नादुरुस्त वीजमीटर महिनाभरात बदला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Apr-2018
Total Views |

महावितरणचे सीएमडी संजीव कुमार यांचे निर्देश

जळगाव :
राज्यातील सुमारे १० लाख ३७ हजार सिंगल फेजचे नादुरुस्त वीजमीटर येत्या महिन्याभरात बदलावेत व हे मीटर बदलताना त्यांची जागेवरच मीटर क्रमांकासह मोबाईल ऍपद्वारे संगणकीय प्रणालीत नोंद करण्यात यावी, असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिले आहेत. अशी माहितीही त्यांनी एका प्रसिद्धी पत्राद्वारे दिली आहे.
 
 
अचूक बिलींगसाठी विशेषत्वाने प्रयत्न सुरु आहेत. नवीन वीज जोडणीसह नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना पुरेसे नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सिंगल फेजचे आणखी ३० लाख नवीन वीजमीटर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नादुरुस्त आढळून आलेले १० लाख ३७ हजार सिंगल फेजचे वीजमीटर सर्वप्रथम एक महिन्याच्या कालावधीत बदलण्यात यावेत. त्यानंतर नादुरुस्त असलेले सिंगल फेजचे एकही वीजमीटर ग्राहकाकडे राहणार नाही याप्रमाणे कार्यवाही करावी. तसेच यापुढे ग्राहकांच्या तक्रारीनुसार किंवा महावितरणच्या पर्यवेक्षणात नादुरुस्त आढळून येणारे वीजमीटर त्वरीत बदलण्याची काळजी घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
 
 
महावितरणकडून मीटर रिडींग मोबाईल ऍपद्वारे सुरु असल्याने बिलिंग प्रणालीत पारदर्शकता आलेली आहे. गतीमानता आली आहे. परंतु मीटर रिडींग एजन्सीजकडून अद्यापही सदोष मीटर रिडींग घेण्याचे प्रकार दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांना वीजबिल दुरुस्तीचा त्रास होत आहे. मनस्ताप सहन करावा लागत आहे. सोबतच महावितरणच्या महसुलाचे सुद्धा
नुकसान होत आहे.
 
येत्या महिन्याभरात विशेष मोहीम
महावितरणच्या राज्यभरातील १६ परिमंडलात सद्यस्थितीत नादुरुस्त असल्याचे आढळून आलेल्या एकूण १० लाख ३७ हजार सिंगल फेज नादुरुस्त वीजमीटरमध्ये औरंगाबाद प्रादेशिक विभागातील १ लाख ८५ हजार, नागपूर प्रादेशिक विभाग - २ लाख, कोकण प्रादेशिक विभाग - ४ लाख ५३ हजार तसेच पुणे प्रादेशिक विभागातील १ लाख ९८ हजार मीटरचा समावेश आहे. हे सर्व नादुरुस्त वीजमीटर तातडीने बदलण्यासाठी येत्या महिन्याभरात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@