सुंभ जळाला तरी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-May-2018
Total Views |
भुजबळांचा जामीन झालेला आहे, निर्दोष सुटका नाही. भुजबळांच्या समर्थकांना काहीही वाटत असले तरी ‘भुजबळ’ ही महाराष्ट्राच्या राजकारणातली शोकांतिका झाली आहे. मराठी माणसाची अस्मिता जपण्यासाठी राजकारणात उडी मारून पुढे आलेला हा तरुण पवारांच्या राजकारणाच्या नादी लागला आणि संपून गेला.



स्वयंघोषित ओबीसी नेते छगन भुजबळ यांची नुकतीच तुरुंगातून जामिनावर सुटका झाली. सुटका ‘निर्दोष’ म्हणून झालेली नाही, तर ती प्रकृतीच्या कारणास्तव झाली आहे. तुरुंगातून सुटून आता भुजबळ इस्पितळात गेले आहेत. राजकीय क्षेत्रात जे बोलले जायचे ते असे होते की, ‘पवारांनाच भुजबळांचा बळी द्यायचा होता म्हणून त्यांना तुरुंगात टाकले.’ पवारांच्या नावावर अशा अनेक कंड्या आहेत. यातल्या खर्‍या किती आणि खोट्या किती, हे स्वत: पवारही सांगू शकत नाही. भुजबळांचे संघटन कौशल्य, बिनधास्त स्वभाव आणि त्याच्या जोडीला मिळालेले सार्वजनिक बांधकाम खाते याच्या आधारावर भुजबळांनी पवारसाहेबांच्या पायावर पाय ठेवत जे करायचे ते केले. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून भुजबळांना तुरुंगात जावे लागले. त्यानंतर भुजबळांच्या मागे जी साडेसाती लागली ती कायमचीच. वांद्य्राच्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीमध्ये झालेला कथित १७६ कोटींचा घोटाळाही बाहेर आला. घर फिरले की वासेही फिरतात, तसे भुजबळांचे एक एक विश्‍वासू त्यांचीच सगळी माहिती बाहेर पुरवू लागले. ‘भुजबळ फार्म’वरच्या एकापेक्षा एक सुरस रम्य कथाही बाहेर पडू लागल्या. यानिमित्त भुजबळांवर जो डाग पडला तो कधीही न पुसला जाणारा आहे. मंत्री असताना अनेकांना उपकृत करून भुजबळांनी जे संघटन बांधले, त्या मंडळींना जे काही वाटत असेल, पण भुजबळ महाराष्ट्राचे लालूप्रसाद यादव होणार, अशीच चिन्हे आहेत. भुजबळांचे चमचे त्यांना आता ‘ओबीसी योद्धा’ पुरस्कार देऊन गौरविणार आहेत. भुजबळांच्या जामिनाची बातमी आली तेव्हा तत्काळ धनंजय मुंडे त्यांना भेटायला पोहोचले खरे, पण धनंजय मुंडेंना भुजबळ भेटलेच नाहीत. उथळ वाहिन्यांनी मात्र त्यांच्यातील गुफ्तगूच्या बातम्या चालविल्या. राष्ट्रवादी आणि छगन भुजबळ यांच्यातील संबंध सध्या कमालीचे विस्मयकारक आहेत. भुजबळ समर्थकांचा कलकलाट वाढायला लागला की, शरद पवार एखादे विधान करून गप्प बसायचे आणि मग सारे कसे आलबेल असायचे. जामिनाचा निर्णय आल्यानंतर भुजबळांच्या समर्थकांनी फटाके फोडले. पण, एक वेगळेच राजकारण पाहायला मिळाले. भुजबळ कुटुंबीय ‘मातोश्री’वर पेढे घेऊन पोहोचले. बाळासाहेबांच्या शेवटच्या दिवसांत उद्धव ठाकरेंच्या उदयानंतर पक्ष सोडून गेलेल्यांपैकी फक्त भुजबळांनाच त्यांना भेटायला दिले गेले होते. राजकारणातले संबंध प्रसंगानुरूप बदलतात. या बदलांमागचे हेतू सरळ कधीच नसतात. ते असतात राजकीय कारणांसाठीच. नव्वदीच्या दशकात ‘बाळासाहेब विरुद्ध छगन भुजबळ’ हा संघर्ष चांगलाच रंगला होता. त्यावेळी शिवसेना फोडणार्‍या भुजबळांच्या घरावर चालून गेलेल्या शिवसैनिकांपासून स्वत:ला वाचविण्यासाठी भुजबळांना अक्षरक्ष: लपून राहावे लागले होते आणि नंतर बाळासाहेबांच्या अटकेसाठी भुजबळांनी जंगजंग पछाडले होते. ‘बाळासाहेबांना अटक’ म्हटल्यावर मुंबई तापली होती आणि महापौर बंगल्यावर बाळासाहेबांना प्रतिकात्मक अटक करून कायद्याचा मान राखण्यात आला. त्यानंतरही बाळासाहेबांची ‘टि बाळू’ संभावना करणे आणि बाळासाहेबांकडून ‘लखोबा’ अशी बिरुदावली वाहण्याचे उद्योग सुरूच होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, राज ठाकरेंच्या मुलाखतीमध्ये स्वत:ला ‘बाळासाहेबांचे मित्र’ म्हणविणार्‍या शरद पवारांनी बघ्याची भूमिका घेतली होती. तुकतुकीत चेहर्‍याचे छगन भुजबळ तुुुरुंगात गेले आणि त्यांची रयाच गेली. यानंतर भुजबळ थकलेल्या सांताक्‍लॉजसारखे दिसू लागले. यावेळीही पवारांनी त्यांची मजाच बघितली.

