इसिसविरोधी कोबानचे युद्ध - भाग १

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-May-2018   
Total Views |





Courtesy: Prashad, Vijay. Siege of Kobane, Frontline, 17 October 2014


Photo Courtesy: Umit Bektas/Reuters, James, Catherine. Isis flags raised in Kobani near Turkish-Syrian border, The Guardian, 6 October 2014





Asaad, Akhtin & Salih A, Mohammed. Kobane rebuilding efforts strained by major challenges, Al-Jazeera, 27 September 2015


रोजावामधील कोबानमध्ये रोजावा सैनिक व इसिस यामध्ये झालेल्या युद्धाने जगाचे लक्ष रोजावाकडे वेधून घेतले. रोजावा प्रदेश अफ़्रिन, कोबान व सिझिरे ह्या तीन परगण्यांचा मिळून बनलेला आहे. हे तिन्ही प्रदेश एक सलग लागून नाहीत, त्यांच्या मधील प्रदेश/जागा विरोधक, शासन व इसिसने व्यापलेली आहे. अशा या संरक्षणाच्या दृष्टीने खूप नाजूक भौगोलिक परिस्थिती असलेल्या तीन परगण्यांपैकी कोबानवर इसिसने मार्च २०१४ मध्ये पहिला हल्ला केला.

बाथ राजवटीने कोबानचे नाव बदलून ‘अय्न अल-अरब’ (म्हणजे अरबांचे नेत्र) ठेवले होते तर इसिस त्याला ‘अय्न अल-इस्लाम’ म्हणजे इस्लामचे नेत्र असे म्हणत.


सिरीयामधील उठाव व त्यानंतरचे युद्ध ह्याआधी कोबानची लोकसंख्या २० लक्ष होती, कोबान कूर्दबहुल परगणा आहे. कारण येथे ९०% कूर्द आहेत. पण २०१२ नंतर निर्वासितांमुळे कोबानची लोकसंख्या वाढू लागली. कोबान परगणा रोजावाच्या मध्यभागी आहे. अतिदूर पश्चिमेकडे अफ़्रिन व पूर्वेकडे सिझिरे परगणा आहे. म्हणजे कोबानवर हल्ला केला तर त्याचा इतर दोन- अफ़्रिन व सिझिरे परगण्याशी संपर्क तुटेल व रोजावाचे स्वप्न कोलमडून पडेल हा एक कोबानवर हल्ला करण्याचा हेतू होता पण दुसरा महत्त्वाचा हेतू हा होता की ने-आण करण्यासाठी म्हणजे logistic साठी इसिसला कोबान आपल्या ताब्यात असणे आवश्यक होते. तुर्कस्तानच्या सीमेजवळील जराबुलस व तल अब्याद ही दोन गावं इसिसने जिंकून घेतली होती व कोबान हे ह्या दोन शहरांच्या मध्ये होते त्यामुळे इसिसला ह्या गावांदरम्यान प्रवास करण्यासाठी १६० किमीचा वळसा घालून जाव लागत असे. पण कोबान ताब्यात आल्यास हा लांबचा वळसा वाचून प्रवासवेळ व इंधन खर्च वाचणार होता व सुरेक्षेच्या दृष्टीनेही उपयोगी होते. तसेच इसिसला तुर्कस्तानच्या बाजारातून पुरवठ्या होण्यासाठी जराबुलस हे सीमेलगतचे ठिकाण उपयुक्त होते तर तुर्कस्तानातील उफ्रा शहरात इसिसच्या जखमींना पाठवण्यासाठी तल अब्याद हे ठिकाण सोयीचे होते. तेथे ओदेस्सा रुग्णालयात व सेल्यापिनर सार्वजनिक रुग्णालयात मोफत वैद्यकीय उपचार मिळत असत. सिरीयन कूर्दिश पत्रकार बरझान इसो म्हणतो की, कतारी धर्मादाय संस्था सीमा ओलांडून इसिसला सहाय्य करण्यासाठी जराबुलस ह्या गावाचा उपयोग करत असत.


चार दिवसात ३००० तोफगोळ्यांचा मारा करून कोबानचा बराचसा भाग भाजून काढू शकेल व शहर उध्वस्त करू शकेल अशी शस्त्रास्त्र इसिसकडे होती. इसिसकडे थर्मल क्षेपणास्त्र होती, मोसुलमध्ये इराकी सैन्याकडून ताब्यात घेतलेल्या जड तोफा होत्या, हमवीस (चारचाकी हलका सैनिकी ट्रक), अंधारातही मार्ग दाखवणारे गॉगल्स (night vision goggles), एम-१६ रायफल्स, ४० लक्ष डॉलरचा १ रणगाडा अशी शस्त्रसामग्री होती. याउलट रोजावाच्या सैन्याकडे म्हणजे वायपीजी-वायपीजे कडे जे सैनिक होते त्यातील बरेचसे तरूण व अननुभवी होते. त्यांच्याकडे काळ्या बाजारातून घेतलेली रशियन बनावटीची विंटेज कालाश्निकोव रायफल, हाताने वापरावयाचे ग्रेनेड, बांधकामाच्या वाहनापासून तयार केलेले रणगाडे व ट्रक होते. म्हणजे जवळजवळ विषम असे हे युद्ध होते.

