पवारसाहेब, चहावाल्यांच्या नादाला लागू नका ! : मुख्यमंत्र्यांचा रूद्रावतार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
मुंबई : भाजपच्या या महामेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले भाषण व या भाषणात त्यांनी धारण केलेला रूद्रावतार हा सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला. या भाषणात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. शरद पवार यांनी मुख्यमंत्री कार्यालयातील चहाच्या खर्चावरून केलेल्या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, पवार साहेब, आम्ही जे पितो, तेच आम्ही लोकांना पाजतो. तुमच्या पक्षाचे लोक जे पितात ते आम्ही आमच्या लोकांना पाजू शकत नाही. त्यामुळे चहावाल्यांच्या नादाला लागू नका, लागलात तर तुम्ही औषधालाही उरणार नाहीत, अशा शब्दांत फडणवीस यांनी पवारांवर सडकून टीका केली. 
 
 
 
 
आपल्या भाषणात भाजप कार्यकर्त्यांना उद्देशून मुख्यमंत्री म्हणाले की, आपण कोण आहोत हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. आपले आद्यपुरूष डॉ. शामाप्रसाद मुखर्जी आहेत, आपले महापुरूष अटलबिहारी वाजपेयी आहेत, आपले लोहपुरूष लालकृष्ण अडवाणी आहेत तर युगपुरूष नरेंद्र मोदी आहेत. ही आपली परंपरा आहे. आपल्या पक्षाला एकेकाळी भटा-बामणांचा पक्ष म्हणून हिणवलं गेलं. पण आज हा पक्ष सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. आज इथे समोर बसलेला जनसमुदाय पाहिला की 'शिवसाम्राज्य' काय असते, याचे दर्शन होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनाही यावेळी 'हिंदूहृदयसम्राट' म्हणत अभिवादन करण्यास फडणवीस विसरले नाहीत. विरोधी पक्षांवर सडकून टीका करत असतानाच, 'मी भरलेल्या वर्गाचा मॉनिटर आहे, तुमच्यासारखा रिकाम्या वर्गाचा नाही' असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांना लगावला. भाजप हा सिंहांचा पक्ष आहे, कितीही लांडगे आले तरी कोणी काहीही वाकडे करू शकणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तुम्ही महाराष्ट्राच्या तिजोरीवर 'डल्ला' मारलात, आता 'हल्लाबोल' करता आहात, जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नसल्याचे ते म्हणाले.
 
 
दीन-दलित, गोरगरीब, आदिवासींमध्ये आपल्या पक्षाविरूद्ध अपप्रचार केला जात असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. आज इथे जमलेला लाखोंच्या संख्येतील कार्यकर्ता जर जनतेत गेला तर माध्यमांनी कित्येक काहीही दाखवले तरी आपल्या पक्षाला कोणी बदनाम करू शकणार नसल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील वंचितांना घटनेने दिलेल्या आरक्षणाला समर्थन हीच आमची भूमिका असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. विरोधकांवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले की, हे लांडगे देशाला विकायलाही कमी करणार नाहीत. मात्र, ते कितीही एकत्र आले, तरी २०१९ मध्ये लाल किल्ल्यावर भाजपचाच झेंडा फडकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, कार्यकर्त्यांना उद्देशून आपल्या भाषणाच्या शेवटी ते म्हणाले की, आम्ही जे काही आहोत ते तुमच्यामुळेच आहोत. तुमच्यामुळेच ही पदे आहेत. त्यामुळे ही पदे, हे यश मी तुम्हाला समर्पित करतो, असा भावूक शेवट मुख्यमंत्र्यांनी करताच उपस्थितांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला.  
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@