‘न्यूड’मधली गफलत...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-May-2018
Total Views |


अमृता शेरगिलपासून ते अगदी परवा सतीश नाईक संपादित करीत असलेल्या ‘चिन्ह’ नियतकालिकाच्या कलेतील नग्नतेविषयीच्या विशेषांकापर्यंत निरनिराळ्या कलाकारांनी नग्नतेचा वापर चित्रे साकारण्यासाठी पुरेपूर केला आहे. त्यांचा कुणी निषेध केलेला नाही. हुसेन यांनी केवळ चित्रे काढली नाहीत, तर ती विक्रीलाही काढली. अशावेळी कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या तर त्याला कलाकार जबाबदार नाही, असे कसे म्हणता येईल ?




प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांचा ‘न्यूड’ नावाचा सिनेमा चांगलाच गाजतोय. वस्तुत: सिनेमा म्हणून ‘न्यूड’ उत्तमच झालाय. दर्जेदार कथानक, पात्रांची चपखल निवड, चांगली लोकेशन्स आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नैसर्गिक प्रकाशयोजनेचा उत्तम वापर यामुळे सिनेमा डोळ्यात भरतो आणि प्रेक्षकाला ताब्यातही घेतो. बाहेरख्याली नवर्‍यामुळे मुलाच्या भविष्याचा विचार करून घर सोडून मुंबईत कामाला आलेल्या स्त्रीची ही कथा. शेवटी काम मिळत नाही, त्यामुळे ती जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्ससारख्या कला महाविद्यालयात ‘न्यूड मॉडेल’ म्हणून काम मिळविते आणि ते इमानेइतबारे करायला लागते. हे सारे कथानक याचभोवती फिरते आणि ते संपतेदेखील. बाष्कळ मराठी सिनेमाच्या पार्श्‍वभूमीवर अत्यंत धाडसी अशा विषयाला हात घालून साकारलेला हा सिनेमा नक्कीच कौतुकास पात्र आहे. मात्र, भारतीय समाज आणि कलेच्या दृष्टिकोनातून हाताळावी लागणारी नग्नता याबाबत सिनेमातला काही भाग साकारताना दिग्दर्शकाने मोठी गफलत केली आहे. हिंदीतला ताकदीचा अभिनेता नसरुद्दीन शहा याला घेऊन त्याने एम. एफ. हुसेनसदृश्य कलाकार साकारला आहे. सदृश्य अशासाठी की स्वत: रवी जाधवने त्याचे नाव घेणे टाळले आहे. ज्या नायिकेभोवती हे कथानक फिरते तिची काही चित्रे साकारताना आणि त्यानंतर त्यावरून वादंग निर्माण झाल्याचे दाखविण्यात आले आहे. कलाकारांना कशा प्रकारच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागते, हे रंगविण्याचा हा प्रयत्न आहे. तथाकथित संस्कृतीरक्षकांचा एक जत्था येऊन जे. जे. कला महाविद्यालयात चित्रे खराब करतो. प्राध्यापकांना मारहाण करतो. त्यातून हताश न झालेली मॉडेल असलेली नायिका ते चित्र उचलून पुन्हा कामाला लागतेे, असा प्रसंगही दाखविण्यात आला आहे. कुठलाही कलाप्रकार काही आशयनिर्मिती करीतच असतो. त्यातून समाजात विचार पेरला जातो. या अतिरंजित प्रसंगांतून काय संदेश गेला, याचा विचार केला पाहिजे. कलेतल्या नग्नतेविषयी भारतीय समाज दांभिक किंवा जुनाट विचारांचा आहे, असा संदेश जर का यातून दिला जात असेल तर तो तद्दन चुकीचा आहे, असेच म्हणावे लागेल.


चित्रकलेच्या क्षेत्रात एम. एफ. हुसेन यांचे नाव मोठे होते व आजही आहे. ज्या कारणासाठी त्यांना विरोध झाला ते नग्नतेचे मुळीच नव्हते. रवी जाधवने नेमका हा सूक्ष्म फरक नजरेआड केलेवला दिसतो. हुसेन यांना विरोध झाला तो देवीदेवतांची नग्न चित्रे काढली म्हणून. हुसेन यांनी केवळ चित्रे काढली नाहीत तर ती विक्रीलाही काढली. अशावेळी कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या तर त्याला कलाकार जबाबदार नाही, असे कसे म्हणता येईल? राहिला प्रश्‍न कलेतल्या नग्नतेचा, तर त्याचे भारतीयांना मुळीच वावडे नाही. अमृता शेरगिलपासून ते अगदी परवा सतीश नाईक संपादित करीत असलेल्या ‘चिन्ह’ नियतकालिकाच्या कलेतील नग्नतेविषयीच्या विशेषांकापर्यंत निरनिराळ्या कलाकारांनी नग्नतेचा वापर चित्रे साकारण्यासाठी पुरेपूर केला. त्यांचा कुणी निषेध केलेला नाही. त्यांची चित्रे कुणी जाळण्याचा प्रयत्न केलेला नाही आणि त्यांना कुणी धमक्याही दिलेल्या नाहीत. ज्यांनी चित्रातली नग्नता हाताळली अशा चित्रकारांची भरपूर प्रदर्शने आपल्या देशात झाली आहेत आणि त्यात ती चित्रे विकलीदेखील गेली आहेत. सिनेमाच्या नायिकेप्रमाणे मॉडेलची जे. जे. मध्ये अशी चित्रे साकारली जात असूनही तिथे सिनेमात दाखविल्याप्रमाणे कधीही हल्ला, निषेध किंवा चित्रे जाळण्याचा प्रकार घडलेला नाही.

