या सरकारला रुमण्याचा हिसका दाखवा : अजित पवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Apr-2018
Total Views |

 
 
उंब्रज (सातारा) : सरकारमधील मंत्री बेताल वक्तव्य करून शेतकऱ्यांना वेदना पोहोचवण्याचे काम करत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात यांच्या पायावर गोळ्या मारा तर दुसरीकडे मंत्री म्हणतात की शेतकऱ्यांकडे मोबाईलचे बिल भरण्यासाठी पैसे आहेत, पण वीज बिल भरण्यासाठी नाहीत. हे शहरी मुखवटा असलेले सरकार आहे. या सरकारला रुमण्याचा हिसका दाखवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सुरु असलेल्या हल्लाबोल आंदोलनात उंब्रज येथील सभेत ते आज बोलत होते.
 
 
नोटाबंदी केली तेव्हा हे सरकार म्हणाले होते की भ्रष्टाचार रोखण्यासाठी, दहशतवाद रोखण्यासाठी हा निर्णय आहे. पण उंब्रजला नव्या नोटा पोहोचण्याआधी दहशतवाद्यांकडे नव्या नोटा नोटाबंदीनंतर उपलब्ध होत्या असे पवार म्हणाले. नोटाबंदीमुळे भ्रष्टाचार थांबला आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. भाजपचे लोक इतके बिलंदर आहेत की यांनी शेतकरी संघटनेतून सदाभाऊ खोत यांना फोडले, मंत्रीपद दिले. मंत्रीपद मिळाले तरी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत. या सरकारला घरी बसवणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
 
 
कराडने यशवंतराव साहेब, पी.डी. पाटील साहेब यांच्यानंतर शरद पवार साहेबांवर विश्वास दाखवला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांना मी सांगू इच्छितो की त्यांनी त्यांच्या परिसराचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावा. आपण राष्ट्रवादीच्या विचारांचे लोक आहोत. त्यामुळे पक्षपात विसरून सर्वांची कामे करावी, असा सल्ला त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला.
 नगर हत्याकांडातील आरोपी संग्राम जगताप याची पाठराखण

सरकारने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा धसका घेतला आहे. नगरमध्ये संग्राम जगताप या तरुण आमदाराला एक हत्या प्रकरणात गोवण्यात येत आहे. मी संग्रामला जवळून ओळखतो. तो अत्यंत मेहनती आमदार आहे. माझ्या पक्षातील लोकांवर माझा संपूर्ण विश्वास आहे, असे सांगत त्यांनी नगर जिल्ह्यातील केडगाव येथे शिवसेना कार्यकर्त्यांच्या नुकत्याच झालेल्या हत्येचा प्रमुख आरोपी आमदार संग्राम जगताप याची पाठराखण केली.
 
सरकारच्या काळात विद्यार्थी अडचणीत आहेत. फक्त मोठ्या लोकांसाठी निर्णय घ्यायचे हे सरकारचे धोरण आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात वीजेचे कनेक्शन बंद केले आहेत. असा अन्याय का केला जात आहे? साताऱ्याला एकही मंत्रीपद दिले गेले नाही. त्यासाठी हा हल्लाबोल आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
@@AUTHORINFO_V1@@