रुग्ण तक्रार निवारण समितीची स्थापना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Apr-2018
Total Views |
 
 
 
रुग्ण तक्रार निवारण समितीची स्थापना
जळगाव, ८ एप्रिल
डॉक्टर, रुग्णांचे नातेवाईक यांच्यातील संवादाअभावी रुग्णालयात हिंसाचार, रुग्णांची हेळसांड किंवा ग्राहक संरक्षण कायद्यान्वये केसेस अशा घटना घडू नये म्हणून आयएमएचे नवनिर्वाचित मानद सचिव डॉ. विलास भोळे यांनी १० सदस्यीय रुग्ण तक्रार निवारण समितीची घोषणा केली.
समितीत आयएमएचे अध्यक्ष, मानद सचिव, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक हे तीन पदसिध्द सदस्य आहेत. इतर सदस्यांमध्ये डॉ. राजेश पाटील, डॉ. स्नेहल फेगडे, डॉ. धर्मेंद्र पाटील, डॉ. प्रिती दोशी, ऍड. विजेयता सिंग, ऍड. श्रीकांत भुसारी, सामाजिक कार्यकर्ते आर. बी. पाटील यांचा समावेश आहे.
गणपतीनगरातील रोटरी हॉलमध्ये रोटरी क्लब, जळगाव आणि आयएमए जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ‘डॉक्टर, रुग्ण व ग्राहक संरक्षण कायदा’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्राचे संचालन डॉ. प्रदीप जोशी यांनी केले. व्यासपीठावर रोटरीचे अध्यक्ष डॉ. तुषार फिरके, आयएमएचे अध्यक्ष डॉ. किरण मुठे, मानद सचिव डॉ. विलास भोळे, डॉ. राजेश पाटील, प्रा. डॉ. ऍड. विजेयता सिंग, ऍड. श्रीकांत भुसारी यांची उपस्थिती
होती.
डॉ. किरण मुठे यांनी आज डॉक्टरांचे जीवन असुरक्षित झाले आहे का, रुग्ण उपचारांबाबत असमाधानी आहे काय? अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे डॉक्टरांनी जाणकार मित्र व्हावे व संवादाद्वारे प्रश्न सुटावे म्हणून हे चर्चासत्र आयोजित केल्याची भूमिका स्पष्ट
केली.
ऍड. श्रीकांत भुसारी यांनी १९८६ मध्ये ग्राहक संरक्षण कायदा लागू झाल्याची माहिती देऊन डॉक्टर व रुग्ण यांच्यातील विविध खटल्यांची व निर्णयांची माहिती दिली. निष्काळजीपणा या मुद्यांचा प्रत्येक घटनेत वेगवेगळा अर्थ निघतो, असे सांगितले. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून डॉक्टरांविषयी नाराजी व असूया व्यक्त होतांना दिसते. गैरसमजातून हे प्रकार घडत
असतात.
त्यामुळे डॉक्टरांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद कायम ठेवला पाहिजे, तसेच उपचाराची पूर्ण माहिती देणारी कागदपत्रे तयार करून रुग्णासही दिली पाहिजे. समूपदेशन प्रभावी उपाय असून, वैद्यकीय क्षेत्रातील स्पर्धेमुळे काही अंशी या क्षेत्रातही अपप्रवृत्तींचा शिरकाव झाला असल्याची शक्यता डॉ. विलास भोळे यांनी व्यक्त केली. पोलिसांना वैद्यकीय कायद्याविषयी ज्ञान पूर्ण नसते. वैद्यकीय सेवा जर कायद्याने व्यवसाय असेल, तर जाहिरात करण्यास डॉक्टरांना मुभा दिली पाहिजे, असेही ते म्हणाले.
प्रा. डॉ. ऍड. विजेयता सिंग यांनी ग्राहक संरक्षण कायद्याविषयी सविस्तर माहिती देत यात कोणतीही फी लागत नाही व वकिलांऐवजी स्वतःला युक्तिवाद करता येतो. प्रत्येक घटनेत वेगवेगळा निर्णय येत असतो. मात्र कायद्याचा दुरुपयोग होऊ नये असेही त्या म्हणाल्या. समाजाने घ्यावयाची काळजी याबद्दल डॉ. राजेश पाटील यांनी भूमिका मांडतांना अलीकडे ग्राहक संरक्षण कायद्यापेक्षा ३०६ हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे प्रमाण वाढत आहे. तथाकथित समाजसेवक, सामाजिक संस्था, ‘गुगल’ आदींच्या माध्यमातून मिळालेली माहिती यामुळे डॉक्टर व रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांच्यात वाद निर्माण होतात. एकदा डॉक्टरांची निवड केल्यावर तो देव नाही पण दानवही नाही हे समजून घेतले पाहिजे. काही शंका असेल तर आपल्या परिचित डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@