चित्रकार शुभा गोखले यांनी ‘चिन्ह’च्याच ‘यत्न प्रयत्न’ विशेषांकात आपले मनोगत व्यक्त केले आहे. त्यातील एक लहानसा भाग संवेदनशील कलाकाराचे यामागचे विचारविश्‍व उद्‍धृत करतो. “कलावंताला अभिव्यक्तिस्वातंत्र्य असलंच पाहिजे. परिणामांची तमा न बाळगता त्याने कलानिर्मिती केली पाहिजे. पण, त्याची कलाकृती कुठे आणि कशी दाखवायची, याचा संयम त्याने बाळगला पाहिजे. आर्ट आणि पोर्नोग्राफी यांच्यात एक अतिसूक्ष्म रेषा असते, याचं भान कलावंताला ठेवावं लागतं आणि हा विषय अत्यंत जबाबदारीने हाताळावा लागतो. जीवनात नग्नता ही व्यक्तिसापेक्ष असते. प्रत्येकाच्या संस्काराप्रमाणे ती कमी अधिक प्रमाणात स्वीकारार्ह असते. प्रत्येक धर्मात, देशात तिला वेगवेगळ्या प्रमाणात मान्यता असते.” आपल्या देशातल्या अन्य कुठल्याही कलाकाराला जो विरोध सहन करावा लागला नाही, तो केवळ हुसेन यांनाच का सहन करावा लागला, याचे उत्तर वरील आत्मवृत्तात सापडेल. अत्यंत प्रगल्भ म्हणून याकडे पाहिले पाहिजे. नग्नतेकडे भारतीयांचा पाहण्याचा दृष्टिकोन परंपरेने निकोप आहेच आणि त्याची साक्ष भारतीय मूर्तीकलेची साक्ष देणारी लेणी देतच असतात. उलट या लावण्यमय मूर्त्यांची नाकं फोडणारे, त्यांचे हात तोडणारे, वक्षस्थळांचा भंग करणारे कुठल्या संस्कृतीचे पाईक आहेत, हे जरा तपशीलात जाऊन शोधले तर त्याचे उत्तर सहज सापडू शकते. पण, तसे करण्याचे धाडस अद्याप तरी आपल्याकडच्या कला क्षेत्रातल्या मंडळींना आलेले नाही. व्यापारी म्हणून आलेल्या इंग्रजांनी राज्यकारभार ताब्यात घेतला. त्यानंतर इथल्या मंडळींनीही हळूहळू त्याचा स्वीकारच केला. इंग्रजांच्या प्रत्येक कृतीला उच्च दर्जाची कृती मानले गेले. कलाक्षेत्रही याला अपवाद राहिले नाही. लैंगिकता, प्रणय, स्त्री-पुरुष संबंध यांच्याकडे ख्रिस्ती धर्म ज्या पापपुण्याच्या संकल्पनातून पाहातो, त्याचे प्रतिबिंब इथले कायदे आणि अशा विषयांकडे पाहण्यात आले. दुसरे म्हणजे, ज्यांना आपल्या कलेतील मूल्ये समाजात रुजावी, असे वाटते, त्यांना त्यासाठी ठाम उभे राहून लढावे लागते. मूल्ये रुजावी म्हणून करावा लागणारा संघर्षही करावा लागतो. तिथे असे पळ काढून चालत नाही. नेल्सन मंडेला, मार्टिन ल्यूथर वगैरे ही काही फक्त सांगण्याची नावे नाहीत. त्यांनी आपल्या मूल्यांसाठी संघर्ष केला आहे आणि रक्तही सांडले आहे. कलाप्रकार म्हणून या सिनेमाकडे पाहायचे तर त्याला ‘दर्जेदार’ म्हणूनच पाहावे लागेल. मात्र, मूल्यनिर्मितीच्या ऐरणीवर सिनेमा कसा टिकवायचा हा प्रश्‍न पडतो.


@@AUTHORINFO_V1@@