‘फ़िदायिनी’ राजकारण.

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Apr-2018   
Total Views |
‘फ़िदायीन’ म्हणजे आत्मघातकी योद्धा- जो आपल्या मृत्यूला कवटाळून शत्रूचे नुकसान करून घेण्यात आपले हौतात्म्य शोधतो! मुंबईत दहा वर्षांपूर्वी आलेली अजमल कसाब टोळी वा कश्मिरात नित्यनेमाने मारले जाणारे पाकिस्तानी जिहादी, त्या मानसिकतेचे असतात. आपण काही उदात्त, महान परमेश्वरी कर्तव्य बजावत असल्याच्या समजुतीने ते आत्मघात करायला पुढे सरसावलेले असतात. अशी कृती करणारे दोन प्रकारचे लोक असतात. त्यातले पहिले उदात्ततेने भारावलेले असतात किंवा दुसरे द्वेष-सूडबुद्धीने पेटलेले असतात. सध्या भारतातील पुरोगामी दुसर्‍या गटातले फ़िदायीन झालेले आहेत. भाजपा वा मोदींशी आमनेसामने लढण्याची हिंमत त्यांच्यामध्ये उरलेली नाही. म्हणून ते घातपाती कामे करू लागले आहेत. अशा घातपातामध्ये आपले-परके असा भेदभाव न करता, असेल ते उद्ध्वस्त करून टाकण्याचा पवित्रा घेतला जात असतो. ती फ़िदायीन प्रवृत्ती आता स्पष्टपणे पुरोगामी राजकारणातून समोर येऊ लागलेली आहे. मागील सात दशकांत कॉंग्रेसने वा पुरोगामी राजकारणाने देशाला विविध लोकशाही संस्था दिल्या व परंपरा दिल्या, असा दावा नेहमी केला जातो. पण, आज त्याच परंपरा व संस्थांना सुरुंग लावून उडवण्याच्या घातपाती गोष्टी कोण करतो आहे? संसदेपासून सुप्रीम कोर्टापर्यंत प्रत्येक बाबतीत घातपाती भूमिका कॉंग्रेस व इतर पुरोगामी पक्षांनी घेतलेली आहे. अर्थात्‌, त्यांनीही आधीची दोन वर्षे मोदी कधीतरी चुका करतील आणि आपल्या जाळ्यात आयते सापडतील, अशीच अपेक्षा केली होती. पण, मोदी सरकारला चार वर्षे होत आली आणि अजून एकाही भानगडीत सरकार सापडत नसल्याने या लोकांचा धीर सुटत चालला आहे. त्यामुळे पुन्हा होणार्‍या निवडणुकांमध्ये जिंकण्याची शक्यता नसेल, तर सगळ्या संस्थाच उद्ध्वस्त करून टाकण्याचा पर्याय या लोकांनी निवडला आहे.
चार वर्षांपूर्वी मोदींनी अथक प्रचार करून लोकसभेत बहुमत व देशाची सत्ता संपादन केल्यावर त्यांची लोकप्रियता शिगेला पोहोचलेली होती. त्यांच्या विरोधात तेव्हा काही बोलणे अशक्य होते. शिवाय अनपेक्षित निकालाने पराभूत झाल्याच्या धक्क्यातून विविध पक्षांना सावरणे भाग होते. तितके सावरल्यानंतर आपल्या चुका शोधल्या असत्या, तर पराभवाच्या छायेतून बाहेर पडणे या पक्षांना शक्य झाले असते. पण, चुका मान्य करायची तयारी नसल्याने त्यांना त्याच्याही नंतर एकेका राज्यातून पुन्हा पराभवाचीच चव चाखण्याची पाळी आली. विधानसभांच्या निवडणुकाही भाजपा जिंकत गेली आणि प्रतिदिन मोदींची लोकप्रियता देशात व जगातही वाढत गेल्याने, अशा पक्षांना व नेत्यांना कमालीचे नैराश्य आले तर नवल नव्हते. जितके दिवस सरकत गेले, तितकी ही नैराश्याची धारणा प्रभावी होत गेली आणि आता आपण मोदीनामे वादळासमोर टिकू शकत नसल्याचा एक चमत्कारिक आत्मविश्वास या लोकांमध्ये आलेला आहे. मग त्यातून पर्याय म्हणून त्यांनी देश वा सत्ता उद्ध्वस्त करून टाकावी, असा उपाय शोधला आहे. ज्या लोकशाही मार्गाने मोदी विजयी होतात तो मार्गच नेस्तनाबूत करण्याची रणनीती आखलेली आहे. त्यामुळे आरंभी मोदींनी मतदाराला भूलभुलैया दाखवून मते मिळवली, असा प्रचार करण्यात आला, तरीही उत्तरप्रदेश वा आसाम या अवघड निवडणुका मोदींनी जिंकल्या. त्यामुळे भूलभुलैयाचा विषय सोडून द्यावा लागला. मग आपले अपयश झाकण्यासाठी मतदान यंत्रात गफलत असल्याचे आरोप सुरू झाले. ज्या मार्गाने यापूर्वी प्रत्येक पक्ष लोकसभा वा विधानसभांमध्ये जिंकत आला, त्याच मार्गाने व त्याच यंत्रांनी मोदी जिंकताना दिसल्यावर त्या यंत्रणेवरील जनतेच्या विश्वासाला संपवण्याची खेळी सुरू झाली. तिचाही जनमानसावर प्रभाव पडला नाही. मग काय करायचे?