खरंतर भुजबळ लोकप्रिय झाले, ते त्यांच्या लढाऊ आक्रमक स्वभावामुळे. शिवसेनेने मुंबईतून काँग्रेसचा कणा मोडला, त्यावेळी जे बाळासाहेबांचे पहिले बिनीचे शिलेदार होते त्यात भुजबळ होते. सुशिक्षित, व्यासंगी असा हा नेता त्यावेळी सगळ्यांना हवाहवासा वाटत होता. मात्र, त्याचवेळी महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडेेंनी माळी, धनगर, वंजारी असे एक विलक्षण राजकारण बांधले. त्यावेळी त्याला ‘माधव फॅक्टर’ संबोधले गेले आणि भाजपचा जनाधार वाढविला. हा वाढलेला जनाधार अर्थात पवारांसमोर आव्हान उभे करणारा होता. तोपर्यंत पवारांचे मराठा राजकारण सुरूच होते. मुंडेंनी या राजकारणाला टोला दिला. त्यावेळच्या या लढाऊ मराठी माणसाला पवारांनी अलगद जातीचे लेबल लावून नेता बनविले. भुजबळांची सत्तेची चटक एवढी होती की, तेही या जाळ्यात अलगद ओढले गेले. खरंतर जे गोपीनाथ मुंडेेंना जमले ते पवार- भुजबळ जोडीला कधीच जमले नाही. ‘ओबीसी नेता’ म्हणून भुजबळांचा डंका भरपूर पिटला गेला, पण भरपूर पैसा ओतून आणलेले कार्यकर्ते, भलेमोठे मंडप, त्यात शाहू, फुलेेंचे फोटो आणि बेरक्या नेत्यांना घातली जाणारी धनगरी मुंडासी असा खास जामानिमा जमवूनदेखील हे राजकारण काही जमले नाही. मुंडेंच्या राजकारणात आणि भुजबळांच्या राजकारणात एक गुणात्मक फरक हा होता की, मुंडेंनी या वर्गाला राजकीय भान आणि अस्मिता दिली. भुजबळांनी आपल्या ओबीसी असण्याचा वापर करून घेतला. त्यांचा मूळ उद्योग ज्या कारणासाठी त्यांना तुरुंगात जायला लागले तोच होता. त्यामुळे मोदी लाट आली तेव्हा मुळातच काहीही जडत्व नसलेले हे नेते पूर्णपणे वाहून गेले. नंतर भुजबळ वहात वहात तुरुंगातच जाऊन पोहोचले. भुजबळ समर्थकांनी सुरुवातीला त्यांना अटक झाल्यावर मोर्चेबिर्चे काढून पाहिले, पण त्यातून काहीच साध्य झाले नाही. भुजबळांच्या समर्थकांना काहीही वाटत असले तरी भुजबळ ही महाराष्ट्राच्या राजकारणातली शोकांतिका झाली आहे. मराठी माणसाची अस्मिता जपण्यासाठी राजकारणात उडी मारून पुढे आलेला हा तरुण पवारांच्या राजकारणाच्या नादी लागला आणि संपून गेला. कधीकाळी पवारांनी भुजबळांना वापरले, आता बहुदा शिवसेना वापरणार, अशी चिन्हे आहेत.

@@AUTHORINFO_V1@@