डेटा चोरी प्रकरणापासून बोध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
कॅलिफोर्नियातील ‘आय. टी. संपन्न’ बे एरियात राहणारा भारतीय परिवार. चक्क मराठी. बाई स्वत: डॉक्टर आणि हा तिथल्या एका मोठ्या आय. टी. कंपनीत व्हाइस प्रेसिडेंट. घरी ही दोघं आणि यांची सोळा वर्षांची मुलगी. बस्स, इतकंच त्रिकोणी कुटुंब. साधारण वर्षभरापूर्वी हा रागारागाने शेजारच्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये भांडायला गेला. तिथल्या मॅनेजरला भेटला आणि तावातावाने सांगू लागला, ‘‘हा काय चावटपणा लावलाय्‌? माझ्या घरी रोज तुमची पत्रकं येतात. कशाची? तर प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, बेबी केअर वगैरे विषयांवरच्या उत्पादनांची. अरे, आमचा काय संबंध? कशाला आम्हाला रोज रोज त्याच विषयांवरची पत्रके पाठवून त्रास देताहात?’’
मॅनेजर अनुभवी होता. त्याने याची समजूत घातली. चुकून झालं असेल असं म्हणाला आणि ‘‘परत असली पत्रकं तुमच्या घरी येणार नाहीत,’’ असंही म्हणाला.
विषय इथेच संपायला पाहिजे होता. पण, या घटनेच्या साधारण पाच-सहा महिन्यांनी हा त्याच शेजारच्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये मॅनेजरला पुन्हा भेटायला गेला. मात्र, या वेळेस त्याच्या बोलण्यात भांडण्याची खुमखुमी नव्हती. सुदैवाने मॅनेजर तोच होता. त्याला पाच-सहा महिन्यांपूर्वीची ती घटना आठवत होती.
हा म्हणाला, ‘‘मी तुम्हाला विचारायला आलोय की तुम्हाला कसं कळलं..?’’
‘‘काय कसं कळलं?’’
‘‘हेच, की माझी मुलगी प्रेग्नंट होती?’’
मॅनेजर घाबरला. त्यावर हा म्हणाला, ‘‘मला तुमच्यावर कसलीही लीगल अॅक्शन घ्यायची नाही. मला फक्त कुतूहल आहे, तुम्ही कसं ओळखलं ते!’’
मग त्यांच्या डेटा प्रोसेसिंग युनिटच्या हेडशी याची गाठ घालून देण्यात आली. त्या हेडने याला सविस्तर समजावून सांगितलं. तो म्हणाला, ‘‘तुमची मुलगी आमच्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये नियमित येत असणार. आम्ही सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या मदतीने त्या व्यक्तीचा चेहरा कॅप्चर करतो. तो चेहरा सोशल सिक्युरिटी नंबरच्या डेटाबेसबरोबर मिळवतो. त्यातून तुमच्या मुलीची आयडेंटिटी मिळाली असेल. तिने कधीतरी क्रेडिट/डेबिट कार्डने काही विकत घेतलं असेल. त्यावरून तुमच्या मुलीची आयडेंटिटी आमच्या अल्गोरिदमने निश्चित केली असेल. मग आता ही मुलगी ज्या शेल्फपाशी रेंगाळते, वस्तू बघते, ते सर्व आमचे कॅमेरे टिपतात. मुलीने त्या वस्तू विकत घेण्याची गरज नाही. पण व्यक्ती तिथेच रेंगाळते, जिथे तिच्या आवडीच्या वस्तू असतात. तर, या सर्व गोष्टींवरून आमच्या सिस्टिममधले अल्गोरिदम्स त्या व्यक्तीची आवड-निवड शोधतात, त्या व्यक्तीच्या सोशल मीडिया अकाउंटची पडताळणी करतात. त्यांच्या आवडीला, कुतूहलाला क्रॉस-व्हेरिफाय करतात आणि सिस्टिमच त्यानुसार पत्रके तयार करून त्यावर त्या व्यक्तीचा पत्ता प्रिंट करते. तुमच्या मुलीने प्रेग्नसी, चाइल्ड केअर वगैरेसारख्या वस्तूंमध्ये कुतूहल दाखवलं असेल...’’ हा अक्षरश: अवाक्‌!
लक्षात घ्या- बापाला नाही कळलं. डॉक्टर असलेल्या, एकाच घरात राहत असलेल्या, सख्ख्या आईलाही नाही कळलं की आपली मुलगी प्रेग्नंट आहे. अन्‌ ते त्या डिपार्टमेंटल स्टोअरला कळलं! ही आहे आजच्या सोशल मीडियाची कमाल! ही कथा सध्या सोशल मीडियावर खूप फिरत आहे.
