धंदे की कुछ बात करो...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Apr-2018
Total Views |

 

 

तेलावरचे अवलंबित्व कमी करून अर्थकारणाचे अन्य आयामशोधायचे असतील तर इस्त्रायलशी दोस्ती अनिवार्य आहे, हे राजे सलमान जाणतात. धर्मवेडेपणा बाजूला ठेऊन त्यांनी टाकलेली पावले नव्या बदलाची नांदी म्हणून पाहावी लागेल.

व्ही. शांतारामयांच्या अनेक गाजलेल्या सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे नवरंग. महीपाल या अचानक सिनेसृष्टीत आणल्या गेलेल्या नटाने या सिनेमात रंग भरले होते. आपल्या काल्पनिक कवीविश्वात रमलेल्या कवीला त्याचा मित्र गाणे म्हणून वारंवार सांगतो, ‘‘धंदे की कुछ बात करो, कुछ पैसे जोडो.’’ नवरंग सिनेमातला हा प्रसंग पुन्हा आठवायचे कारण म्हणजे ‘‘इस्त्रायलला त्यांच्या भूमीवर हक्क सांगण्याचा अधिकार आहे,’’ असे विधान करणारे सौदीचे नवे राजे सलमान. सगळ्या जगाला सुखद धक्का देण्याचे काम त्यांच्या या विधानाने केले आहे. राजे सलमान आपल्या अधिकारपदावर आल्यापासून असे अनेक धक्के देत आहेत. सौदी अरेबियाला श्रीमंती नवी नसली तरी २१ व्या शतकाची आधुनिकता मात्र अत्यंत झपाट्याने फुटलेल्या जहाजात पाणी शिरावे तशी शिरत आहे. ‘सोफिया’ नावाची अरबी रोबोट महिला सध्या जगभर फिरत आहे. या रोबोट महिलेला सौदीचे नागरिकत्व बहाल केले गेल्यामुळे संपूर्ण जगात वेगळ्याच प्रकारच्या चर्चेला तोंड फुटले होते. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे जाणार्‍या नोकर्‍यांबद्दल भरपूर चर्चा होत असताना अचानक झालेले सोफियाचे आगमन अनेकांना चिंतेत टाकून गेले.

 

सौदी अरेबियातील महिलांना वाहन चालविण्याची परवानगी देऊन राजे सलमान यांनी अशीच चर्चा घडवून आणली होती. अरब राष्ट्रात लहरी राज्यकर्ते अशा अनेक सुधारणा अधूनमधून घडवून आणत असतात त्यातल्या काही चालतात तर काही फसतात देखील. मात्र इस्त्रायलच्या बाबतीत त्यांनी केलेले ताजे विधान खळबळ माजवून देणारे आहे. तेलाच्या राजकारणामुळे सौदी व इराण इस्लामी जगताचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे नेतृत्व करीत असतात. इराणचे नेतृत्व दिवसेंदिवस अधिकाधिक कट्टर होत असताना सौदीने घेतलेला हा पवित्रा इस्लामी देशांना एका अर्थाने बुचकळ्यात टाकणाराच आहे. सौदीच्या राजसत्तेचा दबदबा इतका मोठा आहे. एरव्ही उठसूठ फतवे काढणार्‍या गावगन्ना मौलवींनी अद्याप राजे सलमान यांच्या विरोधात कुठलाही फतवा काढलेला नाही. इस्लामी राष्ट्रे व इस्त्रायल यांच्यात संघर्ष होण्यासाठी मुख्य कारण म्हणजे जेरूसलेमची पवित्र भूमी. योगायोगाने किंवा अन्य कोणत्याही कारणाने जगाच्या राजकारणावर प्रभाव टाकणार्‍या तिन्ही धर्मांचे जन्मस्थान ही एकच जमीन आहे. या चौदा-पंधरा एकराच्या भूमीतच येशू ख्रिस्ताला सुळावर चढविलेली जागा, जुने चर्च, ज्यूंची पवित्र वेस्टर्न वॉल व मोहम्मद पैगंबराला जिथून देवदूत सदेह घोड्यावरून घेऊन उडून गेले ती जागा आहे. या ठिकाणी आज सोन्याचा घुमट असलेली मुस्लिमांची अल अक्सा मशीदही अस्तित्वात आहे.

