कर्नाटकची जनता कोणाला कौल देणार ? तुम्हीच ठरवा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-May-2018
Total Views |


कर्नाटक राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. कर्नाटक राज्यामध्ये त्रिशंकू लढतीमुळे चुरस निर्माण होत असते. शेवटच्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये जिंकणारा पक्ष आणि हरणारा पक्ष यांच्या मतांमध्ये अवघ्या २ टक्क्यांच्या फरक असल्यामुळे ही चुरस आणखीनच वाढलेली आहे. कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकींमध्ये प्रमुख पक्षांना मिळणाऱ्या मतांची टक्केवारी २००४ पासून स्थिर राहिली आहे. (२०१३ सालचा अपवाद सोडल्यास - त्यावर्षी भाजपची पारंपरिक मतं भाजप आणि कर्नाटक जनता पक्ष यामध्ये विभागली गेली होती.)




मुळात कर्नाटक राज्य अस्तित्वात आले ते बॉम्बे प्रांतामधील म्हैसूर, हैद्राबादचा संस्थानांचा काही भाग आणि किनारपट्टीचा काही भाग जोडून. सद्य स्थितीतही या विभागांचा राजकीय कल थोडासा वेगवेगळा असतो. वोक्कलिंग समाजाचे म्हैसूर विभागातील वर्चस्व, सध्या राजकीय पटलावर गाजत असलेल्या लिंगायत समाजाचे जवळपास संपूर्ण राज्यात असलेले वर्चस्व आणि एससी एसटी समाजाचा कल हे निवडणुकीतील लढाईचे निर्णायक बिंदू ठरणार आहेत.




आपण २००८ सालच्या निवडणुकांमध्ये कर्नाटकमध्ये भाजपचा उदय बघितला. सत्ता मिळाल्यावर राजकीय डावपेचात आकस्मिक कारणांमुळे भाजप मागे पडला. त्यामुळे भाजपसाठी गमावलेला जनाधार परत मिळवणे आणि राजकीयदृष्ट्या मदत होईल असे मित्र मिळवणे हे आव्हान असणार आहे. भाजप ने कर्नाटक जनता पक्षाला परत भाजप मध्ये घेऊन योग्य खेळी केली आहेच. त्याचबरोबर बादावरा श्रमिकरा रायथरा कॉंग्रेस या पक्षाचे सर्व चार आमदार हे क्रमश: भाजप उमेदवार म्हणून पक्षात घेतले त्यामुळे बी.एस.आर.सी.पी हा भाजप मध्ये तसा विलिनच झाला आहे. येत्या निवडणूकीमध्ये याच बी.एस.आर.सी.पी मधील प्रभावी नेते बी. श्रीरामल्लू हे विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात बदामी या ऐतिहासिक गावातून निवडणूकीला उभे राहिले आहेत. बदामी मधील ही लढत अत्यंत चुरशीची होईल असा अंदाज आहे. स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते, नेते यांचा भाजपकडे येण्याचा ओघ बघता याचा परिणामही मतदानावर पडू शकतो. उदाहरणार्थ कुंडापूरमधील हदडी श्रीनिवास शेट्टी जे गेल्यावेळेस अपक्ष असून देखील बहुमताने निवडून आले होते ते ह्या निवडणूकीत याच मतदार संघात भाजपच्या तिकीटावर उभे राहिले आहेत. गौरीबिदानूर मतदार संघातले के. जयपाल रेड्डी हे २०१३ साली अपक्ष म्हणून दुसऱ्या क्रमांकावर होते. त्या वेळेला तेथे कॉंग्रेस निवडून आली होती आणि भाजपचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता. येत्या निवडणूकीत ते याच मतदार संघातून भाजपचे उमेदवार आहेत.






कोणत्यातरी राजकीय पक्षाला ही २ टक्क्यांची कोंडी फोडावीच लागणार आहे नाहीतर त्रिशंकू विधानसभा येणार हे स्पष्टच दिसत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी एखाद्या पक्षाला काही प्रमाणात मत आपल्याकडे वळवावे लागतीलच. प्रश्न आहे तो कोणता पक्ष ही मते वळवण्यासाठी सक्षम आहे?




मागील दहा वर्षांमध्ये माध्यमांमध्ये मूलभूत बदल झाले आहे. फक्त माध्यम सम्राटच आत्ता माहितीचे वाहक नाही राहिले. सामान्य लोकांकडून माहितीची देवाणघेवाण आणि त्यावरची मतमतांतरे हे अधिक सहजपणे आणि मोकळेपणाने होत आहे. लोकांना हा माहितीचा साठा उपलब्ध झाला पाहिजे आणि त्यावर लोक स्वत: आपले निष्कर्ष काढू शकले पाहिजेत हे उद्याच्या माध्यमांचे भविष्य आहे.
उद्यापासून आमचे interactive नकाशे बघून आपले अंदाज नोंदवा आणि भविष्यातील माध्यमांचा भाग व्हा.

@@AUTHORINFO_V1@@