कोबानला इसिसचा वेढा हळूहळू घट्ट होत चालला होता. कोबान जिंकायचेच या निश्चयाने इसिसने युद्ध आरंभिले होते. सप्टेंबर २०१४ पर्यंत इसिसने कूर्दीशबहुल डझनभर गावे पादाक्रांत केली. ऑक्टोबर २०१४ पर्यंत कोबान व तुर्कस्तान सीमेजवळील ३२५ गावांवर ताबा मिळवला. कोबानमध्ये प्रवेश करायचे व बाहेर पडायचे पूर्व व दक्षिण मार्ग इसिसने ताब्यात घेतले. परिणामी आतून बाहेर पलायन करणे कठीण झाले व बाहेरून सहाय्य मिळणे अवघड झाले. शहरावर टेहळणी करण्यास उपयुक्त मोक्याच्या टेकडीवरही इसिसने ताबा मिळवला, त्यामुळे कोबानवासीयांची फार कोंडी झाली व कोबानमधील सर्व हालचालींवर लक्ष ठेवणे इसिसला शक्य झाले. तसेच आकाशवाणी टॉवरही बळकावले.

इसिसने कोबानचे पाणी व वीज तोडून टाकले, तसेच तिथे तुर्कस्तानेही आपल्या सीमेतून अन्न पुरवठा करण्यास नकार दिला. पाणी नाही, वीज नाही, अन्न नाही, उध्वस्त झालेल्या इमारती दुरुस्त किंवा पुन्हा उभारण्यासाठी सामान नाही, अवजार नाहीत, दवाखाने, रूग्णालय व त्यातील औषधे, वैद्यकीय उपकरणांची कमतरता अशाप्रकारे भीषण टंचाई निर्माण झालेली. या युद्धात जवळजवळ ७०% भाग उध्वस्त झाला. अंदाजे १३०० घर या युद्धात बेचिराख झाली अथवा मोडकळीस आली. युद्धानंतर कोबानची उभारणी करण्याचा खर्च अंदाजे १.५ अब्ज डॉलर इतका अपेक्षित होता. अंदाजे २ लक्ष लोक सीमापार करून तुर्कस्तानात गेले. अस म्हणतात की संकट आली की चहूबाजूनी येतात. हळूहळू सर्वच बाजूने कोबानची कोंडी व्हायला लागली. जवळ असलेल्या तुर्कस्तानने सुद्धा तटस्थ राहून सहाय्य करण्यास टाळाटाळ केली.

रोजावामध्ये सामान्य माणसही रोजावा व कूर्द वंश वाचवण्याच्या उद्देशाने युद्धात उतरायला तयार होती व बरेचसे उतरलेही होते. महिलाही ह्यात मागे नव्हत्या, नव्हे उलट त्या तर ह्या युद्धात अग्रभागी होत्या. इसिसच्या रणगाडे व जड तोफांच्या पुढे रोजावा सैन्याची लहान शस्त्रे व मर्यादित दारुगोळा ह्यांचा टिकाव लागणे अशक्य होते. त्यामुळे अशावेळी रोजावा सैन्याला सैनिकांपेक्षा म्हणजे मनुष्यबळापेक्षा तुल्यबळ शस्त्रांची जास्त आवश्यकता होती. कारण ह्या परिस्थितीत फारतर चिवट झुंज देऊन इसिसला रोखता आले असते पण त्यांच्यावर विजय मिळवणे अशक्य होते.

तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्दोगन म्हणाले,'' कोबान लवकरच पडेल.'' जगाला वाटले खरच आता कोबान पडून कूर्दांच्या हत्याकांडाला प्रारंभ होईल पण अहो आश्चर्यम! कोबान पडले नाही, उलट कोबानने इसिसला याआधी कुठेही झाला नाही इतका प्रखर विरोध केला इतकच नव्हे तर इसिसवर विजयही मिळवला व या युद्धात कोबान महिलांनी म्हणजे वायपीजेच्या महिलांनी अशक्यप्राय कामगिरी करून ह्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. ज्या कूर्दांचा इसिस वंशविच्छेद करेल असे वाटत होते त्या कूर्दांनीच उलट कोबानमधून इसिसचा उच्छेद केला. रोजावा सैन्याने कोणाच्या सहाय्याने व कसा हा विजय मिळवला ते पाहू पुढील लेखात.

संदर्भ :


१. Dicle, Amed. What's happening in Kobanê?, Kurdishquestion.com, 5 July 2014


२. पृष्ठ १७९ व १८१


३. Prashad, Vijay. Siege of Kobane, Frontline, 17 October 2014


४. पृष्ठ १८०-१८१


५. Rayne, Trevor. Victory in Kobane, Revolutionary Communist Group, 12 February 2015
 
 
- अक्षय जोग 
@@AUTHORINFO_V1@@