'सरकारला कसल्याही प्रकारची मदत करू नका' : राज ठाकरे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-May-2018
Total Views |




वसई : 'भाजप सरकार हे मराठी जनतेची फसवणूक करत असून विकासाच्या नावावर मराठी माणसांच्या जमिनी लाटल्या जात आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेनी या साकारला कसल्याही प्रकारचे सहकार्य करू नये,' असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केले आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त वसई येथे आयोजित जनसभेला संबोधित करताना आज ते बोलत होते.

'१९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. यावेळी मुंबईसाठी गुजरातबरोबर अनेक वाद झाले. परंतु मराठी माणसाच्या अथक प्रयत्नांतून मुंबई महाराष्ट्रात आली. परंतु आज बुलेट ट्रेन, मुंबई-बडोदा मार्गाच्या नावाखाली मराठी माणसाची फसवणूक करून मुंबई आपल्या घशात घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. या विकास कामांच्या नावाखाली मराठी माणसांच्या जमिनी गुजराथी लोक लाटत आहेत आणि मराठी माणसाला कंगाल करत आहेत. त्यामुळे मराठी माणसांनी सरकारचा हा डाव ओळखून सावध व्हावे व सरकारला कसल्याही प्रकारची मदत करू नये' असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

मराठी माणूस अंधारात

राज्यामध्ये नोकऱ्या उपलब्ध असताना देखील मराठी मुलांना त्याविषयी सांगितले जात नाही. राज्यात येणाऱ्या नाणार सारख्या प्रकल्पांची माहिती येथील स्थानिक नागरिकांना नसते, परंतु शेजारी राज्यांमधील गुजराथी लोकांना मात्र असते. त्यांच्या राज्यात स्थानिक नागरिकांना प्रत्येक कंपनीमध्ये ८५ टक्के नोकरीसाठी आरक्षण असते. परंतु महाराष्ट्रात मात्र ते का दिले जात नाही ? असा सवाल त्यांनी यावेळी केला.

महाराजांचे विचार मारण्याचा प्रयत्न

'भाजप सरकार धर्माचे आणि जातीचे राजकारण करत समाजामध्ये द्वेष पसरवत असल्याचा आरोप ठाकरे यांनी यावेळी केला. भाजपच्या हिंदुत्व आणि जातीच्या राजकारणामुळे आज राज्यातील प्रत्येक जण एकमेकांकडे जातीय दृष्टीने बघत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली, परंतु आज त्यांच्या नावावर मते मागून निवडून आलेले हे सरकार त्यांचे विचार मारण्याचे प्रयत्न करत असल्याचा घणाघात ठाकरे यांनी यावेळी केला.

फडणवीसांमध्ये हिंमत आहे का ?

केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करताना ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर देखील चांगलेच तोंडसुख घेतले. फडणवीस हे जनतेतून निवडून आलेले मुख्यमंत्री नसून त्यांना शाह आणि मोदींनी या पदावर बसवले आहे. त्यामुळे यांच्या समोर तोंड उघडण्याची देखील त्यांची हिंमत होत नाही. उलट मोदींनी काही खोटे बोलले कि, त्याचे अनुकरण करत आपण देखील खोटे बोलायचे असा त्यांचा नित्याचाच पाठ आहे, अशी टीका त्यांनी केली.


@@AUTHORINFO_V1@@