चिह्न निमित्त – निमित्त चिह्न भाग ४

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-May-2018   
Total Views |


देवी सरस्वतीच्या, मोर, हंस आणि कमळ यांच्यासह असलेल्या संयुक्त प्रतिमेचे चिह्नसंकेत आणि चिह्नार्थाचा सविस्तर विचार करण्याआधी आपण Allegory म्हणजे चिह्नार्थ आणि speaking otherwise म्हणजे दिसते त्यापेक्षा वेगळेच काही सुचवणे याची लिखित साहित्यातील संकल्पना समजून घेऊया. लिखित साहित्य म्हणजे कथा, दीर्घकथा, कादंबरी, दीर्घकाव्य, कविता आणि नाट्यसंहिता आणि चित्रपटाची कथा-पटकथा याचा अगदी प्राथमिक विचार करूया.
असे लिखित साहित्य, समोर लिहिलेल्या आणि वाचता येणाऱ्या शब्दार्थांच्या नुसार वाचता येतेच त्याचबरोबर क्वचित प्रसंगी चिह्नसंकेत असलेले निश्चित विधान म्हणूनही वाचता येते अथवा ऐकता येते आणि पहाताही येते. कवी बा सी मर्ढेकर आणि कवी ग्रेस यांच्या कविता तुमच्या परिचयाच्या नसल्याच तर एकदा त्यांच्या वाचनाचा अनुभव नक्की घ्याच. माझ्या या विधानाची खात्रीच पटेल तुम्हाला. चार-दोन वेळा वाचून तुम्हाला त्या शब्दार्थांचा मागोवा घेत येईल कदाचित मात्र त्यातले सूक्ष्म - गूढ भाव समजून घ्यायला त्या कवितांचा ध्यास घ्यावा लागेल, त्याच वेळी...त्या कवीलाही समजून घ्यावे लागेल.

माननीय सुनीताबाई आणि शब्दप्रभू माननीय पु ल देशपांडे दोघे मिळून, त्यांच्या विलक्षण वाचिक अभिनयातून, मर्ढेकरांच्या कविता सादर करीत असत. या दोघांच्या कविता सादरीकरणाची अनुभूती, त्या कवितातील सूक्ष्म – गूढ शब्दातील वातावरण निर्मिती, फार खोल परिणाम साधत असे. साहित्यातील असे चिह्नसंकेत आणि त्यांचे चिह्नार्थ, गूढार्थ ऐकता येतात ते असे, प्रतिभासंपन्न आणि सृजनशील वाचिक आणि मौखिक अभिनयातून.
विसाव्या शतकातील असेच दोन लोकविलक्षण चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे आणि गुरुदत्त, ज्यांनी त्यांच्या सृजनशील दिग्दर्शन प्रभूत्वातून आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून, रोमांचित करणारे कथा आणि काव्यातील चिह्नसंकेत, चिह्नार्थ, गूढार्थ सामान्य प्रेक्षकाला पहाण्यासाठी पडद्यावर अजरामर केले. चिह्नसंकेत वाचताही येतात, ऐकताहि येतात आणि पहाताही येतात ते असे...!!
शिल्प, चित्र आणि संयुक्त प्रतिमा याबरोबरच अशा लिखित साहित्य म्हणजे कथा, दीर्घकथा, कादंबरी, दीर्घकाव्य, कविता आणि नाट्यसंहिता आणि चित्रपटाची कथा-पटकथा यात प्रत्येकाला जाणवणारे, भासणारे, ऐकता येणारे आणि दिसणारे चिह्नार्थ निश्चित तेच असतात असे मात्र कोणी समजू नये. वाचक-प्रेक्षक-श्रोता म्हणून प्रत्येक व्यक्तीला, असे चिह्नसंकेत आणि चिह्नार्थ वैयक्तिक आकलनशक्ती आणि कुवतीनुसार नैतिक, अध्यात्मिक किंवा काल्पनिक पातळीवर, तर्कसंगत आणि योग्यच वाटतील एखाद्यावेळी. मात्र ते अन्य वाचक-प्रेक्षक-श्रोत्यासाठी अचूक असतीलच आणि स्वीकृत असतीलच असे निश्चितच नाही.
या चिह्नांची आणि अर्थातच त्यांच्या प्राचीन भारतीय अनामिक निर्मात्यांची अशी, अनेक अर्थ सामाऊन घेण्याची सहनशीलता आणि सहिष्णुता, हे सगळेच म्हणजे वैश्विक पातळी गाठणारी आदी-अनंत संकल्पना. ध्यास घेणाऱ्या वाचक-श्रोता-प्रेक्षकाला, विश्लेषणाअंती, त्यातला समर्पक अर्थ शोधण्यासाठी अशा चिह्न संकल्पना विचार करायला प्रेरित करतात, उत्तेजना देतात. चिह्न संकल्पनांचे हेच खास वैशिष्ट्य...यामुळेच हे विश्लेषण एक विज्ञान म्हणून ओळखले जाते.
चिह्न विश्वव्यापक असते तर इम्ब्लेम आणि लोगो फारसा परीचयाचा नसतो. चिह्न सर्वपरिचित असतात तर अगदी निवडक इम्ब्लेम आणि लोगो सामन्यांच्या परिचयाचे असतात. चिह्न स्वतःच आपला अर्थ सांगते तर इम्ब्लेम आणि लोगो यांचा परिचय जाणीवपूर्वक अन्य कोणी करून द्यावा लागतो. प्रत्येकालाच आणि विशेष करून आत्ताच्या तरुण पिढीला परिचित असलेली अगदी नेहमीच्या अनुभवातली काही चिह्ने तर विश्वव्यापक आहेत.

