राष्ट्राय स्वाहा, इदं न मम...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Apr-2018
Total Views |





आमच्या पक्षाच्या अभ्यासवर्गात मी नेहमी एक उदाहरण देतो. मी उपस्थितांना प्रश्न विचारतो की, ‘‘कितीजण गेल्या २० वर्षांपासून पक्षाचं कामकरत आहेत?’’ त्यावर बहुतेकांचे हात वर होतात. मग मी विचारतो, ‘‘गेल्या २० वर्षांत तुम्ही कितीवेळा घोषणा दिल्या?’’ लोक म्हणतात, ‘‘आम्ही हजारोवेळा घोषणा दिल्या.’’ ‘‘मग त्या हजारो वेळांमध्ये तुम्ही कितीवेळा ‘अटलजी जिंदाबाद, अडवाणीजी जिंदाबाद, मोदीजी जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या?’’ त्यावर सर्वांचं उत्तर येतं की, ‘‘एकदाही नाही! कारण, आम्हाला केवळ आणि केवळ भारतमातेचाच जयजयकार शिकवलेला आहे. कोणाही व्यक्तीचा नाही...’’
 

मी १९९२ पासून भारतीय जनता पक्षाचं काम करतो आहे. रा. स्व. संघाचा प्रचारक म्हणून चार वर्षं काम केल्यानंतर माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरूवातच भाजपच्या प्रदेश कार्यालयापासून झाली. पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून मी कामाला सुरूवात केली. त्यावेळेस प्रमोद महाजन पक्षाचं दैनंदिन काम पाहायचे, त्यामुळे त्यांच्या सहवासात मी बराच काळ राहिलो. तो एक मंतरलेला काळ होता. कारण, अयोध्येच्या श्रीराममंदिराचं आंदोलन त्यावेळेस सुरू होतं आणि हा सर्व काळ भारतीय जनता पक्षाच्या उदयाचा होता. त्यानंतर पुढे १९९५ नंतर माझ्याकडे प्रदेश सचिव, प्रचार-प्रसिद्धी प्रमुख अशा काही जबाबदार्‍या देण्यात आल्या. २००० मध्ये मी पक्षाचा अधिकृत प्रवक्ता म्हणून नियुक्त झालो. २००३ मध्ये मी भाजप मुंबईचा सरचिटणीस झालो. त्यानंतर गेल्या पाच-सहा वर्षांत महाराष्ट्र प्रदेशाचा सरचिटणीस म्हणून मी काम करतो आहे. पदं आणि जबाबदार्‍यांच्या अनुषंगाने माझा पक्षामध्ये हा असा प्रवास झाला आहे. याच काळात राजकीय, सामाजिक आणि आर्थिक अशा विविध विषयांवर तसंच पक्षाचे विचार मांडणारं पुष्कळ लिखाणही मी केलं, अनेक पुस्तिकाही लिहिल्या. त्यामुळे पक्षाच्या सुरुवातीच्या काळापासून ते आजपर्यंतचा सगळा प्रवास मला जवळून पाहता आला.
 

 

१९९६ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी जेव्हा पंतप्रधानपदाची सर्वप्रथम शपथ घेतली तो क्षण आम्हा सर्वच कार्यकर्त्यांसाठी सर्वाधिक आनंदाचा क्षण होता. भले ते अल्पमतातील सरकार होतं. परंतु, देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून १९९६ मध्ये भाजप पुढे आला होता. पुढे १९९८ आणि १९९९ मध्येही अटलजी पंतप्रधान झाले. या सर्व काळातील पक्षाचा प्रवास हा एका परिपूर्ण राजकीय पक्षाचा प्रवास कसा असतो, याचं दर्शन घडवणारा होता. एकाच वेळेस पक्षाची वैचारिक भूमिका ठळक स्वरुपात मांडणं, राष्ट्रवादाचं जागरण करणं, दुसरीकडे आर्थिक क्षेत्रात ‘नाही रे’ वर्गाच्या उत्थानासाठीची संकल्पना मांडणं, हे या काळातील पक्षाच्या वाटचालीचं वैशिष्ट्य होतं. याला आणखी दोन पदरही आहेत. ९०च्या दशकात एकाच वेळेस वर्षानुवर्षं समाजवादाच्या जोखडात राहिलेली अर्थव्यवस्था १९९१ मध्ये मुक्त अर्थव्यवस्था झाली, ती कशा अर्थाने मुक्त अर्थव्यवस्था झाली पाहिजे, याबाबत भाजप वेळोवेळी विश्लेषण करत होता, तत्कालीन सरकारला धोक्याचा इशाराही देत होता. त्याचसोबत ९०च्या दशकात देशात राष्ट्रवादी राजकारणाचा उदय झाला. हे राष्ट्रवादी राजकारण खर्‍या अर्थाने सेक्युलर कसं असलं पाहिजे, याचा पायाही भाजपने घातला. पुढे लालू प्रसाद यादवांच्या पक्षाचं नावही ‘राष्ट्रीय जनता दल’ होतं, शरद पवारांनी पक्ष काढला, त्याचंही नाव ‘राष्ट्रवादी काँग्रेसहोतं. त्यामुळे एकेकाळी शिवी म्हणून वापरली जाणारी ‘राष्ट्रवाद’ ही संज्ञा या दशकात अभिमानाने सांगायची गोष्ट बनली होती. देश एका संक्रमणावस्थेतून जात होता. त्यामुळे या अशा ऐतिहासिक कालखंडात, एका ऐतिहासिक पक्षातील घडामोडींमध्ये मला खारीचा वाटा उचलता आला, याचा मला अत्यंत अभिमान आणि आनंद वाटतो.

