मुजोर सलमानचे मूर्ख समर्थक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Apr-2018   
Total Views |
सलमान खान हा गुन्हा करण्याचा अधिकार प्राप्त करूनच पृथ्वीवर अवतरला आहे. त्याच्या सर्व कारनाम्यांना फक्त आणि फक्त माफीच आहे. त्याने दारूच्या नशेत, फुटपाथवर झोपलेल्या लोकांच्या अंगावरून गाडी नेली काय अन्‌ राजस्थानातल्या जंगलात काळविटांची अवैध शिकार करून वर पुन्हा मुजोरी केली काय, त्याला शिक्षा नाही म्हणजे नाहीच! परवा जोधपूरच्या न्यायालयात त्याला शिक्षा सुनावून न्यायालयाने जणू कहरच केल्याचा कांगावा करीत त्याचे फॅन्स ज्या तर्‍हेने नक्राश्रू ढाळत होते, ते बघितल्यानंतर या देशातले सामान्य जीव कीव करण्याच्याच लायकीचे उरले असल्याच्या वास्तवावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. बलात्काराच्या एका प्रकरणात सच्चा डेराच्या प्रमुखाला शिक्षा सुनावण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध संताप व्यक्त करणार्‍या जनसमूहाने, पंचकुलाच्या रस्त्यांवर उतरून घातलेला धिंगाणा असो, की सलमानला शिक्षा झाली म्हणून बावचळलेली त्याच्या समर्थकांची जमात, यांच्यामुळेच इथल्या बड्या धेंडांची मुजोरी वाढली आहे. ती तर घटनाकारांची मेहरबानी आहे, नाहीतर इथल्या प्रत्येक राजकारण्याला, श्रीमंत माणसाला, उद्योजकाला, क्रिकेट खेळाडूला, चित्रपट कलावंताला त्यानं केलेल्या गुन्ह्यातून सूट देण्याची प्रथा केव्हाच रूढ झाली असती. मग कायद्याचा बडगा उगारला गेला असता तो केवळ गरिबांवर. शिक्षाबिक्षा काय झाली असती ती फक्त सर्वसामान्यांना. पण, त्यांच्या दुर्दैवाने वस्तुस्थिती तशी नाही. कायद्याच्या तरतुदींनी कधी नव्हे ते सहारा कंपनीच्या मालकापासून तर संजय दत्तपर्यंत आणि ए. राजापासून तर सलमान खानपर्यंत सर्वांना त्यांच्या काळ्या कृत्याची शिक्षा भोगण्यास बाध्य केले आहे. अन्यथा, चित्र किती भयानक राहिले असते, याची तर कल्पनाही करवत नाही.
 
