डंपरचालकांची ‘मुजोरी’ ठरतेय पादचार्‍यांना घातक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-May-2018
Total Views |

महसूल, पोलीस प्रशासन मात्र मूग गिळून गप्प

जळगाव :
गौण खनिजाची वाहतूक करण्यासाठी लागणारे ट्रॅक्टर, डंपर हे सध्या बेदरकारपणे चालवित असल्याने पादचारी जनतेला रस्त्यावर चालणेही कठीण झाले आहे. वाळू माफियांसह बेदरकार डंपर चालकांची ‘मुजोरी’ थांबणार तरी कधी? असा प्रश्न जनसामान्यांमधून उपस्थित होऊ लागला आहे. सोमवारी पादचारी वृध्दाला उडविण्यासाठी डंपरच कारणीभूत ठरले आहे. तीन दिवसांपूर्वी जिल्हा दूध संघाजवळील घटना ताजीच असतांना यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्याने निष्पाप लोकांना डंपर चालकांची ‘मुजोरी’ पादचार्‍यांना घातक ठरली आहे. त्यामुळे सद्यस्थितीला हा विषय चिंताजनक ठरत आहे. जिल्ह्यातील विनापरवाना असलेल्या डंपरांवर आळा घालण्याची वेळ पोलीस आणि महसूल प्रशासनावर येऊन ठेपली आहे. अशावेळी त्यांनी ‘मूग गिळून गप्प’ न करता ठोस कारवाईची अपेक्षा आहे.
टेकड्या नेस्तनाबूत करण्याचा घाट
शहराच्या सौंदर्यात भर घालणार्‍या टेकड्यांना उध्वस्त करण्याचा घाट वाळू माफियांकडून सुरुच आहे. त्यामुळे शहराचे सौंदर्य धोक्यात आले आहे. लक्ष वेधून घेणार्‍या टेकड्या पोखरुन काढून नेस्तनाबूत केल्या जात आहे. असे असतांना मुरुम, खडी, वाळू अशांची चोरट्या मार्गाने शासनाच्या नाकावर टिच्चून रात्री-अपरात्री वाहतूक केली जात आहे. महसूल विभागाचे अधिकारीही केवळ कागदपत्रांचा बनाव करुन अशा चोरट्या माफियांना रान मोकळे करुन देण्यासाठी पडद्यामागून मदत करीत असल्याचे चित्र आहे.
 
 
शासनाला लाखोंचा चुना
गौण खनिज माफियांकडून चोरट्या मार्गाने का होईना, अजूनही वाहतूक सुरु आहे. चोरट्या वाहतुकीमुळे शासनाला लाखोंचा चुना लावला जात असल्याचा सर्रास प्रकार सुरुच आहे. सद्यस्थितीला किती डंपरांना गौण खनिज वाहतुकीची परवानगी आहे, त्याचा शोध घेण्याची खरी गरज आहे. ज्यांचे अधिकृत परवाने असतील त्यांनाही अपघाताच्या अशा घटनांमुळे चौकशीला सामोरे जावे लागते. त्याचा त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. यासोबतच जे अधिकृत शासनाची रॉयल्टी भरुन गौण खनिजाची वाहतूक करीत असतील त्यांचीही तीच परिस्थिती होते. अवैध गौण खनिजाच्या वाहतुकीमुळे पर्यावरणाची हानी बिनधोकपणे सुरु आहे.
 
 
विनापरवाना राजरोसपणे वाहतूक
गेल्या दोन ते तीन महिन्यामध्ये डंपराच्या बेदरकारपणे चालविण्यामुळे चार ते पाच जणांना मृत्यूच्या दाढेसमोर सामोरे जावे लागले आहे. त्यातील काहींना शारीरिक दुखापत तर काहींना आपला जीव गमवावा लागण्याची वेळ आली आहे. अनधिकृत अथवा विनापरवाना राजरोसपणे डंपर चालकही मुजोरगिरी करुन भरधाव वेगाने डंपर चालवितात. त्यामुळे कुठल्याही प्रकारची काळजी न घेता अपघातांच्या घटना घडतात. अशावेळी संबंधित महसूल प्रशासन काय खबरदारी घेते, हा यक्ष प्रश्न जनतेसमोर उपस्थित होतो.
 
जनतेच्या जीवावर उठले डंपर
प्रशासनाकडून नुसते पथके नेमून भागणार नाही तर त्यावर ठोस कारवाई करुन त्यांना पायबंद घालण्याची आवश्यकता आहे. अवैध वाळू वाहतूक करणार्‍या १३ डंपरवर कारवाई झाली खरी, पण त्याचे पुढे काय? अपघातांची मालिका अशीच सुरु राहिल्यास ही डंपर वाहतूक जनतेच्या जीवावर उठतील, अशी भिती व्यक्त होत आहे.
 
‘अभय’ कुणाचे?
गेल्या दोन महिन्यात डंपरच्या अपघाताच्या ४ घटना घडल्या होत्या. सोमवारी घडलेली घटना ही पाचवी. घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर शनिपेठ पोलीस स्टेशन आहे. असे असतांनाही शहरातून डंपरची वाहतूक होते तरी कशी, त्याला अभय कुणाचे, राजकीय वरदहस्त कुणाचा अशा प्रश्नांची खलबते आता सुरु आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@