 

 

राष्ट्रीय राजकारणाप्रमाणे राज्याच्या राजकारणातही पक्षाची अशीच समांतर वाटचाल सुरु होती. एकेकाळी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष हा वाळीत टाकलेला पक्षम्हणून ओळखला जायचा. १९८५ मध्ये विधानसभा निवडणुकीत पक्षाला अवघ्या १६ जागा मिळाल्या होत्या. १९८९ मध्ये प्रमोद महाजनांनी भाजप-शिवसेनेशी युती केली आणि त्यानंतर पक्षाला महाराष्ट्रात ४२ जागा मिळाल्या. १९९२ पासूनचा काळ तर एक मन्वंतराचा काळ होता. त्यातच गोपीनाथ मुंडे यांनी १९९४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या विरोधात संघर्षयात्रा काढली आणि त्यातून पुरा महाराष्ट्र ढवळून निघाला. या यात्रेची पहिली सभा ही जुन्नरला शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी झाली. त्यावेळेस मी तिथे उपस्थित होतो आणि या यात्रेच्या नियोजनातही माझा सहभाग होता. या सर्व कालखंडात जे काँग्रेसविरोधी वातावरण निर्माण झालं ते निर्माण करण्यात भाजपचा सिंहाचा वाटा होता. एव्हाना भाजप एक परिपूर्ण पक्ष बनला होता. १९९५ मध्ये युती सरकार आल्यानंतर गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी मुंबईतील गुन्हेगारीकरण मोडून काढण्यासाठी मोठे निर्णय घेतले. मंडल आयोगाची खर्‍या अर्थाने चांगली अंमलबजावणी ही भाजप सरकारच्या काळातच झाली. भटक्या-विमुक्तांना वेगळं चार टक्के आरक्षणही याच दरम्यान दिलं गेलं. याशिवाय मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबईतील उड्डाणपूल, वांद्रे-वरळी सीलिंक अशा अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचं कामनितीन गडकरींनी केलं. त्यामुळे १९९५ ते १९९९चा हा काळही पक्षाच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा भाग ठरला.

 

 

