स्फटिकनिशा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Apr-2018
Total Views |
 
केवळ जातीवरून एका रात्रीत एवढं आकांडतांडव झालं. असंख्य ज्यूंचं आयुष्य एका रात्रीत बरबाद झालं, संपलं! का? तर फक्त ते ज्यू होते म्हणून. हा द्वेषविस्फोट शमल्यावर, १० नोव्हेंबर उजाडत असतांना जर्मनीच्या रस्त्यांवर काळं कुत्रंही दिसत नव्हतं, दिसत होत्या त्या फक्त काचा! एका रात्रीत शहराचे रस्ते फुटलेल्या काचांनी भरून गेले होते. आणि म्हणूनच, एक क्रूर थट्टा म्हणून या अमानुष दहशतवादी हल्ल्याला नावं मिळालं, 'क्रिस्टल नाईट', स्फटिकनिशा!
 
 
एडॉल्फ हिटलर हा महत्त्वाकांक्षी नेता, दुसऱ्या महायुद्धाचा व्हिलन कुठल्या गोष्टीमुळे बनला? दुसऱ्या देशांत सैनिकी आक्रमण करून ते ताब्यात घेणे, हे तर अनेक देश करत आले होते. पण हिटलर या नावासरशी संपूर्ण जगाचं तोंड वाकडं का होऊ लागलं? अजूनही का होतं? याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्याचा ज्यूंबद्दलच्या वंशद्वेष; आणि त्या द्वेषापोटी त्याने केलेले/करवलेले अमानुष अत्याचार. उघडउघड जातीय विद्वेषाने भरलेल्या भाषणांच्या आणि कार्यपद्धतीच्या जोरावर नाझी पार्टी जर्मनीवर अधिसत्ता गाजवत होती, तेव्हाची ही घटना.
 
‎ सुरुवातीच्या काळात हिटलरचा ज्यू द्वेष हा तौलनिकदृष्ट्या सौम्य पद्धतीने प्रकट होत होता. १९३३ सालापासून नाझी सत्तेने अनेक ज्यू-विरोधी कायदे बनवून त्या जातीवर विक्षिप्त बंधने लादली. ज्यूंना सरकारी नोकरी करण्यापासून बंदी, ज्यूंना ज्यू नसलेल्यांशी लग्न करण्यापासून बंदी, एवढंच काय, तर १९३५ ला पारित झालेल्या न्युरेंबर्ग कायद्याने जर्मन ज्यूंचं नागरिकत्वही रद्द करण्यापर्यंत हिटलरची मजल गेली. तो तर पहिल्या महायुद्धातल्या पराभवाचं आणि वायमार चलन फुगवट्याचं खापर पूर्ण ज्यू जमातीवरच फोडत होता. त्यामुळे, कायदे आणि नियम करून नाझी सत्तेने ज्यूंची जर्मनीमध्ये सामाजिक आणि राजकीय नाकेबंदी केली. यात हिटलरला गोबेल्स आणि हायड्रीचचं सगळ्यात मोठं सहाय्य होतं. यामुळे असंख्य ज्यू इतरत्र आसरा शोधू लागले. जर्मनीमध्ये त्यांचं राहणं अशक्य झालं होतं. पण इतकी प्रचंड संख्या एकरकमी सामावून घेईल असा कुठलाच देश नव्हता. या त्यांच्या अधांतरी परिस्थितीबद्दल हाईम वाईझमन (पुढे जाऊन इस्त्राईलचा पहिला राष्ट्रपती)१९३६मध्ये लिहीतो,
 
‎"The world seemed to be divided into two parts—those places where the Jews could not live and those where they could not enter."
अशातच जर्मनीतून हाकलून दिलेल्या, पण पोलंडने न स्वीकारलेल्या ज्यूंच्या घोळक्यात एक दांपत्य होतं, सेंडेल आणि रिवा ग्रिन्झपन. त्यांना निर्वासितावस्थेत जर्मन-पोलीश सरहद्दीवर Zbaszyn नावाच्या गावात दिवस काढावे लागत होते. त्यांच्या परिस्थितीबाबत त्यांनी पॅरिसला राहणाऱ्या त्यांच्या १७ वर्षीय मुलाला, हर्शेलला पत्र लिहीलं. तो स्वतः एक निर्वासित म्हणूनच फ्रांसला गेला होता. त्या पत्रात लिहीलं होतं,
 
"No one told us what was up, but we realised this was going to be the end ... We haven't a penny. Could you send us something?"
 
