निवडणुकांचे वारे - बेळगावपासून बेळगावीपर्यंत

Total Views |

 


दि. १२ मे रोजी कर्नाटक विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. आता कर्नाटनकात विविध राजकीय पक्षांचा प्रचारही शिगेला पोहोचला आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’चे प्रतिनिधी जयदीप दाभोळकर आणि निमेश वहाळकर हे सध्या कर्नाटकातील या एकूणच निवडणूक प्रचाराचे, तिथल्या घडामोडींचे दैनंदिन वार्तांकन करत असून आज जयदीप दाभोळकर यांचा लेख प्रकाशित करत आहोत.


देशात निवडणुका म्हटल्या तर त्याचं स्वरूप काही उत्सवापेक्षा कमी नाही. एकीकडे संपूर्ण देश भाजपमय होत असताना कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीचेदेखील वारे वाहू लागले आहेत. काँग्रेससाठी आपला गड राखण्याच्या दृष्टीने तर भाजपसाठी आपला गेलेला गड परत मिळविण्याच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. निवडणुका म्हटल्या तर बंड, अस्मिता असे अनेक शब्द कानावर पडत असतात. त्यातच कर्नाटक या राज्याची निवडणूक म्हटली तर महत्त्वाचा प्रश्न समोर येतो तो म्हणजे सीमाभागाचा आणि त्या भागातील मराठी मतदारांचा. त्यातच बेळगावमधलं राजकारण म्हटलं तर बेळगावचं ‘बेळगावी’ असं नामांतरण, पालिका बरखास्ती अशा अनेक घटना समोर आल्या. त्यातच मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनी मराठी येत नसल्याने मागितलेली माफी आणि येडियुरप्पा यांनी त्यांची ही माफी म्हणजे कानडी लोकांचा झालेला अपमान असं केलेलं वक्तव्य अशा अनेक राजकीय घडामोडींनी ही निवडणूक गाजत आहे.


बेळगाव म्हटले तर त्यात एकूण १८ विधानसभा मतदार संघ आहेत. बेळगावच्या उत्तर आणि दक्षिण भागावर मराठीचाच वरचष्मा आहे. महत्त्वाचं म्हणजे बेळगाव शहर या मतदार संघाची उत्तर आणि दक्षिण या दोन भागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. उत्तर मतदारसंघ म्हटला तर कानडी, उर्दू भाषिकांसह बहुसंख्य मराठी भाषक मतदारांचा पगडा या मतदार संघावर आहे. यातच काही कानडी भाषकांच्या वसाहती नव्याने स्थापन करण्यात आल्या आहेत. तरीदेखील या भागांमध्ये मराठीचा वरचष्मा आहे. १९५७ ते १९९९ या कालावधीत मराठी आमदार या भागांमधून निवडून गेले. मात्र, २००८ मध्ये विधानसभा मतदार संघाची पुनर्रचना करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात मराठी मतदार विभागला गेला आणि दुसर्‍या भागात उर्दू भाषक बांधवांचे वर्चस्व निर्माण झाले. दक्षिण मतदार संघात येळ्ळूर आणि अन्य सीमाभागांचा समावेश करण्यात आला. बरेच वर्ष महाराष्ट्र एकीकरण समितीचा बोलबाला असलेल्या या क्षेत्रात २०१३ साली समितीच्या उमेदवार रेणू किल्लेकर यांना मतविभागणीचा फटका बसला होता तर दुसरीकडे कॅम्प परिसरात ख्रिस्ती बांधवांचे वर्चस्व आहे. त्याचप्रमाणे उर्दू, कानडी आणि मराठी भाषकांचेही प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे या परिसरातील ही मते निर्णायक ठरत असतात. या भागातील नागरिक आजही विकासापासून वंचित असून काही वर्षांपूर्वी या भागासाठी ५ कोटींच्या निधीची मागणी करण्यात आली होती. मात्र, कर्नाटक सरकारने नागरिकांच्या तोंडाला पाने पुसत १ कोटींचा निधी दिला. आजही हा परिसर विकासाच्या प्रतिक्षेत आहे. उत्तर मतदार संघात यावेळी निवडणूक चुरशीची होणार असून या भागात काँग्रेसच्या फिरोज सैठ याचे वर्चस्व असल्याचे दिसून येते. असे असले तरी भाजपच्या अनिल बेनके आणि जदयूच्या अश्फाक मदकी यांनीदेखील जोर लावला आहे.

दक्षिण विभागाकडे पाहिल्यास २०१३ मध्ये झालेल्या निवडणुकीत या भगातून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या संभाजी पाटील यांचा विजय झाला होता. मात्र, सद्य परिस्थिती बदलली असून भाजप आणि काँग्रेसनेही या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. दक्षिण मतदार संघात मराठी भाषकांची संख्या अधिक आहे. मात्र, महाराष्ट्र एकीकरण समितीतील दोन गट मतविभागणीस कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. ठाकूर आणि दळवी गटाने आपापल्या दिलेल्या उमेदवारांमुळे दोघांचं भांडण तिसर्‍याचा लाभ अशी काहीशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीत असलेल्या अंतर्गत वादाचा फटका त्यांना या निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.

