पुन्हा एकदा कार्ल मार्क्स 2.0

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
भारताच्या एकूणच विचारविश्वावर दोन विचारवंतांचा आजही फार मोठा प्रभाव आहे. कार्ल मार्क्स व मॅक्स वेबर. कार्ल मार्क्स हे केवळ अर्थतज्ज्ञ नव्हते, तर तत्त्वज्ञानी, इतिहासकार, राजकीय विचारवंत, समाजशास्त्रज्ञ, पत्रकार आणि क्रांतिकारी समाजवादी होते. मॅक्स वेबर हे समाजशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञानी व राजकीय अर्थशास्त्री होते. योगायोग म्हणजे मार्क्स व वेबर हे दोघेही मूळ जर्मनचे. मार्क्स भांडवलशाहीच्या विरोधात, तर वेबर हे भांडवलशाहीचे अभ्यासक. वेबर यांचे दोन प्रमेय खूप गाजले. एक म्हणजे आर्थिक समाजवाद (इकॉनॉमिक सोशॅलॉजी) व धर्माचा समाजवाद (सोशॅलॉजी ऑफ रिलिजन). सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक चिंतनाला एक वेगळी दिशा देण्याचे काम मॅक्स वेबर यांच्या विचारांनी केले आहे. अर्थातच, हे सारे पाश्चात्त्य देशांच्या तसेच समाजाच्या संदर्भात होते. या दोघांचे आणखी एक साम्य म्हणजे, या दोघांनीही भारतीय समाजाबाबत जी मते व निष्कर्ष प्रकट केले आहेत, ते वास्तवापासून दूर आणि पाश्चात्त्यांच्या चष्म्यातून बघितल्यासारखी आहेत. दोघांचेही निष्कर्ष चुकीचे होते आणि ते पुढे भविष्यात तसे सिद्धही झाले. असे असतानाही, भारताच्या विचारविश्वावर या दोघांचा प्रभाव आश्चर्यकारक व चिंताजनक म्हणाला लागेल. स्वातंत्र्यानंतर तरी हा प्रभाव निवळेल अशी आशा होती, परंतु तसे झाले नाही. आता तर जगात या दोघांच्या विचारांचा फोलपणा अधिकाधिक स्पष्ट होत असतानाही, भारतात मात्र मार्क्स आणि वेबर यांच्या विचारांचा विळखा सैल होण्याचे नावही घेत नाही आहे. ही आम्हा भारतीयांची नालायकीच म्हणावी लागेल.
 
 
5 मे रोजी कार्ल मार्क्स यांची 200 वी जयंती होती. त्यानिमित्त भारतात पुन्हा एकदा कार्ल मार्क्स यांच्या विचारांची उजळणी करण्यात आली. भारतातील कम्युनिस्टांनी तसेच अमर्त्य सेन व शी जिनिंपग यांनीदेखील, कार्ल मार्क्स आज किती प्रासंगिक आहे, हे जाहीर करून टाकले. कन्हैयाकुमार यांच्यासारख्या उथळ नेत्याने, कार्ल मार्क्स यांना अभिप्रेत असणारे वर्गविहीन समाजाचे स्वप्न भारतात साकार करण्यासाठी, आपली प्रतिबद्धता जाहीरपणे व्यक्त केली.
 
सामाजिक, राजकीय व आर्थिक विचारांचे जागतिक स्तरावर जे विचारमंथन सुरू असते, त्यात भारताची भूमिका काय आहे, भारताचेही काही सामाजिक, राजकीय व आर्थिक चिंतन आहे का, याकडे कुणीही लक्ष देत नसल्याचे लक्षात येईल. त्याचे कारणही आहे. भारत हा जेता नाही. तो गुलाम होता. त्यामुळे गुलामाच्या (असलेच तर) विचारांना काय महत्त्व द्यायचे, असा भाव जागतिक विचारवंतांचा असेल आणि त्यात त्यांचे काही चुकत आहे, असेही नाही. परंतु, भारतीयांनी तर याबाबत काही पुढाकार घेतला आहे का? तर तसेही नाही. आपण म्हणतो की, भारत देश नररत्नांची खाण आहे. परंतु, स्वातंत्र्यानंतरचा विचार केला तर, पिकाऐवजी तणच बेसुमार माजले आहे!
 