त्याला हे पत्र ३ नोव्हेंबर, १९३८ रोजी मिळालं. आणि हेच पत्र, नाझी अमानुषता हाताबाहेर जाण्याचं कारण ठरलं.
 
पॅरिस मध्ये राहणाऱ्या हर्शेल ग्रिन्झपनच्या हातात त्याच्या आई वडिलांचं ते पत्र पडलं, आणि त्याला त्यांच्या भयावह परिस्थितीची कल्पना आली. त्याचं वय होतं १७ वर्षं. तरूण रक्त. हिटलरच्या विकृत हुकूमशाहीची त्याला चीड होतीच, पण या पत्राने त्या आगीत तेल पडलं, भडका उडाला...आणि त्या संतापाच्या भरात तो रिव्हॉल्व्हर घेऊन जर्मन एंबसीत गेला. तिथल्या एका अधिकाऱ्याला भेटायचंय असं सांगून तो आत गेला आणि अर्न्स्ट व्हॉम राथ नावाच्या जर्मन राजनैतिक अधिकाऱ्यावर त्याने गोळ्या झाडल्या. पाच गोळ्या लागून तो जर्मन जबर जखमी झाला. तो संपला असं वाटून हर्शेल स्वहस्ते पोलीसांच्या अधीन झाला; पळून जाण्यात त्याला काडीचाही रस नव्हता. या घटनेमुळे हर्शेलचा राग निघाला, कदाचित काही ज्यूंना आनंदही झाला असेल. पण, या झाडलेल्या गोळ्यांमुळे जर्मनीत जे झालं, ते जर हर्शेलला आधी माहिती असतं, तर त्याने ते रिव्हॉल्व्हर हाती धरलंच नसतं!
 
हे घडलं ७ नोव्हेंबर, १९३८ ला. दोन दिवसांनी, म्हणजे ९ तारखेला अर्न्स्ट राथ जखमांमुळे मेला. त्याच्या मृत्यूची बातमी जर्मनीत पोहोचली, तेव्हा हिटलर 'बिअर हॉल' क्रांतीदिन साजरा करत होता. तिथे नाझी पक्षातल सगळे 'ईलाईट्स' जमले होते. तेव्हाच त्या जर्मन अधिकाऱ्याच्या मृत्यूची बातमी हिटलरला कळाली. तो याच क्षणाची वाट बघत होता. माकडाच्या हाती कोलित दिलं गेलं होतं. गोबेल्सशी बोलून हिटलर तिथून निघून गेला, आणि हिटलरचा भोंगा असलेला गोबेल्स सगळ्या जमावाला उद्देशून म्हणाला,
 
"the Führer has decided that... demonstrations should not be prepared or organized by the party, but insofar as they erupt spontaneously, they are not to be hampered."
 
ही म्हणजे पूर्ण नाझी पक्षाला आज्ञाच होती; त्यांच्यातली अमानुषता आजमावण्याची. ठरवून केलेल्या दंगलींना विरोध असला, तरी 'अचानकपणे' उडालेला भडका हिटलरसाठी समर्थनीय होता. गोबेल्सच्या वाक्यातला गर्भितार्थ लक्षात येऊन प्रत्येकजण लगेच आपापल्या कार्यालयात जाऊन कामाला लागला. तारा आणि टेलिफोनने विविध ठिकाणी संपर्क होऊ लागला. हिटलरचे स्वयंसेवक आणि रायनहार्ड हायड्रीचच्या आज्ञेतले पोलीस तयार झाले. पटापट आज्ञा सुटल्या; स्वयंसेवकांना दंगली सुरू करण्याच्या, आणि पोलीसांना त्यांत मध्यस्थी न करण्याच्या!
 
