"हडल केरला" मुळे नवोद्योजकांना "बूस्ट" मिळणार का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Apr-2018
Total Views |
 

 
 
कोवलम (केरळ) :  गेल्या ३-४ वर्षात भारतात स्टार्टअप्सच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्यावर्षी म्हणजेच २०१७मध्ये तांत्रिक क्षेत्रातील स्टार्टअप्समध्ये लक्षणीय वाढ झाली. नवीन १००० स्टार्टअप्सची स्थापना झाली. अशाच सर्व क्षेत्रातील स्टार्टअप्सच्या संख्येत गेल्या काही काळात वाढ झाली आहे. या सर्व नव उद्योजकांसाठी 'ह़डल केरला' हा आशिया खंडातील सगळ्यात मोठा स्टार्टअप मेळावा केरळ येथील कोवलम येथे आयोजित करण्यात आला आहे. यामुळे नवीन उद्योजकांना "बूस्ट" मिळणार का ? असे संकेत निर्माण झाले आहेत. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
केरळच्या कोवलम येथे आज मुख्यमंत्री पिनरई विजयन यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. या मेळाव्यात संपूर्ण आशिया खंडातून सुमारे २००० लोक सहभागी झाले आहेत. ६ आणि ७ एप्रिल २०१८ या दोन दिवसांमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये ३० सत्र आयोजित करण्यात आले आहेत. ज्यामध्ये सुमारे ४० मार्गदर्शक बोलणार आहेत. तसेच या मेळाव्यांतर्गत भरवण्यात आलेल्या प्रदर्शनात आशिया खंडातील १०० कंपन्या आणि संस्था सहभागी होणार आहेत.
 

काय आहे स्टार्टअप हडल :

"स्टार्टअप हडल" हा एक जागतिक स्तरावरील कार्यक्रम आहे. ज्यामध्ये उद्योजकांना, स्टार्टअप कंपन्यांना प्रशिक्षण दिले जाते, तसेच त्यांना मोठे गुंतवणूकदार आणि कंपन्या यांच्याशी जोडण्याचे काम केले जाते. या कार्यक्रमाची सुरुवात नुकतीच करण्यात आली आहे. यामध्ये दर महीन्याला नवोद्योजकांची भेट ठरते, ज्यामध्ये ठराविक स्टार्टअप कंपन्या आपला आता पर्यंतचा प्रवास आणि त्यामध्ये आलेल्या अडचणी इत्यादी मांडतात. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून शंकांचे निरसन करण्यात येते. या कार्यक्रमाची सुरुवात आफ्रीकेतील सगळ्यात मोठ्या स्टार्टअप कॅम्पस मध्ये म्हणजेच "२२ ऑन सॅलोन" येथे करण्यात आली. भारतात अशा प्रकारचा पहिलाच मेळावा आयोजित करण्यात येत आहे.


 

गेल्या काही वर्षांमध्ये अनेक स्टार्टअप्स असे आहेत, ज्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे. या कॉनक्लेव्हच्या निमित्ताने अशाच काही स्टार्टअप्सची आठवण येते.

 १. स्विगी :

आपल्याला घरी जेवण मागवायचे असेल तर सगळ्यात आधी आपण मोबाइल मधल्या ज्या अॅपचा वापर करतो ती आहे "स्विगी" संपूर्ण भारत भरात स्विगीच्या विभिन्न शाखा आहेत. तसेच ५००० हून अधिक खाद्यगृह स्विगीशी जोडल्या गेले आहेत. ४ वर्षांआधी ही कंपनी जन्माला आली. आणि या कंपनीचे निर्माते देखील तीन तरुण आहेत. राहुल जॅमिनी, श्रीहर्षा माजते आणि नंदन रेड्डी अशी या उद्योजकांची नावे आहेत. २०१७ चा "स्टार्टअप ऑफ द इयर" चा पुरस्कार देखील स्विगीनेच पटकावला आहे.




 
२. ट्रिपोटो :


 ही एक ट्रॅव्हल वेबसाइट आहे. आणि याची खास बाब म्हणजे वापरकर्त्यांच्या अनुभवांच्या आधारावर ही वेबसाइट पर्यटन स्थळांची माहिती देते. "यूजर बेस्ड वेबसाईट" असे याला म्हणता येईल. या वेबसाईटची सुरुवात २०१४ मध्ये झाली. केवळ ४ वर्षात ट्रिपोटो ने व्यावसायिक दृष्टीने मोठी मजल मारली आहे.

  

 ३. अर्बन क्लॅप :

आज शहरी आयुष्याला सोपे करण्यासाठी अनेक अॅप्स आल्या आहेत. त्यामध्ये एक महत्वाची अॅप म्हणजे अर्बन क्लॅप. अगदी ब्यूटी सर्विसेस पासून ते इतर सर्व सेवांपर्यंत अर्बन क्लॅप आपल्याला सेवा पुरवतो. आभिराज पाल, राघव चंद्रा आणि वरुण खैतान यांनी या व्यवसायाला एकत्र सुरुवात केली. केवळ ३ वर्षांआधी या व्यवसायाला सुरुवात झाली आणि आज रतन टाटा या व्यवसायातील गुंतवणूकदार आहेत. 



गुंतवणूकदार, कार्यकारी आणि प्रसारमाध्यमांशी नवोद्योजकांना संपर्क साधता यावा यासाठी या मोठ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आशिया खंडातील मोठ मोठे गुंतवणूदार आणि प्रसिद्ध कंपन्यांचा सहभाग देखील असणार आहे.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "स्टार्टअप इंडिया" आणि "मेक इन इंडिया" सारख्या योजना लागू केल्यानंतर भारतात स्टार्टअप्सना चालना मिळाली. अनेक ऊर्जावान तरुणांचे आज स्वत:चे व्यवसाय आहेत. या सर्व नव उद्योजकांना या मेळाव्यामुळे एक मोठी संधी मिळाली आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@