मातीकला वस्तूंचे प्रशिक्षणासाठी विभागाने अभ्यासक्रम निश्चित करावा- सुधीर मुनगंटीवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
मुंबई : संत शिरोमणी गोरोबाकाका महाराष्ट्र मातीकला बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय राज्य अर्थसंकल्पात घो‍षित करण्यात आला असून याअंतर्गत मातीच्या विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याने यासंबंधीचा एक अभ्यासक्रम कौशल्य विकास विभागाने निश्चित करून द्यावा अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.
 
 
महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने संत शिरोमणी गोरोबाकाका मातीकला बोर्ड योजनेसंदर्भातील सादरीकरण अर्थमंत्र्यांसमोर करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस खादी ग्रामोद्योग मंडळाचे अधिकारी व कुंभार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
 
 
मातीकला क्षेत्रातील कारागिरांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे, या कलेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतांना पारंपारिक कौशल्यात वृद्धी करणे, याक्षेत्रातील नावीन्याचा शोध घेत अधिक कलात्मकता आणणे, निर्मिती ते विक्रीपर्यंतच्या साखळीचे मुल्यवर्धन करणे, या विविध घटकांचा एकात्मिक विकास करून रोजगार निर्मितीस चालना देणे हा बोर्ड स्थापन करण्यामागचा उद्देश असल्याचे सांगून सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, अर्थसंकल्पात यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करून दिली आहे. ही योजना कार्यान्वित करण्यासाठी राज्यस्तरीय समितीची स्थापना तत्काळ करण्यात यावी. 
 
 
समितीमध्ये अशासकीय सदस्यांचा देखील समावेश करण्यात यावा. मातीपासून तयार होणाऱ्या विविध वस्तूंची सूची तयार करण्यात यावी. योजना कागदावर न राहता त्याची उपयोगिता सिद्ध व्हावी यादृष्टीने खादी ग्रामोद्योग मंडळाने त्यांच्याकडे या क्षेत्रातून नोंदणीकृत झालेल्या 50 हजार कुटुंबांची यादी पुढील बैठकीत सादर करावी तसेच गावपातळीवर या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना खादी ग्रामोद्योग मंडळाकडे नोंदणीकृत करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@