९ नोव्हेंबरची रात्र आणि १० नोव्हेंबरची पहाट, ही जर्मनी आणि ऑस्ट्रियातली नाझींची पाशवी बर्बरता घेऊनच आली. ज्यूंबद्दल खदखदत असणारा पण सौम्य पद्धतीने प्रकट होणारा द्वेष, उघडपणे आणि उग्रपणे प्रकट होऊ लागला. देशभरात हिटलरच्या पथकाने आणि काही नाझी विचारसरणीच्या जर्मन नागरिकांनीही ज्यू नागरिकांच्या इमारती फोडायला सुरुवात केली. घरं, दुकानं, हॉस्पिटल्स, शाळा अशा अनेक इमारतींची तोडफोड आणि जाळपोळ सुरू झाली. जर्मनीचे रस्ते फुटलेल्या काचांनी भरून गेले. विविध ठिकाणी आज्ञेनुसार दंगली सुरू झाल्या. खुनाखूनी सुरू झाली, जवळपास ९१ ज्यू त्यांत मारले गेले. १,००० च्या वर सिनेगॉग्स (ज्यू प्रार्थनास्थळे) या दोन देशांतून फोडून टाकले गेले. एकट्या व्हिएन्नातच ९५ सिनेगॉग्सची तोडफोड झाली होती. यासोबत येणारे दरोडे, चोऱ्या होत्याच, बलात्कार झाले असले तरी आश्चर्य नाही. पोलीस फक्त ज्यू नसलेल्या लोकांच्या सुरक्षेपुरते फिरत होते. नंतर त्यांनाही आज्ञा दिली गेली, ज्यूंना अटक करायची. एका रात्रीत जवळजवळ ३०,००० ज्यूंना अटक झाली. नंतर त्यांना अर्थातच छळछावण्यांत पाठवलं गेलं!
 
 
केवळ जातीवरून एका रात्रीत एवढं आकांडतांडव झालं. असंख्य ज्यूंचं आयुष्य एका रात्रीत बरबाद झालं, संपलं! का? तर फक्त ते ज्यू होते म्हणून. हा द्वेषविस्फोट शमल्यावर, १० नोव्हेंबर उजाडत असतांना जर्मनीच्या रस्त्यांवर काळं कुत्रंही दिसत नव्हतं, दिसत होत्या त्या फक्त काचा! एका रात्रीत शहराचे रस्ते फुटलेल्या काचांनी भरून गेले होते. आणि म्हणूनच, एक क्रूर थट्टा म्हणून या अमानुष दहशतवादी हल्ल्याला नावं मिळालं, 'क्रिस्टल नाईट', स्फटिकनिशा!
 
नुसतं नुकसान करून हिटलर थांबला नव्हता. नाझींनी केलेल्या नुकसानाची भरपाई ही त्याने नंतर ज्यूंनाच दंड ठोकून वसूल केली होती. हा बहुतेक त्याच्या विकृतीचा कळस असावा! त्या रात्रीनंतर नाझींचं आणि हिटलरचं खरं रूप सुस्पष्टपणे जगाला दिसलं. द्वेषापोटी तो कुठल्या थराला जायला तयार होता ते दिसलं, अजूनही दिसतंय. त्यामुळे आपला निरोप घेतांना माझी एकच विनंती आहे; ज्यांना कोणाला असं वाटत असेल, की भारताला हिटलरचीच गरज आहे, कृपया पुन्हा एकदा विचार करा!
 
- शुभंकर सुशील अत्रे
 
@@AUTHORINFO_V1@@