बोगस मतदान ओळखपत्र प्रकरणी कॉंग्रेस आमदारावर गुन्हा दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-May-2018
Total Views |



बेंगळूरू :
कर्नाटकातील राज राजेश्वरीनगर मतदारसंघामध्ये उघड झालेल्या बनावटी मतदान ओळखपत्रांच्या रॅकेटप्रकरणी एका कॉंग्रेस आमदाराविरोधात पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला आहे. मुनिरत्न नायडू असे या आमदाराचे नाव असून गेल्या दोन दिवसांमध्ये पोलिसांनी एकूण ११ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान नायडू यांचे नाव याप्रकरणामध्ये आल्यामुळे हे सर्व प्रकरण कॉंग्रेसच्या अंगलटी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

निवडणूक आयोगाने आज आपल्या चौकशीअंती या प्रकरणात नायडू यांचा देखील हात असल्याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल केली. कर्नाटक पोलिसांनी देखील या रॅकेटमागे त्यांचा हातदेखील असल्याचा संशय व्यक्त करत नायडू यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान नायडू यांना लवकरच ताब्यात घेण्यात येणार असून त्यानंतर या प्रकरणी त्यांची चौकशी सुरु करण्यात येणार आहे.


काय आहे हे प्रकरण ?

गेल्या दोन दिवसांपूर्वी राज राजेश्वरी मतदारसंघामधील एका घरामध्ये बनावट मतदान ओळखपत्रांचे एक रॅकेट उघड झाले होते. यामध्ये तब्बल ९ हजार ७४६ बनावट मतदान ओळखपत्र, एक कॉम्प्युटर, निवडणूक आयोगाचे होलोग्राम आणि काही नागरिकांची वैयक्तिक माहिती सापडली होती. हे रॅकेट उघड झाल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये एकच खळबळ उडाली होती. तसेच कॉंग्रेस पक्षाने या रॅकेटमागे भाजपचा हात असल्याचा आरोप करण्यास सुरुवात केली होती. भाजपने देखील स्पष्टीकरण देत यात कॉंग्रेसचाच हात असल्याचा उलट आरोप केला होता. यामुळे राज्यात एक नवा राजकीय कलगीतुरा रंगला होता. याप्रकरणी दोन्ही पक्षांच्या प्रतिनिधींनी निवडणूक आयोगाची देखील भेट घेतली होती. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.


मुनिरत्न नायडू हे राज राजेश्वरीनगर मधील कॉंग्रेसचे एक प्रतिष्ठित नेते आहेत. गेल्या २०१३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मुनिरत्न हे राज राजेश्वरीनगर मतदारसंघामधून बहुमताने निवडून आले होते. त्यामुळे यंदा देखील या जागेवर कॉंग्रेसकडून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. परंतु या प्रकरणी नायडू यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे कॉंग्रेस अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
@@AUTHORINFO_V1@@