बेळगाव ग्रामीण कुणाचा ?

बेळगाव ग्रामीण हा भाग महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. असे असले तरी गेल्या दोन निवडणुकांमध्ये विजय भाजपच्याच वाट्याला आला आहे. या मतदार संघात एकूण २ लाख ३२ हजार ४३० मतदार आहेत. त्यापैकी मराठी मतदारांची संख्या ९० हजारांच्या जवळपास आहे. २०१३ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या संजय पाटील यांचा विजय झाला होता. त्यांनी ३८ हजार ३३२ मते मिळवत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बालेकिल्ल्यात पुन्हा सेंध लावला होता. सलग दोनदा विजय मिळवत त्यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. यावर्षीदेखील भाजपने त्यांनाच पुन्हा उमेदवारी देत महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार आणि माजी आमदार मनोहर किणेकर यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे. सध्या ग्रामीण बेळगावकडे पाहिले तर आजही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. गेल्या ५७ वर्षांपासून राकसकोप धरणाच्या नजीकच्या गावांचा पाणी प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. धरणासाठी जागा घेतल्यानंतर त्या ठिकाणच्या नागरिकांचे पुनर्वसन करण्यात आले होते. मात्र, त्यांच्यापर्यंत धरणाचे पाणी पोहोचले नसून ही गावे आजही तहानलेली आहेत. दुसरा मोठा प्रश्न म्हणजे तुरीमरी डम्पिंग ग्राऊंडचा. हे डम्पिंग ग्राऊंड हलवण्यासाठी अनेक आंदोलने करण्यात आली. मात्र, हा प्रश्न आजही प्रलंबित आहे. पाणीटंचाई, खड्डेमय रस्ते यामुळे हा भाग आजही विकासापासून दुर्लक्षित राहिल्याची भावना या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे.

खानापुरात प्राबल्य कोणाचे ?

सीमा लढ्यात खानापूरला एक महत्त्वाचे स्थान आहे. पाटसकर निवाड्यानुसार भाषावार प्रांतरचना करण्याचा ठराव खानापूरने १९५१ साली अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिवेशनात केला होता. त्यानंतर बिरजे गुरूजी यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यावेळी निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मात्र, त्यानंतर १९५७ आणि १९६२ साली त्यांनी निवडणूक जिंकली. २०१३ साली झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अरविंद पाटील यांचा विजय झाला होता. यावर्षीदेखील त्यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्यासमोर काँग्रेसच्या अंजली निंबाळकर यांचे आव्हान असणार आहे.

यमकनमर्डी जारकीहोळी विरुद्ध अष्टगी

यमकनमर्डी हा एकमेव मतदार संघ मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. पुनर्रचनेनंतर यमकनमर्डी या मतदार संघाची निर्मिती करण्यात आली. या मतदारसंघात एकूण २३४ मतदान केंद्रे असून त्यातली २२ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील मानली जातात. यमकनकर्डी मतदार संघात एकूण १ लाख, ८४ हजार ३६२ मतदार आहेत. पाहायला गेलो तर हा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सतीश जारकीहोळी यांचे या मतदार संघावर वर्चस्व आहे. मात्र, यावेळी भाजपच्या मारूती अष्टगी यांचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. जारकीहोळी यांचे या भागावर वर्चस्व असले तरी एकंदरीत परिस्थिती पाहता त्यांना यावेळी अष्टगी यांचे तगडे आव्हान स्वीकारावे लागणार आहे. २००८ साली या मतदारसंघाची निर्मिती झाली. त्यापूर्वी हा मतदार संघ संकेश्वर मतदार संघ म्हणून ओळखला जायचा. २००८ सतिश जारकीहोळी यांना विजय मिळाला होता. २०१३ मध्ये जारकीहोळी यांनी अष्टगी यांचा २३ हजार ८५२ मतांनी पराभव केला होता. मात्र, त्यानंतर अष्टगी यांनी आपला जनसंपर्क वाढवत मतदारसंघातील समस्यांना वाचा फोडण्याचे काम सुरू केले. भाजपच्या सभा, कार्यकर्त्यांच्या बैठका, पक्षबांधणी अशी अनेक कामे त्यांच्या नेतृत्वात करण्यात आली. त्यामुळे यमनकर्डीची निवडणूक चुरशीची ठरणार आहे. बंड, अंतर्गत वाद, वरचढ उमेदवार अशा विविध बाबींमुळे बेळगावच्या मैदानावर सामना कसा रंगेल आणि त्याचा निकाल कोणाच्या बाजूने लागेल, हे येता काळच सांगणार आहे.


- जयदीप दाभोळकर
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

जयदीप उदय दाभोळकर

बालपण विलेपार्ल्यात... दहावी पर्यंतचं शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात ... यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेचे आणि झीमधून डिजिटल आर्ट्से शिक्षण. सध्या मुंबई तरूण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. सामाजिक प्रश्नांची जाण त्यामुळे शक्य तितके सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न आणि डिफेन्सबाबत माहिती गोळा करण्याची आवड.