 

वादाचा मुद्दा हा की, ही भूमी इस्त्रायलच्या ताब्यात आहेत. धार्मिकदृष्ट्या या जागेला मक्केइतकेच महत्त्व आहे. मात्र ही भूमी आज बिगर इस्लामी ज्यूंच्या ताब्यात आहे. इस्लामी राष्ट्रांनी ती ताब्यात घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. मात्र इस्त्रायल यातील एक इंचही जागा सोडायला तयार नाही. इस्त्रायली जनतेच्या व सरकार कुठलेही आले तरी त्यांच्या भूमीशी असलेल्या त्यांच्या निष्ठा अत्यंत कडवट व निकराच्या असतात. संपूर्ण अरब जग यामुळे इस्त्रायलला पाण्यात पाहाते. त्याचबरोबर त्याचे काहीही बिघडवू शकत नसल्याने संपूर्ण अरब जगतातच नव्हे तर इस्लामी राष्ट्रातही इस्त्रायलच्या विरोधातच भाष्य करणारी भाषणे केली जातात. भारतातल्या लहानमोठ्या मशिदींमध्येसुद्धा मुल्ला मौलवी, इस्त्रायल हा इस्लामचा शत्रू कसा आहे, हे कंठशोष करून सांगत असतात. यातले बहुसंख्य लोक इस्त्रायल किंवा जेरूसलेमला गेलेले नसतात. मात्र त्यांच्या शिकवणुकीतून जे मिळते तेच ही मंडळी पुढे सांगत राहातात. अल अक्सा मशिदीमध्ये जगभरातल्या मुसलमानांना प्रवेश नक्की मिळतो. मात्र त्या भूमीवरचा हक्क त्यांना मिळत नाही. ही सगळी पार्श्वभूमी सांगण्याचे कारण म्हणजे सारे अरब विश्व इस्त्रायलचा किती व का द्वेष करते, हे मांडणे एवढाच आहे. असे असताना अरब राष्ट्राचा मुकुटमणी असलेल्या सौदीच्या राजाने अशी विधाने करावी, हेच अनाकलनीय वाटते.

 

मात्र या सगळ्या पार्श्वभूमीला एक निराळी बाजूदेखील आहे. अरबांच्या श्रीमंतीचे व विक्षिप्तपणाचे किस्से जगजाहीर आहेत. श्रीमंतीचा शौक राजे सलमान यांना नाही, असे मुळीच नाही. ते त्याचे समर्थन करताना म्हणतात की, ‘‘मी गांधी किंवा मंडेला नाही.’’ त्यामुळे इस्त्रायलची कड घेण्याचा त्यांचा हा प्रयोग काही विश्वशांतीसाठी नाही. या सर्वच अरब राष्ट्रांमध्ये वाळवंट हा समान धागा आहे. दुसरा समान धागा आहे तेलाचा. इंधन तेलाच्या पैशातून उभे राहिलेले अरब विश्व एका अर्थाने आता चिंतेत आहे. कारण संपूर्ण जगाची वाटचाल आता पर्यायी ऊर्जास्त्रोत शोधण्याकडे सुरू झाली आहे. हे तेल किती काळ चालेल? हा प्रश्न सर्वच अरब राष्ट्रांना पडला असला तरी त्याला प्रत्यक्ष वाचा फोडण्याचे काम सलमान यांनी केले आहे. त्यांना हवे असलेले आधुनिकीकरण व शेजार्‍यांशी असलेले उत्तम संबंध चांगल्या अर्थकारणासाठी आहेत. हातात काहीही नसताना सिंगापूरची निर्मिती करून जागतिक व्यापार केंद्र म्हणून उदयास आणणार्‍या ‘ली क्वान यू’ चा कित्ता गिरविण्याचा प्रयत्न राजे सलमान करीत आहेत. आयटी, शस्त्रास्त्रे, वाळवंटातील शेती, पाण्याचे विविध प्रयोग हे सारे करून इस्त्रायलने जी समृद्धी साधली ती अचंबित करणारी आहे.

 

तेलावरचे अवलंबित्व नाकारायचे असेल तर इस्त्रायलने मळलेल्या वाटांवरच जावे लागेल. त्यासाठी सर्वात आधी इस्त्रायलचे सहकार्य लागेल. राजे सलमान यांनी चालविलेले हे प्रयत्न त्या दूरगामी वाटचालीचे प्रतीक म्हणूनच पाहावे लागेल. केवळ पैसा व त्यातून विकत घेता येणारी शस्त्रास्त्रे यामुळे जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवता येणार नाही, हे त्यांना पक्के ठाऊक आहे. सारे जगच राजकारणाच्या दृष्टीने ढवळून निघताना सौदीही त्यापासून दूर राहिलेला नाही. पुढच्या काळात यात अनेक नव्या घटना घडताना दिसल्या तर आश्चर्य वाटायला नको.

@@AUTHORINFO_V1@@