड्रायव्हर अरिफवरील गोळीबार प्रकरण

 २. पत्रकार जेडे हत्या प्रकरण

 ३. विजय पालांडे प्रकरण

 ४. लैला खान डबल मर्डर केस

 ५. खैरलांजी प्रकरण

 ६. २०१३ मधील आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरण, या प्रकरणासाठी त्यांनी विंदू दारासिंहला अटक केली होती. .

@@AUTHORINFO_V1@@