‘त्या’ तलावाला मिळणार संजीवनी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Apr-2018
Total Views |
 
 
 
डोंबिवली : एमआयडीसीतील मिलापनगर तलावाची अवस्था बिकट झाली आहे. एकीकडे या तलावाचे अस्तित्व जपण्यासाठी हरित लवादाने गणपती विसर्जन करण्यास बंदी घातली असली तरी येथील केमिकल कंपन्यांमुळे या तलावाची परिस्थिती दयनीय झाली असल्याची तक्रार येथील नागरिक कायमच करत असतात. मात्र, याच एमआयडीसी तलावाच्या सुशोभिकरणासाठी ५० लाखांची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आल्याने आता या तलावाला नवसंजीवनी मिळणार आहे.
 
कल्याण-डोंबिवली शहरातील बहुतांश तलावांची परिस्थिती सध्या बिकट झाली आहे. या तलावांमध्ये पूजेचे निर्माल्य व गणेशोत्सव काळात सुमारे हजारांहून अधिक मूर्त्यांचे तलावात विसर्जन होत होते. त्यामुळे बहुतांश मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असल्याने पाण्यामध्ये विरघळून त्या तलावाचे सौंदर्य नष्ट झाले आहे. तसेच जलचर जीवही नष्ट झाले आहेत. या तलावाचे २००१ मध्ये सुशोभिकरण करण्यात आले होते, पण तलावाची वेळेवर स्वच्छता केली गेली नाही. त्यामुळे आता या तलावातील पाण्यावर शेवाळ वाढल्याने सर्वत्र शेवाळ पसरले आहे.
 
अस्वच्छ पाणी, वाढलेले शेवाळ यामुळे तलावातील जीवसृष्टीला धोका निर्माण झाला आहे. याबाबत थेट राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रारी केल्यानंतर गतवर्षापासून या तलावात गणेश वा देवी विसर्जनास लवादाने मनाई केली आहे. मात्र त्यानंतरही पालिकेने या तलावाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे याविरोधात डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे राजू नलावडे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पालिकेच्या विरोधात तक्रार केली आहे. त्या तक्रारीची गंभीर दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिका आयुक्तांना पत्र पाठवून चांगलीच कानउघडणी केली होती. मात्र स्थायी समिती सभापतींनी या तलावांचे संवर्धन व सुशोभिकरणाच्या अनुषंगाने सुमारे 50 लाखांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. आता या कामाला कधी सुरुवात होते याकडे मात्र एमआयडीसी निवासी विभागाचे लक्ष लागून राहिले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@