जगाने मानलेला थोर आर्थिक इतिहासकार अँगस मॅडिसन यांनी 20 वर्षे संशोधन करून सिद्ध केलेला ‘द वर्ल्ड इकॉनॉमी : मिलेनियल परस्पेक्टिव्ह’ हा ग्रंथ, किती अर्थतज्ज्ञांनी व सामाजिक विचारवंतांनी वाचला आहे? होकारार्थी उत्तर देणारे हाताच्या बोटांवर मोजता येतील. या ग्रंथात मॅडिसन यांचा निष्कर्ष हा आहे की, इसवी सन एक ते इसवी सन 1860 या काळातील जागतिक अर्थव्यवस्थेत भारत आणि चीन यांचाच दबदबा होता. जगाच्या एकूण जीडीपीचा सुमारे 60 टक्के हिस्सा भारत आणि चीन यांचा होता. अमेरिका व युरोपीय देशांचा जगाच्या संदर्भातील जीडीपी तर पाच टक्क्यांपेक्षाही कमी होता. 1860 नंतर 1920 पर्यंत चित्र उलटे झाले आणि भारत व चीन यांची जागा अमेरिका व युरोपने घेतली व त्यांच्या जागी भारत व चीन गेले. अर्थातच, वसाहतींच्या शोषणातूनच अमेरिका व युरोपची ही समृद्धी, श्रीमंती आली आहे. हा खरेतर भारतासाठी अत्यंत गौरवाचा विषय आहे. आज अमेरिका व काही युरोपीय देशांचा जगात जो दबदबा आहे, तो सुमारे दीड हजार वर्षे सतत भारताचा होता. ही किती अभिमानाची गोष्ट आहे! पण, आम्हाला आजही हे सांगितले जात नाही. अभ्यासक्रमात याचा कुठेही उल्लेख नाही. एवढेच नाही, तर या गौरवशाली सुवर्णयुगाचा कुणी उल्लेख केला तर, लगेच सेक्युलरी गुलाम मेंदूचे विचारवंत व चळवळे कावळे त्याच्यावर तुटून पडतात. अँगस मॅडिसन यांनी इसवी सन एक पासूनच्या जागतिक अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला. कारण युरोपची कालगणनाच तेव्हापासून सुरू होते.
 
 
इसवी सन एक मध्ये जर भारताचा जीडीपी जगाच्या 30 टक्के होता, तर तो एका रात्रीतून काही श्रीमंत झाला नसणार! त्याच्याही आधी कितीतरी शतके भारत असाच संपन्न व श्रीमंत असला पाहिजे. मग याचा अभ्यास व संशोधन कोण करणार? पाश्चात्त्यांना तसे करायची गरज नाही. पण, आम्हा भारतीय विचारवंतांना तसे करण्यापासून कुणी रोखले? जागतिक अर्थव्यवस्थेचे थोर विचारवंत, तसेच ‘गॅट’ कराराचे आर्थिक सल्लागार पॉल बैरोक्‌ यांनी त्यांच्या ‘इकॉनॉमिक्स अॅण्ड वर्ल्ड हिस्ट्री : मिथ्स अॅण्ड पॅराडॉक्सेस’ या पुस्तकात तर पाश्चात्त्यांना चांगलेच हाणले आहे. बैरोक्‌ यांनी दावा केला आहे की, अमेरिका व युरोपातील समृद्धी त्यांच्या अक्कलहुशारीने आलेली नसून, वसाहतींच्या शोषणातून आलेली आहे. एवढेच नाही तर बैरोक्‌ म्हणतात की, त्या काळात भारतातील सामाजिक जीवन इतके समृद्ध व श्रीमंत होते की, अमेरिका व युरोप, भारतीयांच्या राहणीमानाची स्वप्नातही कल्पना करू शकणार नाही. किती भारतीयांनी पॉल बैरोक्‌ यांच्या ग्रंथाचा अभ्यास करून, भारतीयांच्या ज्ञानात भर घातली आहे? हेच जर दुसर्‍या एखाद्या देशात घडते, तर त्या देशवासीयांनी सार्‍या जगाला, आपल्या पूर्वजांच्या अभिमानास्पद कामगिरीचा इतिहास, छाती ठोकत, उच्च स्वरात सांगितला असता. परंतु, आमच्या भारतात गल्लोगल्ली पायलीला पन्नास मिळणार्‍या अर्थशास्त्रावरील पीएच. डी.धारकांपैकी एकालाही यावर संशोधन करण्याची (दुर्‌)बुद्धी झाली नाही, ही किती शरमेची गोष्ट आहे! स्वत:तर संशोधन केलेच नाही, पण दुसर्‍यांनी जे आयते करून दिले तेही अभिमानाने सांगण्याइतपत आमचा कणा ताठ नाही.
 
