राष्ट्रवादी-कॉंग्रेस-भाजप यांनी मिळून हत्या केली : रामदास कदम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Apr-2018
Total Views |

आरोपींवर कडक कारवाई व्हावी यासाठी उद्या मुख्यमंत्र्यांची घेणार भेट




नगर : 'आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी आणि शिवसेनाला शह देण्यासाठी राष्ट्रवादी-कॉंग्रेस आणि भाजपने संगनमताने शिवसैनिकांची हत्या केली आहे.' असा आरोप शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी आज केला आहे. शिवसैनिकांच्या हत्येनंतर नगर येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
यावेळी शिवसैनिकांच्या हत्यावरून त्यांनी राष्ट्रवादी-कॉंग्रेस आणि भाजपवर जोरदार टीका केली. भाजपचे नेते कर्डिले यांचे जगताप यांच्याशी अत्यंत चांगले संबंध आहेत. त्यामुळे नगरमध्ये शिवसेनाला शह देण्यासाठी म्हणून राष्ट्रवादी-कॉंग्रेस आणि भाजप यांनी एकत्रितपणे ही निवडणूक लढवली. भाजप एका बाजूला सेनेला युतीसाठी आवाहन करत आहे तर दुसऱ्या बाजूला सेनेच्या मुळावरच घाव घालण्याचा प्रयत्न करत आहे', अशी जोरदार टीका कदम यांनी यावेळी केली. तसेच जिल्ह्यातील परमार आणि शिंदे नावाच्या दोन बड्या पोलीस अधिकाऱ्यांचा देखील या हत्येमध्ये हात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या दोघांचे तातडीने निलंबन करण्यात यावे, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.


उत्तर प्रदेशपेक्षा भयानक परिस्थिती
राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयावर हल्ला केला जातो आणि आमदाराला घेऊन जाण्यात येते, यावरून नगरमध्ये गुंडगिरी किती मोठ्या प्रमाणात वाढली आहे, याची जाणीव होते. परंतु यावर पोलीस देखील कसल्याही प्रकारची कारवाई करत नाही. त्यामुळे जिल्ह्यात उत्तर प्रदेश पेक्षा भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले.

नागरिकांचे लक्ष विचलित करण्याचा विरोधकांचा प्रयत्न
याचबरोबर विरोधकांकडून या हत्यावर करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या टिप्पणीवर देखील त्यांनी भाष्य केले. शिवसैनिकांची हत्या ही भाऊबंदकी तसेच सावकारशाहीमधून झाल्याच्या बतावण्या विरोध करत आहेत. परंतु हे फक्त नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचे कदम यांनी म्हटले. हत्या करणारा हल्लेखोर हा जगताप यांच्यासह अनेक ठिकाणी फिरत असल्याचे पुराव्यासह उघड झालेले आहे. तसेच विजयी उमेदवाराला हे राष्ट्रवादी-कॉंग्रेस आणि भाजपवाले डोक्यावर घेऊन नाचत आहेत, त्यामुळे या हत्या राजकीय द्वेषातूनच झाल्या आहेत, असे त्यांनी म्हटले.

मुख्यमंत्र्यांची घेणार भेट; मृतांच्या कुटुंबांची जबाबदारी सेनेची

या घटनेतील सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आपण भेट घेणार असल्याचेही कदम यांनी यावेळी स्पष्ट केले. मुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांच्याशी याविषयी पुराव्यांसह सविस्तर चर्चा करणार आहोत आणि या प्रकरणावर जलदगतीने सोडवण्यात यावे, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच या हत्या झालेल्या शिवसैनिकांच्या कुटुंबियांची यापुढील सर्व जबाबदारी हे शिवसेनेची असेल असे देखील त्यांनी जाहीर केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@