लालकृष्ण अडवाणींसारख्या एका उत्तुंग आणि चारित्र्यवान नेत्याचा मला मोठा सहवास लाभला. १९९२ मध्ये मी राजकारणात आलो, त्यावेळेस अडवाणीजी देशातील सर्वात लोकप्रिय नेते होते. इंग्रजीत अशा आशयाची एक म्हण आहे की नेत्याच्या जितकं जवळ जावं, तितका तो किती छोटा आहे हे कळू लागतं. परंतु, अडवाणींच्या सहवासात ही म्हण खोटी असल्याचं मला समजलं. जेव्हा ते लोकप्रियतेच्या शिखरावर होते, त्यावेळेसही त्यांची विनम्रता यातून संघाचे संस्कार काय असतात, याची चुणूक आम्हाला पाहायला मिळत होती. एकीकडे साधा व्यवहार आणि त्याचबरोबर अलौकिक अशी बुद्धिमत्ताही अडवाणींना लाभली आहे. ते अनेकदा मुंबईत यायचे. जेव्हा जेव्हा आम्ही त्यांचं स्वागत करायला मुंबईच्या विमानतळावर जायचो, तेव्हा त्यावेळेचं नवीन इंग्रजी पुस्तक त्यांच्या हातात असायचं. १९९६ साली रेसकोर्सवर जेव्हा भाजपचं महाअधिवेशन झालं, त्यावेळी शिवाजी पार्कच्या सभेत त्यांनी अचानकपणे अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलं. कदाचित अडवाणीच त्यावेळी पंतप्रधान झाले असते. परंतु, ‘‘अटलजी चेहरा आहेत, मी काम करतोय ते एका व्यापक हिताकरिता करतोय,’’ ही भावना असल्यानेच त्यांनी अटलजींचं नाव घोषित केलं. मी हे माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे की, खुद्द अटलजींनाही याची कल्पना नव्हती. ते स्वतः आश्चर्यचकित झाले. दुसरा प्रसंग मला आठवतो तो म्हणजे, १९९४-९५च्या दरम्यान पक्षाने देशातील काही मोजक्या ३०-४० कार्यकर्त्यांसाठी आर्थिक विषयावरील कार्यशाळा आयोजित केली होती. तत्कालीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष लालकृष्ण अडवाणीही या कार्यशाळेला उपस्थित होते. बैठकीच्या समारोपाला अटलजी आले. अर्थात, ते आल्यावर आम्ही सर्वच उठून उभे राहिलो. परंतु, स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष असतानाही अडवाणीजी उठून उभे राहिले. पक्षातील क्रमांक एकचे नेते म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष असूनही, त्यावेळी देशातील सर्वांत लोकप्रिय नेते असूनही, ते अटलजी आल्यावर उठून उभे राहिले, हा प्रसंग मी कधीच विसरू शकणार नाही. वाजपेयी-अडवाणी यांचे आपापसांतील संबंध आज सर्वच कार्यकर्त्यांसाठी अनुसरणीय आहेत. १९९४-९५च्या दरम्यान हॉटेल प्रीतम येथे अटलजींची एक पत्रकार परिषद होती. तिथे एकाने त्यांना प्रश्न विचारला की, ‘‘सर्वोत्तम पंतप्रधान कोण असू शकेल?’’ त्यासाठी त्याने नरसिंह राव आणि तत्कालीन आणखी एका मोठ्या नेत्याचं नाव पर्याय म्हणून पुढे केलं. त्यावर अटलजींनी एका क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिलं की, ‘‘अडवाणी हेच सर्वोत्तम पंतप्रधान ठरू शकतील!’’ 

 

 


प्रमोद महाजन यांच्याकडे अमोघ वक्तृत्व होतं. ते शिवाजी पार्कमध्ये जनसभेतही उत्तम भाषण करायचे आणि तितकंच चांगलं भाषण ते सीसीआय
, आयएमसीमध्ये विद्वज्जनांसमोरही करायचे. वास्तवाची यथार्थ जाणीव असलेला, अमोघ वक्तृत्व असलेला आणि कुशल संघटक असलेला नेता म्हणून मी महाजनांचं नाव घेईन. माझी ‘इंटेलेक्च्युअल ऍरोगन्सी’ त्यांनी पुष्कळदा सहन केली. मी त्यांना वाट्टेल ते प्रश्न विचारायचो, वाद घालायचो. ते नेता होते आणि मी एक कार्यकर्ता. तरीही त्यांनी नेहमीच माझ्याशी मोकळेपणाने संवाद साधला. अफाट वाचन, जबरदस्त राजकीय जाण ही त्यांची वैशिष्ट्यं होती. त्याचबरोबर जननेता काय असतो, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून आम्ही गोपीनाथ मुंडेंना पाहत होतो. राजकारणात राहून माणसांचा कंटाळा न येऊ देणं, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं. विषय समजून घेण्याचा मोठा आवाका, महाराष्ट्राची राजकीय-सामाजिक प्रश्नांची अचूक माहिती त्यांच्याकडे होती. मुंडे कधीच चिडत नसत. त्यांना कधी कंटाळा येत नसे, ते कधी थकलेले नसत. परिस्थिती कशीही असली तरी जनतेत थेट घुसणं हा त्यांचा स्वभावच होता. १९९२-९३च्या दंगलींमध्ये मी त्यांच्यासोबत फिरलो त्यावेळेस त्यांचा हा धाडसी स्वभाव मी जवळून पाहिला. त्यामुळेच ‘जनतेशी नाळ जोडलेला नेता’ असं त्यांचं वर्णन केलं गेलं. नितीन गडकरी हे एक उत्तम प्रशासक आहेत. कुठलीही गोष्ट होत नाही असं प्रशासनाने म्हणणं त्यांना मुळीच आवडत नाही. त्यामुळेच ते सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांच्या टेबलावर त्यांनी एक वाक्य लिहिलेली पाटी ठेवली होती. ‘आय लाईक द पीपल हू गेट वर्क डन!हे ते वाक्य. प्रशासनावर पकड मिळवून, प्रशासनाकडून कामं करून घेणं, विकासाबाबतची व्हिजन, कार्यकर्त्यांशी ‘मीपणा’ सोडून केलेला साधा व्यवहार, ही गडकरींची वैशिष्ट्यं आहेत. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि अशा असंख्य नेत्या-कार्यकर्त्यांच्या कष्ट, जिद्द आणि समर्पणाच्या जोरावर हा भारतीय जनता पक्ष उभा राहिला आहे.