 
मग संविधान बचाव किंवा संसदेचे कामकाज ठप्प करण्याची खेळी सुरू झाली. जर आपण निर्माण केलेल्या या लोकशाही संस्थांवर या लोकांचा विश्वास आहे, तर मग त्याच संस्थांचे कामकाज कसे ठप्प केले जाते? निवडणूक आयोग मोदींनी जन्माला घातलेला नाही की संसदेची निर्मिती मोदींच्या अध्यादेशाने झालेली नाही. आजवर कॉंग्रेस वा अन्य पुरोगामी सत्तेपर्यंत पोहोचले, त्याच पद्धतीने मोदी सत्तेत आलेले आहेत ना? मग त्याच लोकशाहीला सुरुंग कोण कशाला लावतो आहे? यालाच जिहादी भाषेत फ़िदायीन म्हणतात. तो स्वत:ला उद्ध्वस्त करून आसपासच्या अनेकांना मारून टाकत असतो. आताही 2019 ची निवडणूक जवळ आली असताना, विरोधकांची झोप उडाली आहे. कितीही एकजूट केली वा आघाड्या केल्या, तरी मोदींचा पराभव करण्याचा आत्मविश्वास त्यांच्यात उरलेला नाही. म्हणून मग लोकशाहीच्या मार्गालाच उद्ध्वस्त करण्याची खेळी सुरू झालेली आहे. भारताचा सीरिया होईल, अशी प्रकाश आंबेडकरांनी दिलेली धमकी यादवी माजवण्याची आहे. आजवर कुठल्याही न्याय-अन्यायाच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाचा शब्द अंतिम मानला गेला असताना, आताच त्यालाही आव्हान कशाला दिले जात आहे? संघाला, भाजपाला व मोदींना घटना व संविधान संपवायचे असल्याचे आरोप नित्यनेमाने चाललेले असतात. पण, प्रत्यक्षात त्याच संविधानाने निर्माण केलेल्या विविध संस्था वा परंपरांना झुगारण्याचा चंग कुणी बांधलेला आहे? विषय सर्वोच्च न्यायालयाचा असताना रस्त्यावर उतरून दंगे माजवणे, जाळपोळ करणे आणि त्याचे कॉंग्रेससह पुरोगामी पक्षांकडून चाललेले स्वागत कशाचा पुरावा आहे? भाजपा सरकार संपवता येत नसेल, तर देशच उद्ध्वस्त करण्याची तयारी त्यातून दिसत नाही काय? त्यालाच तर जिहादी भाषेत फ़िदायीन म्हणतात ना? आज देशातले राजकारण लोकसभा निवडणुकीच्या दिशेने पुढे सरकत नसून, फ़िदायीन घातपाती मार्गाने वाटचाल करते आहे...
कुठलेही खास कारण नसताना सुप्रीम कोर्टात अयोध्या विषयाची सुनावणी 2019 पर्यंत स्थगित करण्याची मागणी असेल. देशाच्या सरन्यायाधीशाच्या विरोधात संसदेत महाअभियोग आणण्याचा प्रयास असेल. कोर्टाकडून आलेल्या निकालाचे खापर सरकारच्या माथी फोडून, देशात यादवी माजवण्याच्या चिथावण्या असतील. हे सर्व जिहादी खेळ आहेत. त्यात अर्थातच आपलेही नुकसान गृहीत धरलेले आहे आणि असते. आपण नामशेष होऊ, आपणही नष्ट होऊ; पण आपल्यामुळे मोदी वा भाजपाही उद्ध्वस्त होतील, असा आसुरी आनंद शोधला जात आहे. अर्थात्‌, पर्यायाने देशातील लोकशाही, कायदाव्यवस्था, सामान्य माणसाच्या जीवनातील सुरक्षा यांनाही नुकसान होईल, हे प्रत्येकाला चांगले ठाऊक आहे. आपल्या अशा वक्तव्ये वा कृत्यांनी देशाच्या शत्रूंना लाभ होतो, हेही अशा पुरोगाम्यांना कळत असते. पण, त्याची फिकीर कुठे उरलेली आहे? भाजपाला पराभूत करता येत नसेल, तर देश बुडवून भाजपाची सत्ता उद्ध्वस्त करण्यापर्यंत आता ही राजकीय दिवाळखोरी गेलेली आहे. सुदैवाची गोष्ट एकच आहे- कॉंग्रेसने मागील सात दशकांत अन्य कुठली देशाच्या प्रगतीची गोष्ट केलेली नसेल, पण देशातील बहुसंख्य जनतेला अडाणी वा सामान्य बुद्धीच्या पलीकडे जाऊ दिलेले नाही; त्यामुळे ही सामान्य भारतीय जनता सामान्य बुद्धीने विचार करणारी राहिली आहे. म्हणूनच तिला ‘आत्मघाती फ़िदायीन’ व ‘देशाच्या सुरक्षेसाठी लढणारा सैनिक,’ यातला फरक नेमका ओळखता येतो. ती जनता सैनिकाच्या बाजूने उभी राहते आणि फ़िदायीन इशरत जहानची पाठराखण करणार्‍यांना जमीनदोस्त करण्याचे काम नेमके बजावते. तसे नसते तर देशाच्या कानाकोपर्‍यातून कॉंग्रेसला नामशेष करण्याचे कर्तव्य मतदाराने बजावले नसते. मोक्याच्या वेळी मोदी जिंकले नसते, की कॉंग्रेसला देशोधडीला लागायची वेळ आली नसती. ज्या जनतेने हजारो वर्षे दिवाळखोर गद्दारांच्या घातपातानंतरही खंडप्राय देश टिकवला आहे, ती जनता असल्या भुरट्या ‘राजकीय फ़िदायिनां’समोर हार मानण्याची बिलकूल शक्यता नाही...!
@@AUTHORINFO_V1@@