गरजवंतांची अन्नपूर्णा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-May-2018   
Total Views |


एकही दिवस खंड न पडता 100 ते 150 जेवणाचे डबे गरजूंपर्यंत पोहोचवायचे आणि तेही मोफत... अशा या अविरत कष्ट उपसणार्‍या दमयंती तन्ना... त्यांचे कार्य आणि त्यामागची कहाणी विलक्षण आहे.

सर्वसाधारण मध्यमवर्गीय मुंबईकर गुजराती कुटुंबाप्रमाणेच दमयंती तन्ना आणि प्रदीप तन्ना यांचे आयुष्य. अगदी 2013 पर्यंत एकुलत्या एका मुलाला मोठा छायाचित्रकार बनविण्याचे आणि त्याच्या नावाने जगाने आपल्याला ओळखावे हेच स्वप्न उराशी बाळगून जगणारे हे सुखी जोडपे... मुलुंडमधल्या आपल्या छोटेखानी आशापुरा या फरसाणच्या दुकानाच्या माध्यमातून संसार चालवणारे हे कुटुंब 2013 साली खर्‍या अर्थाने उन्मळून पडले. एका महत्त्वाच्या मिटिंगसाठी घराबाहेर पडलेला त्यांचा लाडका लेक, 22 वर्षीय निमिष तन्ना लोकलच्या तुफान गर्दीत हरवून गेला आणि तो पुन्हा कधी घरी परतलाच नाही. लोकलच्या दारात उभा असणारा निमिष एका खांबाला धडकला अन् तन्ना दाम्पत्याची सर्व उमेदच संपून गेली. एक दोन दिवस नाही, तर तब्बल दोन वर्षे दमयंती तन्ना या हादर्‍यातून स्वत:ला बाहेर काढू शकल्या नाहीत. हातातोंडाशी आलेला आपला लेक असा अचानक आपल्यापासून कामयचा दुरावतो, हे दुःख कोणतीच माऊली सहन करू शकणार नाही. दमयंती यांनी उपासतापास, देव-देव सगळे काही केले, पण मनाची शांती अन् जगण्याचे कारण त्यांना उमगत नव्हते. प्रदीप तन्ना किमान दुकानात ग्राहकांसोबत आपला वेळ व्यतीत करू शकत होते. मात्र, दमयंती यांची जगण्याचीच इच्छा संपली होती. एकवेळ अशी आली की, दोघांच्या या नैराश्येमुळे चांगले चालणारे दुकानही बंद झाले. घरातला प्रत्येक कोपरा निमिषच्या आठवणीने व्याकुळ झालेला... अशा निराशेत जगण्यापेक्षा आपणही निमिषकडे जावे, या निर्णयापर्यंतही त्या आल्या. मात्र, प्रदीप यांनी त्यांना धीर दिला. मुलाच्या काही आठवणी अन् इच्छांमुळेच त्यांना स्वत:करिता नाही, पण इतरांकरिता जगण्याचा मार्ग दिसला आणि तोही अन्नदानातून. यातूनच जन्म झाला निमिष चॅरिटेबल ट्रस्टचा. आजघडीला निमिष ट्रस्टच्या माध्यमातून दमयंती या अन्नपूर्णेच्या भूमिकेतून दर दिवशी सुमारे 100 ते 150 गरजूंना मोफत डबे पोहोचवितात. गेल्या काही वर्षांत त्यांच्या या उपक्रमात एकही दिवस कोणत्याही कारणाने खंड पडलेला नाही. यासोबतच दमयंती दरमहा ज्येष्ठ नागरिकांना मोफत औषधांचेही वाटप करतात. दमयंती यांच्या इच्छेखातर प्रदीप तन्ना यांनी ’फरसानी दुनिया’ आणि ’लब्धी फरसान’ नावाचे दोन आऊटलेट सुरू केले, जेणेकरून ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येणार्‍या उपक्रमात कोणताही खंड पडायला नको. आर्थिक पाठिंबा सबळ असल्याची खात्री झाल्यानंतर दमयंती यांनी आपल्या जवळच्या परिसरात जे उपाशी आहेत, जे एकटे, निराधार ज्येष्ठ आहेत त्यांच्यापर्यंत डबा देण्यास सुरुवात केली. याकरिता त्यांनी निमिषच्या मित्रांचीही मदत घेतली. निमिषच्या मित्रांनी या उपक्रमाचे पॅम्प्लेटस तयार केले आणि ते मुलुंड परिसरातील बागा, बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणे, रेल्वे स्टेशन्स आदी ठिकाणी या मोफत अन्नदानाचा प्रसार केला. आपल्या आसपास अनेकजण रोज एकवेळचे अन्नही खाऊ शकत नाहीत, याचा प्रत्यय आल्यानंतर दमयंती यांना खूप वाईट वाटले होते. त्यांनी आपले अन्नदानाचे काम व्यापक करायचे ठरवले.

