भाजपची भलतीच रणनीती!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
 भाजपची भलतीच रणनीती!
 
जळगाव, ७ एप्रिल
महापालिकेच्या येत्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांमधील अनुभवी आणि अभ्यासू कार्यकर्त्यांची फळी जोमाने कामाला लागली आहे. ‘मिशन ५० प्लस’ आणि विरोधकांच्या मातब्बर उमेदवारांना अस्मान कसे दाखविता येईल? या दोनच मुद्यांवर सध्या भाजपमध्ये जबरदस्त खल सुरू आहे.
महापालिकेची प्रभाग रचना यंदापासून बहुसदस्यीय झाली आहे. १९ प्रभाग राहणार असून, पहिल्या १ ते १८ क्रमांकाच्या प्रभागात चार उमेदवार, तर १९ व्यामध्ये तीन उमेदवार असणार आहेत. बहुसदस्यीय प्रभाग आणि आरक्षण सोडत भाजपसाठी पोषक असून, ‘मिशन ५० प्लस’ सहज शक्य असल्याचा दावा कार्यकर्ते करीत आहेत. प्रभाग क्रमांक ः ७, १३, ८ ही प्रातिनिधिक उदाहरणे असल्याचे पक्षाचे कार्यकर्ते सांगत आहेत.
नवखे उमेदवार दाखविणार चमत्कार
बहुसदस्यीयमध्ये २० टक्के मतदान हे चिन्हावर होते. अशावेळी व्यक्ती दुय्यम ठरते. निवडून येण्यासाठी सात ते आठ हजार मतांचे लक्ष्य उमेदवारापुढे असते. मनपा ताब्यात घेण्यात पक्षाची बूथरचना निर्णायक ठरणारी आहे. माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी उपमहापौर सुनील महाजन यांच्यासह इतर मातब्बरांना अस्मान कसे दाखविता येईल? यावर पक्षातील अनुभवी व अभ्यासू कार्यकर्ते विचार करीत आहेत. नवखे उमेदवार मातब्बरांना टक्कर देऊ शकतात, अशा शब्दात त्यांनी संभाव्य रणनीतीचे संकेत दिले आहेत.
जनतेच्या आधीपासून संपर्कात
भाजप बर्‍याच आधीपासून ‘घर चलो अभियान’, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून आयोजित आरोग्य शिबीर आदी कार्यक्रमाच्या निमित्ताने सातत्याने जनतेच्या संपर्कात आहे. त्याचा लाभ होणार असल्याचा मतप्रवाह आहे. भाजपकडे विकासासारखा महत्त्वाचा मुद्दा आहे. शहरासाठी सुमारे ३२५ ते ३३० कोटी रुपयांचा भरघोस निधी भाजप सरकारने उपलब्ध करून दिला आहे. पण सत्ताधार्‍यांमुळे हा निधी शहरात वापरला गेला नाही, असा आरोप भाजपकडून नेहमीच होत आला आहे. अनेक नगरसेवकांनी प्रभागात निवडून आल्यानंतर चेहरे देखील दाखविलेले नाहीत.
खाविआसमोर मुख्य अडचण विकासाची
खाविआसारखे विरोधक पुन्हा एकदा सत्तेत बसण्यासाठी मनसे किंवा राष्ट्रवादीचा आधार शोधत आहेत. शहरातील रखडलेली विकासकामे ही मनपातील विद्यमान सत्ताधार्‍यांसमोरील प्रमुख अडचण असल्याचे भाजपच्या कार्यकर्त्याने ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
मनपा निवडणूक भाजपच्या चिन्हावरच
जळगाव महानगरपालिकेत भाजपाचाच महापौर होईल. आमचे ‘मिशन ५० प्लस’ आहेच. भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवू. आतापर्यंत महानगरपालिकेत युती झालेली नाही आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे महापालिकेची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे आम्हाला पक्षाकडून सांगण्यात आलेले नाही. पक्षश्रेष्ठींकडून जो आदेश येईल तो आम्हाला मान्य राहणार असल्याचे आमदार सुरेश भोळे यांनी भाजप कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@