पुस्तकाचा छंद धरला जो आवडी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-May-2018
Total Views |


आवडलेले पुस्तक आणायचे आणि सवड मिळेल तसे वाचायचे, असा मोहन पागे यांचा छंद. यातून त्यांनी विद्यार्थी आणि नात्यातील मंडळींना त्या त्या विषयाची पुस्तके विनामूल्य देण्याचा प्रघात सुरू केला.

एखाद्या व्यक्तीला बरेदचा आपण ‘पुस्तकवेडा’ अशी उपाधी देऊन मोकळे होतो. खरंतर ’पुस्तकवेडा’ म्हटल्यावर त्याचं कौतुक वाटायला हवं. पण, या कौतुकाच्या ऐवजी उपहास वाट्याला येतो. अनेकांना ते फारसे आवडत नाही. कुटुंबातदेखील या छंदाचे कौतुक होताना दिसत नाही. पुस्तकाचा शोधलेला आधार एकटेपणा घालविण्यासाठी उपयुक्त ठरतो. तसेच त्यामुळे ज्ञानदेखील मिळते. वाचनाचं वेड, सवय, लागण्याचं कारण काही का असेना, पण वाचनक्रिया व यातून मिळणारा आनंद वेगळाच असतो. अशीच एका वाचनप्रेमीची कहाणी अन्य व्यक्तींनादेखील प्रेरणादायी ठरणारी आहे.

लोकमान्य टिळकांनी ‘’तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्त्व घडवायचे असेल तर वाचन करा,” असा संदेश दिला. धावत्या युगाच्या बरोबरीने धावायचे असेल तर वाचन करा, असा उपदेशही त्यांनी दिला. मात्र, आजच्या धकाधकीच्या जीवनात इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या दुनियेत गुंतल्यामुळे त्यांच्या उपदेशाकडे नव्या पिढीचे फारसे लक्ष नाही. सखोल विचारातूनच एकरूप समाज निर्मित होत असतो आणि सखोल विचार करण्याची सवय चांगल्या वाचनातूनच तयार होते.

कोल्हापूर, डोंबिवली आणि नाशिक कार्यक्षेत्र असलेले मोहन विनायक पागे यांना असाच पुस्तकांचा लळा... ते मूळचे कोल्हापूरचे. पण, नोकरीनिमित्त ते डोंबिवलीत दाखल झाले. त्या पूर्वीपासून शालेय वयापासून त्यांना वाचन आणि पुस्तकांचा छंद जडला. शिक्षण झाल्यावर त्यांनी टेलिफोन खात्यात अभियंता म्हणून नोकरीस सुरुवात केली. सुमारे पाच वर्षांपूर्वी विभागीय अभियंता म्हणून ते नोकरीतून निवृत्त झाले. त्यांच्या नोकरीच्या काळात हा छंद चांगलाच विकसित झाला. आपल्या छंदासाठी त्यांनी जुन्या बाजारातून किंवा अगदी रद्दीच्या दुकानातून स्वस्त दारात दुर्मीळ पुस्तके आणण्याचा सपाटा सुरू केला. एकेकाळी त्याच्या सदनिकेत सर्वत्र पुस्तकेच पुस्तके दिसत असत. हजारो पुस्तके एका व्यक्तींनी केवळ आवड म्हणून विकत आणण्याचा हा अनोखा प्रयत्न होता. इतकी पुस्तके घरात होती की, पलंगाखाली आणि स्वच्छतागृहाच्या वरील जागेतदेखील पुस्तके ठेवावी लागत होती.

वाचन म्हणजे जीवनाला उन्नत करणारी बाब असून यामुळे बुद्धीची मशागत होते. माणसाचे जीवन फुलविण्यात वाचनाचा महत्त्वाचा वाटा असतो. यामुळे वाचनाचा छंद जोपासून आपले जीवन समृद्ध करा. त्याचप्रमाणे जगण्याच्या परिपूर्णतेसाठी वाचन हे आवश्यक आहे. ज्ञानात सतत वाढ करण्यासाठी वाचन हा एकमेव मार्ग आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत पुस्तके हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय.

आवडलेले पुस्तक आणायचे आणि सवड मिळेल तसे वाचायचे, असा मोहन पागे यांचा छंद. यातून त्यांनी विविध अभ्यासक्रम घेतलेल्या विद्यार्थी आणि नात्यातील मंडळींना त्या त्या विषयाची पुस्तके विनामूल्य देण्याचा प्रघात सुरू केला. इंजिनिअरिंग, सायन्स, साहित्य, विविध भाषा अशी विविधता त्यात असल्याने अनेकांना ती पुस्तके उपयुक्त ठरली. अनेकदा त्याच्यावर टीकादेखील झाली. मात्र, त्यांनी आपली आवड जोपासलीच. नाशिकमधील अनेक नातेवाईकांना, त्यांच्या मुलांना त्यांनी पुस्तके भेट दिलेली आहेत.
नुकताच २३ एप्रिल रोजी ’जागतिक ग्रंथ दिन’ साजरा झाला. त्यावेळी मोहन पागे हे नाशिकमध्येच होते. त्यांनी मोठ्या कष्टाने अनेक पिशव्यांतून पुस्तके भरून आणली होती. स्वतः आणून ती त्यांनी इच्छुकांना भेट दिली. त्यांचे वाचनदेखील जबरदस्त असून त्यासाठी मराठी, इंग्रजी असे भाषेचे बंधन नाही. विषयदेखील कोणताही चालतो. कोणत्याही विषयावर पुस्तकाबद्दल बोलले की, त्याच्याकडून खूप माहिती मिळते. बाकी जीवनात इतरांसारखे असलेले मोहन विनायक पागे हे पुस्तकांबाबत मात्र हळवे आहेत. कधीही भेटले की, त्यांना पुस्तकांचा विषय काढल्याशिवाय चैन पडत नाही. पुस्तक देवघेव योजनेतदेखील त्यांनी अनेक उत्तम पुस्तके मिळविली आहेत. आताशा मात्र त्यांनी पुस्तकांची संख्या कमी केली आहे. अनेक पुस्तके गरजूंना, काही वाचनालयांना देऊन जागा मोकळी केली आहे. मात्र, त्यांची आवड कायम असून नव्या-जुन्या पुस्तकांची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नाही. अन् ते सुचवतात, ते ’लव्ह जिहाद’ वरील पुस्तक वाच बरं का, चांगली माहिती आहे त्यात.


- पद्माकर देशपांडे
@@AUTHORINFO_V1@@