आपल्याला निश्चितपणे माहित असते की फुले, मनातल्या अनेक भावना व्यक्त करतात. लिलीचे फुल पावित्र्य आणि शुचिता व्यक्त करते. गर्द जांभळ्या रंगाचे फुल नम्रता आणि विनयशीलता प्रकट करते. लाल गुलाब प्रेमाचे तर पिवळा गुलाब स्नेहाचे प्रतिक म्हणून स्वीकृत आहे. सदाहरित आणि छोटी छोटी सुगंधी पाने असलेले लॉरेल नावाचे झाड, युरोप आणि अमेरिकेत, प्रतिष्ठा-कीर्ती-उज्ज्वल यशाचे प्रतिक मानले जाते. म्हणून एक इंग्लिश वाक्प्रचार सुद्धा सर्वपरिचित आहे. You brought laurel to our nation by winning Gold medal in Olimpic games. तू मिळवलेल्या सुवर्ण पदकाने आपल्या देशाला सन्मान प्राप्त झाला आहे. देशासाठी शहीद झालेल्या योध्याच्या आणि शूर शिपायाच्या पार्थिवावर सन्मानाने अंतिम निरोप देताना याच लॉरेलच्या पानांचे चक्र अर्पण केले जाते. (चित्र १) दुसऱ्या बाजूला एखाद्या स्त्रीच्या सौंदर्याचा आदर-सन्मान करताना याच लॉरेलच्या ताज्या-नाजूक-सुगंधी हिरव्या पानांचा मुकुट तिच्या डोक्यावर कौतुकाने ठेवला जातो. (चित्र २)



देवी सरस्वती आणि अन्य संयुक्त प्रतिमांचा अभ्यास करण्यापूर्वी आपण एका विज्ञानशाखेचा परिचय करून घेऊया...!!.. सामान्यतः Taxonomy म्हणजेच वर्गीकरण शास्त्र. या एका विज्ञानशाखेच्या छत्रीखाली, आपल्या चिह्न संकल्पनांचे – चिह्नसंकेतांचे – चिह्नार्थांचे विश्लेषण आणि वर्गीकरण करणाऱ्या सर्वच विज्ञानशाखा एकवटल्या आहेत. विश्वव्यापकता - सर्वमान्यता अशा गुणवत्तेवर आधारित, आत्तापर्यंत आपण चिह्नांचे तीन प्राथमिक प्रकार पहिले. याबरोबरच चिह्नांचे अन्य वैशिष्ट्यांवर आधारित असलेल्या प्रकारांत सविस्तर वर्गीकरण करता येते.


वर्गीकरण शास्त्र आणि अशा चिह्नांचे विविध प्रकार आणि त्यांची संबोधने आपण पहिली. आता संयुक्त प्रतिमांचा अभ्यास सहज साध्य असेल...!
- अरुण फडके
@@AUTHORINFO_V1@@