केंब्रिज अॅनालिटिकाचे डेटा चोरीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर, सोशल मीडियाच्या विरुद्ध जोरदार मोहीम उघडण्यात आली आहे. हा लेखक म्हणतो- आजचं मार्केटिंग हे सार्वत्रिक (जनरलाईज्ड) उरलेलंच नाही. ते व्यक्तिगत झालेलं आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडीनुसार त्या त्या व्यक्तीला ‘कस्टमाइज्ड’ प्रॉडक्ट देणार्‍या जाहिरातीची मोहीम हेच आजचं सत्य आहे. अशा ‘कस्टमाइज्ड’, व्यक्तिगत कॅम्पेनला लागणारा डेटा सोशल मीडिया पुरवत असतात. ज्यांना आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म’ म्हणतो, ती फेसबुक, ट्विटर, यूट्यूब निव्वळ व्यावसायिक माध्यमं आहेत. या सोशल माध्यमांना हवा असलेला पैसा मिळतो सामान्य माणसांच्या माहितीतून. मुळात डेटा गोळा करणं, डेटाचं विश्लेषण करणं, या विश्लेषणातून काही निष्कर्ष काढणं यात फारसं काही चूक नाही. आपण जेव्हा सोशल मीडियावर आपली माहिती टाकतो, तेव्हा काही प्रमाणात सोशल मीडिया आपली माहिती वापरू शकतो. पण, चूक आहे ते या माहितीच्या आधारे एखाद्याचा असणारा राजकीय कल ओळखून तो बदलण्यासाठी केलेला खोट्या, अर्धसत्य माहितीचा जबरदस्त मारा. केंब्रिज अॅनालिटिकाने नेमकं हेच केलं. ट्रम्पच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत केंब्रिज अॅनालिटिकाने या माहितीचा पुरेपूर वापर केला आणि कुंपणावर असलेल्या 20 टक्क्यांमधील काही मते ट्रम्प महाशयांच्या बाजूने वळवली. लेखकाचे म्हणणे आहे की, भारतातही तो प्रकार करण्याचा केंब्रिज अॅनालिटिकाचा प्रयत्न होता. या कंपनीशी कॉंग्रेस पक्षाने करार केला होता. परंतु, त्याआधीच सर्व प्रकरणाचा भंडाफोड झाला आणि भारत सरकारच्या कडक भूमिकेनंतर या कंपनीने माफी मागितली व त्यांच्या सीईओला नोकरीवरून काढून टाकण्यात आले.
 
 
आता सांगा, मतदाराला प्रभावित करणे, हे आपल्याकडे काही नवे आहे का! प्रत्येकच निवडणुकीत प्रत्येकच राजकीय पक्ष आणि आता तर मीडियादेखील मतदारांना प्रभावित करीतच असतात. त्यासाठी या काळात, आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली गेली, एवढाच काय तो फरक. मग एवढा अकांडतांडव कशासाठी? सोशल मीडियावर आलेल्या मजकुरामुळे अमेरिकेच्या 20 टक्के ‘कुंपणावर बसलेल्या’ मतदारांचे मतपरिवर्तन झाले म्हणतात. इतके बिनबुडाचे अमेरिकेतील सुशिक्षित, सुखसुविधासंपन्न मतदार असतील, तर ती त्यांची समस्या आहे. आमच्या भारताची नाही.
आपल्या भारतात नाही का होत हे असले? त्यामुळेच तर निवडणूक आयोगाने कितीतरी नवनवे कडक नियम तयार केले आहेत. मतदानाच्या आधी दोन दिवस जाहीर प्रचार बंद वगैरे अशा अनेक अटी आपल्या येथे आहेत. त्यामुळे मतदारांना प्रभावित करणे, हा काही मुद्दा होऊ शकत नाही. प्रश्न, मतदारांनी स्वत: प्रभावित व्हायचे की नाही हे ठरविण्याचा आहे. गेली कित्येक वर्षे, सत्तारूढ कॉंग्रेस पक्ष सर्व प्रकारची आयुधे वापरून मतदारांना प्रभावित करून निवडणुका जिंकून येतच होता ना! अशाही स्थितीत विरोधी पक्षांनी सत्तारूढ कॉंग्रेसला पराभूत केलेच. याचाच अर्थ, तुमचे तळागाळात काम असेल, मतदारांशी जिवंत संपर्क असेल, तुमची धोरणं तुम्ही मतदारांपर्यंत पोहचवू शकला, तर तुम्हाला या डेटा चोरीची, सोशल मीडियाची भीती वाटण्याचे काहीही कारण नाही. ‘सोशल मीडिया’वर जे सतत असतात, त्यांचे ‘सोशल लाईफ’ जवळपास संपल्यातच जमा असते. ते मग असले काही झाले की घाबरून जातात आणि इतरांनाही घाबरवून टाकतात.
उत्सवाचे निमंत्रण स्वत: दिल्यावर किती जण येतात आणि हेच निमंत्रण सोशल मीडियावरून दिल्यास किती येतात, याची तुलना सामाजिक कार्यकर्त्यांनी करून बघायला हवी. प्रत्यक्ष संपर्काला पर्याय नाही. रा. स्व. संघासारख्या जगात क्रमांक एकवर असलेल्या विशाल संघटनेच्या यशाचे रहस्यच मुळी ‘प्रत्यक्ष जिवंत संपर्क’ हे आहे. त्यामुळे संघ कार्यकर्त्यांनी तर सोशल मीडियाच्या या कारनाम्याने घाबरण्याचे काहीएक कारण दिसत नाही. जे अशी मेहनत करीत नाहीत, ते मग केंब्रिज अॅनालिटिकासारख्या कंपन्यांची मदत घेतात आणि जिंकण्याचा प्रयत्न करतात.
भारतातील मतदार हुशार आहेत, भारतातील लोकशाही परिपक्व झाली अशी ग्वाही फिरविण्यात येते, तर मग सोशल मीडियाच्या या प्रकारामुळे लोकशाही धोक्यात आली आहे, असे म्हणणे बरोबर आहे का?
अविकसित, अशिक्षित, गरीब त्रिपुरासारख्या राज्यात, भाजपा पूर्ण बहुमताने निवडून आली, ती काय सोशल मीडियाच्या हस्तक्षेपाने? प्रत्यक्ष जिवंत संपर्क, संपर्कातून तळापासून पक्षबांधणी आणि त्या आधारावर निवडणुकीत विजय, हे सूत्र ज्यांनी आचरणात आणले त्यांना कधीही नवनव्या तंत्रज्ञानाची भीती वाटली नाही, उलट थोडेफार साह्यच झाले. याची खूणगाठ प्रत्येक राजकीय पक्षाने आणि विशेषत: भाजपाने बांधून ठेवली पाहिजे.
@@AUTHORINFO_V1@@