समतोल साधण्यास दैवी स्त्रीभाव आवश्यक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-May-2018   
Total Views |

‘तळपणारी महिला’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या पॅट मॅक्‌कॅबी या, मूळ अमेरिकी नवाजो जमातीच्या आहेत. अमेरिकेच्या ईशान्य अॅरिझोना, आग्नेय उटाह, वायव्य न्यू मेक्सिको या भूप्रदेशातील सुमारे 71 हजार वर्ग कि.मी. भागात नवाजो या जमातीचे सुमारे साडेतीन लाख लोक अजूनही वस्ती करून आहेत. अमेरिकेचीच दुसरी एक मूळ जमात असलेल्या लकोटा या समाजातही पॅट यांचे आयुष्य गेले आहे. त्यामुळे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वात नवाजो व लकोटा या प्राचीन अमेरिकी परंपरांचा सुरेख संगम झालेला दिसून येतो. जगात, मूळ जमातीच्या, परंपरांच्या लोकांच्या जिथे कुठे परिषदा व कार्यक्रम असतात, तिथे त्या आवर्जून जातात आणि तिथे शाश्वत मानव विकासाच्या संदर्भात प्राचीन परंपरांमध्ये असलेले ज्ञान, शहाणपण प्रसृत करीत असतात. अमेरिकेतील प्राचीन सभ्यतांच्या संस्था तसेच कार्यक्रमात त्या अतिशय सक्रिय असतात. त्या ‘पचमामा अलायन्स’च्या सांस्कृतिक सल्लागार आहेत. 2013 व 2014 साली झालेल्या नॅशनल बायोनीअर्स कॉन्फरन्समध्ये त्यांनी आपला ‘अमेरिकेतील तसेच जगातील स्त्रीभावाची संकल्पना आणि शाश्वतता’ हा लघुप्रबंध वाचला होता. (बायोनीअर्स हे, जगाला तीव्रतेने भेडसावणार्‍या पर्यावरणीय तसेच सामाजिक आव्हानांवर व्यावहारिक तसेच भविष्याचा वेध घेणारा तोडगा काढणार्‍या सामाजिक व शास्त्रीय कल्पक संशोधकांचे फलप्रद व्यासपीठ आहे.)
 
त्या भारतात आणि अमेरिकेतही इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीजच्या (आयसीसीएस) कार्यात सक्रिय आहेत. एवढेच नव्हे, तर श्रीलंकेत डॉ. ए. टी. अरियारत्ने यांच्यासोबत ‘सर्वोदया’चेही त्या काम करतात. ज्याप्रमाणे हिंदू अग्निपूजक आहेत, त्याचप्रमाणे जगातील सर्व प्राचीन परंपरादेखील अग्निपूजक आहेत, असे पॅट यांचे म्हणणे आहे. आयसीसीएच्या ‘एल्डर्स कॉन्फरन्स’मध्ये त्यांनी सूचना केली होती की, ही कॉन्फरन्स प्राचीन परंपरांच्या वरिष्ठ लोकांची आहे आणि आम्ही सर्व हिंदूंप्रमाणेच अग्निपूजक असल्यामुळे, ही कॉन्फरन्स सुरू असेपर्यंत कार्यक्रमस्थळी अग्निकुंड धगधगत ठेवले पाहिजे. दिवसभर परिषदेचे कामकाज आटोपले की, पॅट मॅक्‌कॅबी सर्व उपस्थितांना रात्री एकत्र बसवून, जगातील सर्व प्राचीन संस्कृतींना तसेच परंपरांना भेडसावणार्‍या समस्यांवर विचारविमर्श करीत असत. या परिषदेत त्यांनी स्त्रीभावाच्या (स्त्रैण भाव) संदर्भात जे विचार मांडले ते संक्षेपाने देत आहे. त्या म्हणतात-
 
 
एक तरुणी म्हणून मी जेव्हा जगाकडे बघितले, तेव्हा निष्कर्षावर पोचले की, ज्यांना पर्याय निवडण्याची, मनात येईल ते निर्माण करण्याची, तसेच सर्व मुद्यांवर अधिकारवाणीने बोलण्याची शक्ती आहे, ते म्हणजे पुरुष. माझ्या स्वत:च्याच कुटुंबात असे दिसून आले की, जणू महिलांसाठी केवळ, ताणतणावाची कामे करणे, खरडपट्‌टी काढणे, बाळंतपणातील वायुबाधा इत्यादी काढून ठेवली असतात. परंतु, पुरुष मात्र त्यांना जे वाटले ते करण्यास मोकळे आहेत. त्या वेळी माझ्या दृष्टीस पडलेल्या या दोन गटांकडे बघत मला वाटायचे की, मी कुणाचे अनुसरण करावे, मी कुणाशी जोडली जावी, याची मला निवड करायची आहे. ते म्हणायचे, हे काही खूप डोक्याचे काम नाही. मला पुरुष व्हायचे होते. जीवशास्त्रीयदृष्ट्या नाही. पण, इतर सर्व दृष्टीने आणि नंतर मी स्वत:ला तसे घडविलेही. मला वाटते की, जीवन जगण्याचा हाच एक मार्ग आहे. अशा रीतीने माझी सुरवात झाली.
मी हे आज का सांगत आहे, कारण, आजही माझे विचार खूप काही वेगळे झालेले नाहीत. मी माझ्या आयुष्याचे सिंहावलोकन करते तेव्हा, स्वत:लाच विचारते- माझा दृष्टिकोन कशामुळे बदलला? मग उत्तर येते, मी माझ्या जीवनात अशा बिंदूवर आली होती, जिथे सर्व तंत्रज्ञान, औषधिशास्त्र, मानसशास्त्र यावर आधारित आधुनिक जीवनशैलीजवळ काहीही तोडगा नव्हता. म्हणून मी पारंपरिक शहाणपणाकडे वळले. खरे सांगायचे तर हे मार्गच मला शोधत आले. एकदा स्वीट लॉजमध्ये (उत्तर अमेरिकेतील धार्मिक विधी करण्याची एक प्रकारची झोपडी) मी पहिल्यांदाच बघितले की, धार्मिक समारंभात प्रत्येक लिंगाला वेगवेगळी भूमिका असते, असे सर्व मानून चालतात. ज्या आधुनिक जगात मी वाढले, तिथे स्त्री आणि पुरुषात भेद करणे निषिद्ध मानले जात होते. इतर वेळी ज्या समारंभात मला भाग घेता यायचा, त्या समारंभात मला जेव्हा मासिक पाळी यायची तेव्हा भाग घेऊ देत नसत. माझ्यातील ‘अमेरिकन मुलगी’ हे चूक आहे म्हणून आक्रोश करायची. कारण मला तेव्हा वाटायचे की, माझ्या लिंगामुळे माझ्याशी अशी भेदभावपूर्ण वागणूक करण्यात येत आहे. मला माझ्या हक्कांची जाणीव होती. त्यामुळे हळूहळू मी, लिंगभेदाबाबत प्राचीन परंपरांमध्ये काय सांगितले आहे, त्यांचा या संदर्भात काय दृष्टिकोन होता, याचा अभ्यास करण्याकडे वळू लागली. ज्याला मी घोर अन्याय समजत होते, त्यामुळे मला भोगावे लागले की काय, हे माहीत नाही, परंतु मी ते केले.
 
