सरदार पोस्ट : भारत पाक युद्धातील एक विस्मृत शौर्यगाथा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Apr-2018
Total Views |



भारताच्या इतिहासात अनेक अशा घटना घडल्या आहेत, ज्यामुळे भारताचे चित्र बदललेले आहे. १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्यापासून ते भारत-पाकिस्तान युद्धापर्यंत अशा घटनांची यादी मोठी आहे. यामध्ये भारताच्या वीर जवानांनी आपल्या प्राणांची आहुती देत भारताचे रक्षण केले आहे. अशीच एक घटना घडली १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान. फारशी कुणाला माहित नसलेली ही कथा आज जाणून घेवूयात. त्याचे खास कारण म्हणजे आज या घटनेला ५३ वर्षे पूर्ण झाली आहेत. 


 
 

"सरदार पोस्ट" : असीम शौर्याची गाथा 


ही "शौर्यगाथा" आहे गुजरातच्या कच्छ येथील रणभूमीची. १९६५ मध्ये भारत- पाक युद्धादरम्यान केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या एका तुकडीला कच्छच्या रणभूमीवर तैनात करण्यात आले होते. पाकिस्तानने भारतात घुसखोरी करण्याच्या हेतूने "कंजरकोट" आणि "डींग" येथे आपले सैन्य दल तैनात केले. या सैन्यदलाला थांबविण्यासाठी भारताच्या केंद्रीय राखीव पोलिस दल म्हणजेच सीआरपीएफने कंजरकोट जवळ "सरदार पोस्ट" आणि डींग जवळ "टाक पोस्ट" अशा दोन तुकड्या तैानात केल्या.

 ९ एप्रिल १९६५ रोजी पहाटे साधारण ३.३० वाजता पाकिस्तानच्या सैन्याच्या एका तुकडीने सरदार पोस्टच्या दिशेने कूच केले. पाकिस्तानी सैन्याच्या या तुकडीजवळ मोठ्या संख्येत सैनिक आणि प्रचंड प्रमाणात शस्त्रसाठा होता. सरदारपोस्टच्या दिशेने सैनिक येत असताना हवलदार रणजीत सिंग यांनी बघितले आणि आपल्या सहकारी पोलिस सैनिकांना सावध केले. यानंतर मोठे युद्ध सुरु झाले. सर्व पोलिस सैनिकांनी मोठ्या बहादुरीने मोर्चे सांभाळले.

सैनिकांकडे शस्त्रसाठा कमी होता, पाकिस्तानी सैन्याला पराजित करण्यासाठी टाकपोस्टवरील टेहळणी मचाण देखील नष्ट करण्यात आली. कॉन्स्टेबल शिवराम यांनी ६०० यार्डांवरुन होत असणाऱ्या मॉर्टार फायरिंग बद्दल टाक पोस्टला सावध केले. पाकिस्तानी सैन्याला नेस्तनाबूत करण्यासाठी एक विशेष युक्ती करण्यात आली. त्वरित गोळीबार थांबवण्यात आला. पाकिस्तानला भासवण्यात आले की सर्व सैनिकांचा मृत्यु झाला आहे. पाकिस्तानी सैन्य जवळ येताच पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरु करण्यात आला. पाकिस्तानी सैन्य बावचळून गेले. घाबरून पळायला लागले.




केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या असीम शौर्यामुळे पाकिस्तानी सैन्यातील ३४ जवानांना ठार करण्यात त्यांना यश आले तर ४ जवानांना जीवंत पकडण्यात आले. पहाटे तीन वाजेपासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत (भारतीय सेनेच्या जवानांच्या अनेक तुकड्या सरदार पोस्टवर पोहोचे पर्यंत) सीआरपीएफच्या जवानांनी पाकिस्तानी सैन्याला झुंझ दिली.

आपल्या असीम शौर्य आणि बहादुरीच्या जोरावर त्यांनी पाकिस्तानच्या भल्या मोठ्या फौजेला पराजित केले. या युद्धात नायक किशोर सिंह, कॉन्स्टेबल शमशेर सिंह, कॉन्स्टेबल ज्ञान सिंह, कॉन्सटेबल सिद्धवीर प्रधान, कॉन्स्टेबल किशन सिंह आणि लान्स नायक गणपतराम शत्रुशी लढता लढता शहीद झाले. या शौर्यगाथेचे प्रणेते पोलिस अधिक्षक डी.एस पॉल, सुबेदार काशीराम सुब्बा, हेड कॉन्स्टेबल रणजीत सिंह, कॉन्स्टेबल विश्वनाथ सिंह, कॉन्स्टेबल माखनलाल दत्त आणि कॉन्स्टेबल शिवराम यांना राष्ट्रपती वीरता पुरस्काराने गौरविण्यात आले. 

 
 
 
 
 
आज या घटनेला ५३ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांनी या युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला तसेच अनेक वीर सैनिकांनी ट्विटरच्या माध्यमातून सर्व शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली, तसेच या घटनेत असीम शौर्य आणि बहादुरी दाखवणाऱ्या जवानांप्रति आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
 
 
 
 
भारत - पाकिस्तान युद्धात अशा अनेक शौर्य गाथा आहेत. ज्यापैकी अब्दुल हमीदच्या शौर्यासारख्या काही कथा लोकांना माहीत आहेत. मात्र सरदारपोस्टच्या शौर्यगाथेसारख्या काही कथा आहेत, ज्या विस्मृतीत गेल्या आहेत. त्यांचे शौर्य आणि त्यांची बहादुरी देखील तितकीच महत्वाची आहे. आजच्या या दिनानिमित्त विस्मृतीत गेलेल्या अशा सर्व सैनिकांना श्रद्धांजली.  
 
 
 
 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@