 

 


पक्षाच्या याच उत्तुंग परंपरेचा वारसा पक्षाचं आजचं नेतृत्वही समर्थपणे चालवत आहे. अमित शाह हे आज पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. त्यांचे कष्ट हे अलौकिक आहेत. अमित शाह यांच्यामध्ये छोटे दीनदयाळच पाहायला मिळतात
, असं मी म्हणेन. कष्ट, वैचारिक स्पष्टता, साधेपणा, नेमकेपणा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ‘टास्क मास्टर’ असणं, ही अमित शाह यांची वैशिष्ट्यं आहेत. त्यांची काही लोकांना भीती वाटते. पण, ते ‘टास्क मास्टर’ आहेत आणि कामाच्या बाबतीत अत्यंत काटेकोर आहेत. असा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणं, तेही पक्ष सत्तेत असताना, हे पक्षाचं भाग्य आहे. कोल्हापूरच्या महाअधिवेशनात त्यांचा परिचय करून देताना मी म्हटलं की, ‘‘ये ऐसे राष्ट्रीय अध्यक्ष है, जो खुद चैन से बैठते नहीं, और हमें भी चैन से बैठने नहीं देते!’’ २०१४च्या निवडणुकीने देशाच्या राजकारणाचे सारे संदर्भच बदलून गेले. गेल्या साडेतीन-चार वर्षांचा कालावधी पाहिल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या नियतीला पडलेलं सुंदर स्वप्न आहे, असं मला वाटतं. त्यांच्यात चंद्रगुप्त आणि आर्य चाणक्याचा मिलाफ आहे. १३ वर्षं एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री राहिलेल्या माणसाची आई रिक्षाने मतदानाला जाते, ज्याचा एक भाऊ आजही रेशनिंगचं दुकान चालवतो, दुसरा भाऊ राज्य सरकारच्या सेवेत तृतीय श्रेणी कर्मचारी म्हणून निवृत्त होतो. त्यामुळेच संघाला अपेक्षित असलेलं भ्रष्टाचारमुक्त राजकारण, वैयक्तिक व सामाजिक चारित्र्य जपणारा असा हा नेता आहे. २००८ मध्ये ‘नरेंद्रायण’ नावाचं पुस्तक त्यांच्यावर लिहिलं गेलं, त्यावेळेस दोन वेळा एक एक तास मोदींना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मला मिळाली होती. सुरुवातीला ते त्यांच्यावर पुस्तक लिहायला परवानगीच देत नव्हते. परंतु, खूप प्रयत्न केल्यानंतर त्यांनी ती परवानगी दिली होती. आज नरेंद्र मोदींच्या हाती देश सुरक्षित आहे, यात काही शंकाच नाही. ज्या विचारांकरिता, ज्या ध्येयाकरिता १९२५ पासून या देशातील लक्षावधी लोकांनी अनन्वित त्याग केला, कष्ट भोगले, प्राणांची आहुती दिली, त्या लोकांच्या कष्टाला-त्यागाला आलेलं हे एक सुंदरसं फळ आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मी साधारण १९९७ पासून पाहतो आहे. अत्यंत प्रामाणिक आणि गतीने निर्णय घेण्याची क्षमता असलेला, दांडगा अभ्यास असलेला मुख्यमंत्री आज महाराष्ट्राला लाभलेला आहे. इतक्या मोठ्या पदावर असूनही इतरांशी कोणत्याही अहंकाराशिवाय वागणं, हे त्यांचं वैशिष्ट्य. त्यामुळेच महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत विकासाची एवढी प्रचंड कामं प्रगतीपथावर आलेली आपल्याला दिसतात. खरा संघ स्वयंसेवक जर एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री असला तर तो काय करू शकतो, त्याचं हे उदाहरण उभा देश पाहतो आहे. त्यामुळे सध्या सर्वांच्या चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे, २०१९ची निवडणूक. पण मला हा काही चर्चेचा मुद्दा वाटत नाही. माध्यमांनी त्याच्या चर्चा जरूर कराव्यात, पण २०१९ हे ‘रायटिंग ऑन द वॉल’ आहे. २०१९ मध्ये केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्ष प्रचंड बहुमताने सत्तेत येईल, हे माझं राजकीय विश्लेषण आहे. याचं कारण, दोन्हीकडे सरकार अत्यंत उत्तम काम करत आहे, ते भ्रष्टाचारमुक्त आहे, लोकांमध्येही अशीच भावना आहे की हे खरोखरच कष्ट करणारं, जनतेच्या हिताकरिता तळमळ असणारं सरकार आहे. त्यामुळे कोणी कितीही एकत्र आले, आघाड्या करण्याचा प्रयत्न केला, तरी त्याने काहीही फरक पडणार नाही.



