वॉलमार्टचे फ्लिपकार्ट...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-May-2018   
Total Views |

ऑनलाईन शॉपिंग जगतातला एक मोठा करार कालच पार पडला. या करारान्वये, फ्लिपकार्ट ही भारतीय ऑनलाईन व्यापारातील एक अग्रेसर कंपनी अमेरिकेच्या वॉलमार्टने १६ अब्ज डॉलरला विकत घेतली आहे. फ्लिपकार्टची ७७ टक्के मालकी आता वॉलमार्टच्या हाती असेल. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून कट्टर स्पर्धक असलेल्या अ‍ॅमेझॉनसमोर अगदीच गर्भगळीत झालेल्या फ्लिपकार्टला नवसंजीवनी मिळू शकते पण, या कराराकडे पाहताना अनेकविध पैलूंचा विचार करणेही महत्त्वाचे ठरेल. कारण, तसा वरकरणी हा करार फ्लिपकार्टसाठी फायदेशीर ठरणार असला तरी आजवर भारतीय घाऊक बाजारात मर्यादित प्रवेश असलेल्या वॉलमार्टला आता संपूर्ण भारतीय बाजारपेठ खुली होणार आहे.

फ्लिपकार्टमध्ये वॉलमार्टची भागीदारी ७७ टक्के असून मायक्रोसॉफ्ट, टेनसेंट, सॉफ्टबँक यांची भागीदारीही कायम राहील. या करारानंतर फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बन्सल हे कंपनीतून बाहेर पडतील आणि सर्व सूत्रे वॉलमार्टच्या व्यवस्थापनाअंतर्गत येतील. जाणकारांच्या मतानुसार, सध्या केवळ देशभरात २१ दुकानांमार्फत व्यवसाय करणार्‍या वॉलमार्टमुळे इतर छोटे-मध्यम स्वरूपाचे उद्योगधंदे धोक्यात येऊ शकतात. त्याचबरोबर, सध्या फ्लिपकार्टवरील ऑनलाईन विक्रेत्यांमध्येही काहीसे चिंतेचे वातावरण आहे. कारण, त्यांना अशी भीती आहे की, वॉलमार्ट त्यांच्या भांडवलाच्या आणि एकूणच ताकदीच्या जोरावर इतर परदेशी उत्पादनांनाही प्राधान्यक्रम देईल. त्यामुळे फ्लिपकार्टवरील ऑनलाईन विक्रेत्यांमध्ये काहीसा संभ्रम आहेच. शिवाय, वॉलमार्टमुळे स्थानिक उद्योगधंदे, दुकाने ओस पडतील आणि छोट्या व्यावसायिकांना याचा फटका बसेल, अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. पण, अ‍ॅमेझॉनला आता एक टक्कर देण्यासाठी वॉलमार्टच्या बळावर फ्लिपकार्ट सज्ज होणार आहे. कारण, वॉलमार्ट ही ५०० अब्ज डॉलरची कंपनी केवळ अमेरिकाच नाही, तर जगभरात रिटेल क्षेत्रातील एक नामांकित आणि मोठे व्यावसायिक साम्राज्य प्रस्थापित केलेली कंपनी आहे. तेव्हा, या मोठ्या कंपनीच्या अनुभवांचा, तंत्रज्ञानाचा, लॉजिस्टिक्सचा थेट फायदा फ्लिपकार्टला होईल. त्यामुळे वॉलमार्टच्या या टेकओव्हरमुळे फ्लिपकार्टचे रंगढंग बदलतील, यात शंका नाहीच.

फ्लिपकार्टची सूत्रे हाती आल्यामुळे वॉलमार्ट आणि अ‍ॅमेझॉन पुन्हा एकदा भारतीय रणभूमीवर एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार आहेत. कारण, दोन्ही मूळच्या अमेरिकन कंपन्यांमध्ये तिथे व्यापारीयुद्ध सुरूच असते. आता त्यात भारताची भर पडली आहे, इतकेच. खरंतर अमेरिकेतही अ‍ॅमेझॉनने वॉलमार्टच्या नाकी नऊ आणले आहेत. त्यामुळे वॉलमार्टने विविध ऑनलाईन वेबपोर्टल्स आपल्या ताब्यात घेण्याचा धडाकाच लावला. यामध्ये जेट डॉट कॉम, शूबाय आणि बोनोबॉस यांसारख्या ऑनलाईन ई-कॉमर्स संकेतस्थळांचाही समावेश आहे. फ्लिपकार्टच्या रूपाने वॉलमार्टच्या या यादीत एका भारतीय कंपनीची भर पडली असून त्याचे परिणाम येत्या काळात बाजारातील घडामोडी आणि आकड्यांवरून दिसून येतीलच.

‘फॉरेस्टर’च्या एका अहवालानुसार, भारतातील ऑनलाईन विक्री ही गेल्या वर्षी तब्बल २१ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली होती. यंदा हाच आकडा २५ अब्ज डॉलरचा टप्पा सहज ओलांडेल, असे अनुमान आहेच. त्यामुळे आगामी काळात भारतातील ई-कॉमर्स क्षेत्रात स्पर्धा अधिकच तीव्र होणार असून त्याचा फायदा ग्राहकांनाही होईलच कारण, जेवढी स्पर्धा तीव्र तेवढ्या ग्राहकांना कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त खरेदीच्या संधी.

त्याचबरोबर अ‍ॅमेझॉननेही भारतात अधिकची पाच अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेमध्ये रोजगाराच्याही संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील, ज्याची भारतासारख्या सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेल्या देशाला सध्या प्रकर्षाने गरज आहे. तेव्हा, एकूणच काय, वॉलमार्टने फ्लिपकार्टची मालकी घेतल्यामुळे ‘कहीं खुशी कहीं गम’ असे काहीसे वातावरण आहे.


- विजय कुलकर्णी
@@AUTHORINFO_V1@@