 
सर्वांसाठी समान असलेला कायदा, पैसा आणि ताकदीच्या भरवशावर आपल्याला हवा तसा तुकवण्यासाठी स्वातंत्र्योत्तर काळात वेळोवेळी झालेले प्रयत्न तर हा देश उघड्या डोळ्यांनी बघत आला आहे. त्यांनी चालवलेली कायद्याची थट्‌टाही तो प्रत्यक्षात अनुभवतो आहे. कोट्यवधी रुपयांची लूट करून विदेशात पळून गेलेले विजय मल्ल्या व नीरव मोदी तिकडे आरामात बसून तमाम भारतीयांना वाकुल्या दाखवीत आहेत, ती खरंतर त्यांनी उडवलेली कायद्याची खिल्लीच आहे. एका निष्पाप माणसाचा बळी घेऊनही नरुल्ला हत्याकांड प्रकरणात सलमान ज्या तर्‍हेने ‘पुराव्यांअभावी’ निर्दोष सुटला होता, तोही पैशाच्या बळावर कुणीतरी कायद्याची टर उडविण्याचा, नव्हे, व्यवस्थेतील प्रत्येक दुवा खरेदी केला जाऊ शकतो, हे निर्लज्जपणे सिद्ध करण्याचा प्रकार होता. शिक्षा जाहीर झाल्यानंतरही संजय दत्त ज्या सहजतेने कारागृहातून बाहेर निघू शकतो- पुन्हा आत जाऊ शकतो किंवा सुब्रत रॉय यांना जेलमध्ये जी पंचतारांकित सुविधा उपलब्ध होते, तीही कायदा पायदळी तुडविण्याची श्रीमंतांनी लीलया रुजवलेली माजोरी तर्‍हा आहे.
श्रीमंतांनी त्यांच्याजवळ असलेल्या पैशाच्या ताकदीवर, राजकारण्यांनी हाती असलेल्या सत्तेच्या जोरावर, खेळाडू व कलावंतांनी त्यांच्या लोकप्रियतेच्या भरवशावर कायद्याची ऐसीतैसी करणे, किमान तसे प्रयत्न करणे एकवेळ समजताही येईल. कारण कायदा आपल्यासाठी नाहीच, अशा आविर्भावात ते जगत असतात. परिणामी, नियमांचा पालापाचोळा करून तो केराच्या टोपलीत टाकण्याचा स्वभाव झालाय्‌ त्यांचा. परवा न्यायालयानं पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतरही जोधपूरच्या पोलिस ठाण्यात सलमान खान नावाचा एक लोकप्रिय कलावंत ज्या गुर्मीत वावरत होता, आपण सध्या आरोपी आहोत हे विसरून ज्या थाटात तो पोलिस अधिकार्‍यांसमोरच्या खुर्चीवर बसला होता, ते बघितल्यानंतर तो इथल्या एकूणच व्यवस्थेला किती ‘चिल्लर’ समजतो, त्या यंत्रणेला तो जराही भीक घालत नाही, हे लक्षात येते. पाच वर्षं? अरे हट्‌! बघा मी पुढच्या चार-दोन दिवसांत तुमच्या सर्वांच्या नाकावर टिच्चून कसा बाहेर पडतो ते! हे सांगणारी गुर्मीच त्याच्या एकूण वागण्यातून व्यक्त होत होती. एक, चित्रपट कलावंताचे बिरूद नावासमोरून हटवले तर कोण आहे हो सलमान? एक समान्य माणूसच ना? अन्‌ चित्रपटातली कलाकारी काय फुकट करतो का तो? की अर्थार्जनातून दानधर्म करण्यासाठीचा लौकिक आहे त्याचा, की लोकोपकारासाठी ख्याती आहे त्याची जगभर? लोकांच्या जिवावर कमावलेल्या रग्गड पैशाच्या भरवशावर अकड दाखवत फिरणारा एक मगरूर माणूस तो अन्‌ त्याचे फॅन्स तरीही फिदा होतात त्याच्यावर!
 
