आज भाजपचा 'महामेळावा'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Apr-2018
Total Views |

अमित शाह, फडणवीसांसह वरिष्ठ नेते उपस्थित राहणार
स्थापनादिनी राजधानी मुंबईत करणार शक्तीप्रदर्शन

 
 
मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या ३९ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र प्रदेश भाजपतर्फे आज 'महामेळाव्या'चे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल येथील मैदानावर होणाऱ्या या जंगी सभेला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असून सुमारे तीन लाखांहून अधिक पक्षकार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
 
गेले अनेक दिवस या महामेळाव्याची जय्यत तयारी महाराष्ट्र प्रदेश भाजपतर्फे सुरू आहे. स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनीही या बीकेसी मैदान येथे जाऊन मेळाव्याच्या तयारीची पाहणी केली आहे. भाजपच्या स्थापनादिनाचे औचित्य साधत होत असलेल्या या महामेळाव्याला आगामी २०१९ मधील निवडणुकांच्या दृष्टीनेही महत्त्व आले आहे. त्यामुळेच स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष खा. अमित शाह या मेळाव्यास उपस्थित राहून कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पियुष गोयल, सुरेश प्रभू तसेच राज्य सरकारमधील भाजपचे सर्व मंत्री व राज्यमंत्रीही यावेळी उपस्थित असणार आहेत. तसेच, राज्यातील महानगरपालिका-नगरपालिकांमधील भाजपचे नगरसेवक, महापौर, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद-पंचायत समित्यांचे सदस्य, ग्रामपंचायतींचे सरपंच, याशिवाय पक्ष संघटनेतील पदाधिकारी, किसान मोर्चा, महिला मोर्चा, अल्पसंख्यांक मोर्चा, ओबीसी मोर्चा, अनुसूचित जाती मोर्चा, अनुसूचित जनजाती मोर्चा व युवा मोर्चाचे पदाधिकारी, तसेच पक्षाचे विभागीय व जिल्हा-तालुका स्तरांवरील पदाधिकारी यावेळी एका छताखाली पहायला मिळणार आहेत. २०१४ मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर झपाट्याने वाढलेल्या पक्षसंघटनेचे विराट रूपच या महामेळाव्याच्या निमित्ताने आज मुंबईत पहायला मिळणार आहे.
 
 
 
 
  
 
 
 
राज्याच्या विविध भागामधून मुंबईमध्ये आज कार्यकर्ते येणार असून पक्षातर्फे राज्यातील विविध ठिकाणांपासून २८ रेल्वेगाडयांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. तसेच बसेस, जीप, कार इत्यादी पन्नास हजार गाड्यांनीही कार्यकर्ते येण्याचा अंदाज आहे. मुंबईत येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या व्यवस्थेसाठी मुंबई भाजप अध्यक्ष आ. अॅड. आशिष शेलार काम करत आहेत. कुर्ला, वांद्रे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मीनस या ठिकाणी स्टॉल उभारण्यात आले असून तेथून कार्यकर्त्यांना सभास्थळी ने-आण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अमित शाह यांचे काल संध्याकाळीच मुंबईत आगमन झाले आहे. आजच्या या महामेळाव्यास संबोधित केल्यानंतर अमित शाह राज्यातील पक्षाच्या आमदार-खासदारांची बैठकही घेणार आहेत.
 
 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@