कोण असेल 'डोण्ट वरी बी हॅप्पी'ची नविन नायिका?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Apr-2018
Total Views |


 
पती-पत्नीचं नातं आणि जगण्यातला स्ट्रेस यावर भाष्य करणाऱ्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकाने मराठी रंगभूमीवर गेल्या काही वर्षांत यशस्वी कामगिरी केली आहे. 'सोनल प्रॉडक्शन्स'च्या नंदू कदम निर्मित मिहीर राजदा लिखित आणि अद्वैत दादरकर दिग्दर्शित या नाटकातील उमेश कामत आणि स्पृहा जोशी ही जोडीदेखील प्रेक्षकांमध्ये प्रचंड हिट ठरली आहे. सध्याच्या पिढीतील अनेक जोडप्यांसाठी हे नाटक कौन्सेलरचे काम करताना देखील दिसून येत आहे. 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकाचा २७५ वा प्रयोग २१ एप्रिल रोजी मुंबईतील दीनानाथ नाट्यगृहात होणार आहे. पण हा स्पृहा जोशींचा शेवटचा प्रयोग असून त्यांनतर ती तिच्या चाहत्यांना या नाटकातून दिसणार नाहीये. त्यामुळे कालपासून सर्वत्र एकच चर्चा रंगत आहे ती म्हणजे, 'या नाटकात आता स्पृहाच्या जागी कोण येणार..?
 
 
ही घोषणा काल स्वतः स्पृहा जोशीने 'एफबी लाईव्ह'च्या माध्यमातून केलेली आहे. कालच्या प्रयोगानंतर उमेश व स्पृहाने सोशल मेडियावरून चाहत्यांशी संवाद साधला. उमेश-स्पृहाच्या नैसर्गिक अभिनयाने रसिकांना 'हॅप्पी' करणाऱ्या या नाटकात लवकरच महत्वपूर्ण बदल घडणार आहे. आजच्या पिढीतील नवरा बायकोची कथा मांडणाऱ्या या नाटकातील 'प्रणोती' एका नव्या रुपात लोकांसमोर येणार आहे. कारण, स्पृहाने गाजवलेल्या या भूमिकेला आता नवा चेहरा मिळणार असून, हा चेहरा नेमका कोणाचा असेल हे सध्या गुपित ठेवण्यात आले आहे. हे गुपित २१ तारखेच्या प्रयोगानंतर उलगडलं जाणार आहे. 'डोण्ट वरी बी हॅप्पी' हे नाटक लवकरच २७५ व्या प्रयोगाचा पल्ला गाठणार असून, चांगलं बुकिंग घेत असलेल्या खूप कमी मराठी नाटकांमधील हे नाटक आहे. आजदेखील हे नाटक जोरात चालत असल्यामुळे, नाटकातील हा महत्वपूर्ण बदल नाट्यरसिकांना अचंबित करणारा आहे.
 
चाहत्यांशी बोलताना स्पृहा म्हणाली, 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकातील माझ्या भूमिकेवर रसिकांनी भरभरून प्रेम केले आहे. मात्र काही इत्तर कमिट्मेंट्समुळे मी या भूमिकेतून बाहेर पडत आहे. मी जरी नसले तरी, या नाटकाचा प्रवास यशस्वीरित्या अखंड चालू राहील असा मला विश्वास आहे. सध्याच्या काळाच्या नजरेतून बदलणारी नवराबायकोच्या नात्याची व्याख्या आणि विचार हा या नाटकाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे, हा प्रत्येकांच्या जिव्हाळ्याचा विषय असून, या नाटकाला प्रेक्षकांची अशीच भरभरून साथ लाभो ही सदिच्छा'.
 
@@AUTHORINFO_V1@@