 
यात दोष सलमानचा नाहीच बघा! त्याचा अॅटिट्यूड तर लोकांच्या जिवावर कमावलेल्या इभ्रतीतून आला आहे. आपण कसलाही धिंगाणा घातला तरी लोक टाळ्याच पिटणार असल्याचा दुर्दम्य विश्वास त्याच्या मनात आहे. खुनाचा आरोप अंगावर असल्यामुळे न्यायासनासमोर उपस्थित राहण्यासाठी म्हणून कोर्टात आलेला असताना, आपल्या कृत्याबद्दल जराही संताप मनात नसलेल्या, उलट हात उंचावून पाठबळ देणार्‍या जनसमूहाच्या आधारे त्याला तो विश्वास मिळाला आहे. इथे दोष आहे, सलमानपुढे कायदा कवडीमोल ठरविणार्‍या त्याच्या समर्थकांचा. दोषी आहेत ते रसिक, ज्यांना एक कलावंत आणि खुनाचा आरोप असलेल्या एका बेमुर्वतखोर आरोपीत भेद करता येत नाही. दोषी ती व्यवस्था आहे, जी कायदा पायाखाली तुडवणे हा सलमानसारख्या बड्या धेंडांचा जन्मसिद्ध अधिकारच असल्याचा गैरसमज करून बसली आहे, त्यांनी नियमांची पायमल्ली करण्यात यांना काहीच वाटत नाही. उलट, केलेल्या पायमल्लीबद्दल सलमानला शिक्षा ठोठावणार्‍या न्याययंत्रणेविरुद्ध त्याचा संताप अनावर होतो... काल, काळविटाची शिकार केल्याच्या प्रकरणात शिक्षा सुनावून न्यायालयाने जणू सलमानवर प्रचंड अन्याय केला असल्याच्या थाटात काही लोकांचे जे बरळणे चालले होते, तो लवकरच बाहेर येईल असा दृढ विश्वास, जो, मूर्खांच्या नंदनवनात वावरणार्‍या काही दीड शहाण्यांकडून व्यक्त होत होता, त्यावरून अजून काय वेगळा निष्कर्ष काढायचा सांगा?
समाजातील काही लोकांना देवत्व बहाल करून मोकळे झालेल्या या समूहाचे थार्‍यावर येणे ही अशक्यप्राय कोटीतील बाब ठरते की काय, असे वाटू लागले आहे आताशा. ते तर त्या बिष्णोई समाजातील निडर साक्षीदारांचे निसर्गप्रेम तगडे आहे म्हणून, नाही तर खुनाच्या आरोपातून ‘निर्दोष’ सुटलेला सलमान, काळवीट शिकारीच्या या प्रकरणातही ‘पुराव्यांअभावी’ तसाच बाहेर पडला असता- बाइज्जत- सहीसलामत- निर्दोष...! याही वेळी पुन्हा एकदा सबब तीच सांगितली गेली असती. पुराव्यांच्या अभावाची. मग कोर्टातून दिमाखाने मिरवत सलमान बाहेर पडला असता आपल्या ‘स्वॅग’चे प्रदर्शन मांडत. त्यातही कुणालाच काही वावगं वाटलं नसतं. कारण मुळातच सर्वांना तेच अपेक्षित होतं. गुन्हा करूनही सलमान निर्दोष सुटलेला. फक्त कायदा तेवढा राहिला असता मलूल चेहर्‍यानं कोपर्‍यात पडलेला. हो ना! कायद्याचे तंतोतंत पालन करायला सलमान काय सामान्य माणूस आहे? केवढी मोठी असामी ती. तिनं काय कागदावर छापलेल्या नियमांच्या चौकटीतलं फडतूस जीवन जगायचं? छे! छे! ती चौकट असते गोरगरिबांसाठी. सलमानने तर ती धुडकावणेच अपेक्षित आहे इथल्या सर्वांना. व्यवस्थेलाही अन्‌ त्याच्या मूर्ख समर्थकांनाही. अन्यथा त्याला कारावास सुनावणार्‍या कोर्टाविरुद्ध रोष व्यक्त करायला कुणी धजावण्याचे अन्य कारण तरी गवसत नाही कुठेच.
 
 
कीस पाडत, कायद्याचा वाट्‌टेल तसा ‘वापर’ करून घेत स्वत:ची सुटका तर सलमान आताही करून घेईल. पैसा फेकला की कित्येक वकील त्यांचे कायद्याचे ज्ञान त्याच्या चरणी अर्पण करायला सिद्ध होतील. त्यातूनच त्याचे नसलेले निर्दोषत्वही तांत्रिकदृष्ट्या मान्य होईल न्यायालयाला. त्यात आश्चर्य ते नाहीच. आश्चर्य, त्याचे हे विकत घेतेले निर्दोषत्व मान्य करीत जनतेने त्याला डोक्यावर घेऊन नाचण्याचे आहे. आणि तेच दुर्दैवी आहे...
 
सुनील कुहीकर
9881717833
 
@@AUTHORINFO_V1@@