आपल्या वाट्याला आलेले दु:ख म्हणजे अगदी किरकोळ आहे. इतरांकडे आपल्यापेक्षा अधिक वेदना आहेत. तरीही ते समाधानाने जे वाट्याला आले आहे, ते आयुष्य जगतात, हे दमयंतींना आता उमगले होते. त्या म्हणतात, ”जगातले सर्व दु:ख मी कमी करू शकणार नाही, याची मला जाणीव आहे. मात्र, किमान मी रोज रात्री डोळे मिटताना चार भुकेलेल्यांचा आत्मा तृप्त करू शकले, याचे समाधान मिळवू शकते. आता माझ्या व्यक्तिगत दु:खावर मी मात करू शकले आहे.” स्वयंपाकाच्या कामातून बाजूला होताच, दमयंती यांना वेध लागतात ते डहाणू परिसरात अत्यंत दुर्गम परिस्थितीत शिक्षण घेणार्‍या आदिवासी मुलांचे.. मग त्यांची धावपळ सुरू होते, या मुलांना काय काय देऊ शकतो याकरिता. दमयंती यांच्याशी जोडले गेलेल्या घटकांच्या माध्यमातून त्यांनी जुन्या पण वापरण्यायोग्य असणार्‍या सायकल्स, दप्तर, चप्पल्स, स्टेशनरी, शैक्षणिक साहित्य, टूथपेस्ट, तांदूळ, डाळ, कपडे आदी अनेक साहित्य एकत्रित करून या आदिवासी पाड्यातील मुलांपर्यंत वेळोवेळी पोहोचते केले आहे. याचा लाभ आजवर साडे चार हजार आदिवासी मुलांना झाला आहे. वाढदिवस साधेपणाने साजरा करून ट्रस्टला देण्यात आलेल्या देणगीतून दमयंती जवळपास 75 ते 100 कुटुंबांना दर महिन्याचे रेशन भरून देतात. दमयंती यांच्या कार्याचा गौरव मर्क फार्मास्युटिकल कंपनीमार्फत ’ट्रु हिरोज’ अंतर्गत करण्यात आला आहे. आपल्या कार्याविषयी दमयंती म्हणतात, ”आमचा निमिष आम्ही जे काही करतो ते पाहात आहे आणि म्हणूनच आम्ही हाती घेतलेल्या अन्नदानाच्या आणि सामाजिक कार्यात कोणताही स्वार्थ न ठेवता आम्हाला आमचे काम अधिकाधिक गरजूंपर्यंत पोहोचवायचे आहे. आमच्या दु:खातून आम्ही हेच शिकलो की, आपण आसपास नजर टाकली आणि भवताल समजून घेतला तर आपले दु:ख, आपली निराशा खूपच नगण्य वाटते आणि हाच क्षण जगण्याची ऊर्जा देतो.”


- तन्मय टिल्लू
@@AUTHORINFO_V1@@