 
माझ्या अंतर्मनात काहीतरी प्रचंड आणि मूलभूत बदल होत होते. आणि अचानक, मला माझे आयुष्य तसेच फसव्या समाजव्यवस्थेतील कर्तव्ये, अपेक्षा आणि आव्हाने यांची दहशत वाटण्याऐवजी, या सर्व मानवी संरचनेहून काही वेगळे असलेल्या, खूप सखोल तत्त्वाचा आपण एक भाग असल्याची भावना होत गेली. चमत्कार वाटावी अशी या पृथ्वीतलाची बुद्धिमत्ता आणि मनापासूनची संगोपन करण्याची तिची प्रेमळ शक्ती यांचा मला अनुभव येण्यास प्रारंभ झाला आणि कुणी दुसर्‍यांनी सांगितले म्हणून नाही, तर माझ्या स्वत:च्या हृदयातूनच मी तिला ‘पृथ्वी माता’ मानू लागले. माझ्या मासिक पाळीच्या काळात, इतरांपासून वेगळी बसलेली असताना, माझ्या लक्षात आले की, ही जोमाने वाढणारी, सर्जनशील पृथ्वी माता माझ्याशी बोलू शकेल आणि निश्चित बोलेल. त्यावेळेचे माझे पालक मला समजावून सांगायचे की, मासिक पाळीच्या काळात जे फक्त केवळ मीच करू शकेल, असे मी काहीतरी अभिज्ञ असे करीत असते. संपूर्ण मानवतेच्या वतीने मी जीवनाच्या पवित्र वेदीला ध्वस्त करीत होते आणि आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा आपल्या स्रोताला, पृथ्वी मातेला आहुती देण्याची मला संधी मिळाली होती. मी स्वत: आणि पृथ्वी माता यांच्यात एक सखोल देवाणघेवाण सुरू होती आणि त्यांनी सांगितल्यानुसार मी लोकांचा कणा असल्याने, माझ्या स्वत:च्या कल्याणासाठी तिच्याकडून थेट संदेश स्वीकारण्याच्या, तसेच माझ्या समाजाला देण्याच्या आणि शक्य झाल्यास जगाला देण्याच्या स्थितीत मी होती. त्यानंतर सगळेच बदलत गेले. मी केवळ माझ्या स्त्रीत्वाचा द्वेष करणेच सोडून दिले नाही तर, स्त्रीत्वाचा उत्सव करू लागले आणि दैवी स्त्रीत्वाचे साकार रूप म्हणून मला हे पवित्र कर्तव्य दिल्याबद्दल मला अतिशय मनापासून कृतज्ञता वाटू लागली. जीवनाचा हा निर्झर माझ्याशी संवाद साधतो आहे, तो माझ्यात आहे, तो माझ्यातून वाहतो आहे, हा किती सन्मान आहे!
 
या एकान्तवासाच्या काळात माझ्या लक्षात आले की, माझ्याभोवती असलेले सर्वकाही, सर्व दिशांनी असलेल्या गोष्टी, ‘अधिकाधिक जीवनाची निर्मिती’ हे एकच कार्य करीत आहेत. वृक्ष, कीटक, खग, चतुष्पाद, जलचर... प्रत्येक जण अधिकाधिक जीवन निर्माण करणे, या एकाच कृतीत निमग्न होते. मी बघितले की, आम्ही या जीवनात तात्पुरता जरी अडथळा आणला, जसे, जमिनीला डांबराचे आवरण दिले, तिच्याकडे काही क्षण जरी दुर्लक्ष केले, तर ही पृथ्वी माता ताबडतोब या डांबरी आवरणाला उद्ध्वस्त करून जोमाने वाढणारे जीवन उत्पन्न करते. मला आता कळून चुकले होते की, या पृथ्वीतलावर जगण्यासाठी मला जी मूलभूत भूमिका दिली गेली आहे ती ‘जोमाने भरभराट होत जाणार्‍या जीवना’ची आहे.
...
@@AUTHORINFO_V1@@