 
भारताची समाजव्यवस्था म्हणजे स्त्रियांना दुय्यम अमानवी वागणूक, अस्पृश्यता, जातिभेद असेच वर्णन केले जाते. पण जर, भारताचे समाजजीवन हजारो वर्षे समृद्ध, संपन्न व श्रीमंत असताना, अशी समाजव्यवस्था असणे शक्य आहे का? समाजातील दोनतृतीयांश लोकसंख्या वंचित, दुर्बल, शोषित, पीडित असताना एखादा समाज समृद्धीची, संपन्नतेची, श्रीमंतीची शिखरे काबीज करू शकतो काय? नुसते काबीजच नाही, तर त्या शिखरावर हजारो वर्षे तसेच कायम राहणे त्या समाजाला शक्य असते काय? अशीही शक्यता असू शकते की, भारतीय समाजातील हे सर्व दोष अस्तित्वाच नसतील. ती एक कपोलकल्पना असू शकते. यावर कुणाही भारतीय अर्थतज्ज्ञाला, समाजशास्त्रीला संशोधन व चिंतन करण्याची गरज भासली नाही. आमची बुद्धिमत्ता गुलामगिरीने किती लाचार, संकुचित, परभृत आणि लाळघोटी झालेली आहे, याचे हे जिवंत उदाहरण आहे.
 
कार्ल मार्क्सला जी सामाजिक व्यवस्था अभिप्रेत होती, त्याचे कुठलेही प्रत्यक्षातील मॉडेल जगात यशस्वी ठरले नाही. याच्या उलट, भारताच्या आर्थिक, सामाजिक व राजकीय चिंतनातून सिद्ध झालेले मॉडेल हजारो वर्षे या पृथ्वीतलावर अस्तित्वात होते. त्याचा खरेतर अभ्यास झाला पाहिजे. तो दिला सोडून आणि जे कधीच व कुठेही यशस्वी झाले नाही, काळाच्या कसोटीवर उतरले नाही, त्या मार्क्सवादी मॉडेलला सत्यात उतरविण्यासाठीच सगळी धडपड सुरू आहे. जगात तर ही धडपड थांबली आहे; परंतु भारतात ती वळवळ आजही सुरू आहे. कार्ल मार्क्सच्या दोनशेव्या जयंतिवर्षाच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांच्या विचारांची प्रासंगिकता अधोरेखित करण्याचे प्रयत्न सुरू असताना, एका तरी भारतीयाकडून, जगाने आश्चर्याने बोटे तोंडात घालावी अशा आमच्या पूर्वजांच्या देदीप्यमान पराक्रमाचा सांगोपांग अभ्यास करण्याचा विडा उचलून, मार्क्सच्या कालबाह्य विचारांना एक आगळी ‘श्रद्धांजली’ देण्याचा प्रयत्न होईल का?
@@AUTHORINFO_V1@@