कर्णासारखेच दानी शेलूबाजारचे सुरेशचंद्र कर्नावट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
दया धर्मका मूल है, असे वाक्य आपण वारंवार ऐकतो किंवा धर्मस्य मूल दया असे ऋषिमुनींनीसुद्धा सांगितले आहे. समाजामध्ये आमच्या अवतीभवती दीन, असहाय, पीडित, विविध आजाराने त्रस्त अनेक लोक असतात. दुसर्‍याच्या मदतीची अपेक्षा करीत लाचारपणे पाहत असतात. त्यामध्ये आपणाला देव दिसतो का? हा विचार सुरू असताना त्याच्या मनातील इच्छा पूर्णत्वाला जाते, त्यावेळी देव असल्याची अनुभूती येते.
 
महाभारतातील कर्ण आपल्या दानशूरपणाबद्दल प्रसिद्ध होता. अगदी त्या कर्णाप्रमाणेच दानशूर व्यक्तिमत्त्व शेलूबाजार येथे पाहावयास मिळते. ते आहेत 71 वर्षीय सुरेशचंद्र कर्नावट. आयुष्याची सुरुवात 1973 मध्ये पाटबंधारे विभागातील कनिष्ठ लिपिक पदावरील नोकरीपासून झाली. जैन धर्मीय असल्यामुळे लहानपणापासून दानीवृत्ती. केवळ दीन-दुबळ्या कुटुंबातील हुशार मुलांच्या शिक्षणासाठी, दुर्धर आजाराने ग्रस्त असणार्‍यांना हवी ती मदत ते करतात. तुटपुंज्या पगारावर असताना कठीण परिस्थितीत त्यांनी कष्टाच्या जोरावर वैभव प्राप्त केले. कठीण परिस्थितीत अडलेल्यांची मदत करण्याची संधी कधी सोडली नाही.
1987 मध्ये शेलूबाजार येथील लक्ष्मीचंद विद्यालयाचे अध्यक्षपद स्वीकारल्यावर शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधरविण्यासाठी गुणवान शिक्षक-शिक्षिका संस्थेवर नेमल्या व शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याची लोकसहभागातून प्रयत्न केला. त्याला यशही मिळाले.
 
जैन धर्मात वेगवेगळे पंथ असून धर्मातील साधू पायी देशभर भ्रमण करत असतात त्यांना शिरपूर (जैन) येथे जाताना विसाव्यासाठी शेलूबाजारपासून 10 कि.मी. अंतरावर दोन लाख रुपये खर्च करून प्रशस्त हॉल बांधून दिला. मानवसेवी संस्थांना भेटी देण्याचा विचार झाल्याने राजस्थानातील नारायणसेवा संस्थान उदयपूर येथे पोलिओच्या साडेतीनशे रुग्णांची भेट घेतली व संस्थेची नि:स्वार्थ सेवा पाहून पोलिओच्या रुग्णांची राहण्याची, खाण्याची, एसी ऑपरेशन थिएटरची, औषधोपचाराची, कृत्रिम अवयवाची मोफत व्यवस्था करण्यासाठी भरीव आर्थिक मदत करून एकवीस रुग्ण दत्तक घेतले.
 
जोधपूर येथील गौरक्षणातील अपंग गायींसाठी बसायला गाद्या, चारा, मिष्ठान्न असा मदतीचा हात दिला. देऊळगाव मही येथील गौरक्षण, जालना येथील जैन गुरू गणेश गौरक्षण, तर्‍हाळा येथील आनंद ऋषी गौरक्षण व मंगरुळनाथ येथील केशव गौरक्षणाला गाईंच्या संगोपनासाठी भरीव आर्थिक मदत दिली.
एवढेच नाही तर, हृदयाला छिद्र पडलेल्या रुग्णाच्या उपचारासाठी कर्नावट यांनी मदतीचा हात दिला. कारंजा येथील गुरुमंदिरात आजन्म अन्नदानासाठी मदत, नाथनंगे महाराज संस्थान डव्हा येथे दैनंदिन अन्नदानासाठी मदत, महारोगी सेवा समिती दत्तपूर, अरिहंत फाउंडेशन अकोला यांना रुग्णाचे हृदयाच्या छिद्रावर शस्त्रक्रियेकरिता मदत, त्याचप्रमाणे अनेक दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना हवी त्या प्रमाणे आर्थिक मदत करून समाजसेवेत लोकांच्या हृदयात स्थान मिळविले .
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शेलूबाजार येथे 1965 साली लक्ष्मीचंद विद्यालयाची स्थापना केली, याशिवाय निर्मलादेवी कॉन्व्हेंटी स्थापले. याशिवाय राजकारणातही उडी घेत 1989 ते 2010 या वीस वर्षांत चार वेळा सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुकीत विजयी होऊन शेलूबाजार ग्रामपंचायतीमध्ये विकासासाठी शासनाच्या विविध योजना आणून समाजसेवा केली. असे हे दानी सुरेशचंद्र कर्नावट देवमाणूस म्हणून परिसरात परिचित आहेत.
डॉ. सुधाकर क्षीरसागर
मंगरुळनाथ,
@@AUTHORINFO_V1@@