कोणत्याही कार्यकर्त्याच्या भूमिकेमध्ये आपण का काम करायचं
, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो. भारतीय जनता पक्ष हा अन्य पक्षांपेक्षा अनेकार्थांनी वेगळा आहे. उदाहरणार्थ, शेषन यांनी नियम करण्यापूर्वीपासूनच आम्ही अंतर्गत निवडणुका घेतो आहोत. त्यांनी नियम केला नसूनही, आमच्याकडे कोणत्याही अध्यक्षाला सलग दोनच टर्म्स मिळतात. तो सलग तिसर्‍यांदा अध्यक्ष होऊच शकत नाही. इतर पक्षांमध्ये असं काहीच नसतं, आता राहुल गांधीही पुढची किमान वीसेक वर्षं अध्यक्ष राहतील (अर्थात, तोपर्यंत काँग्रेस टिकली तर!) आमच्याकडे मात्र आम्ही हा नियमच केलेला आहे. आम्ही जेव्हा ‘व्यक्तिनिरपेक्ष पक्ष’ म्हणतो तेव्हा त्यामागील कल्पना हीच असते. आमच्या पक्षाच्या अभ्यासवर्गात मी नेहमी एक उदाहरण देतो. मी उपस्थितांना प्रश्न विचारतो की, ‘‘कितीजण गेल्या २० वर्षांपासून पक्षाचं काम करत आहेत?’’ त्यावर बहुतेकांचे हात वर होतात. मी विचारतो, ‘‘गेल्या २० वर्षांत तुम्ही किती वेळा घोषणा दिल्या?’’ लोक म्हणतात, ‘‘आम्ही हजारो वेळा घोषणा दिल्या.’’ ‘‘मग त्या हजारो वेळांमध्ये तुम्ही किती वेळा ‘अटलजी जिंदाबाद, अडवाणीजी जिंदाबाद, मोदीजी जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या?’’ त्यावर सर्वांचं उत्तर येतं की, ‘‘एकदाही नाही! कारण आम्हाला केवळ आणि केवळ भारतमातेचाच जयजयकार शिकवलेला आहे. कोणत्याही व्यक्तीचा नाही.’’ हेच भारतीय जनता पक्षाचं वैशिष्ट्य आहे. जसजसा काळ बदलत जाईल, तशी भौतिक प्रगती होईल, गाड्या-घोडे वाढतील, किंबहुना ते वाढायलाच हवेत. परंतु, ती भौतिक प्रगती करत असताना हा भाव मनातून जाता कामा नये. म्हणून तर आम्ही ग्रामपंचायत स्तरापासून केंद्रीय स्तरापर्यंत सर्वांच्या अभ्यासवर्गाची योजना राबवली. जनसंघ ते भाजप असा विषय घेतला. अमित शाह यांनी आग्रह केला की, प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात पक्षाचं वाचनालय असलं पाहिजे. कारण, आपला इतिहास समजला, पूर्वज समजला, तरच आपला भविष्यकाळ हा उज्ज्वल असू शकतो. त्याच दिशेने आमची वाटचाल सुरू आहे. आमच्या पक्षाच्या कार्यालयांमध्ये प्रवेशद्वारावरच लिहिलेलं असतं की, ‘नेशन फर्स्ट, देन पार्टी ऍण्ड देन मायसेल्फ!’ हे इतर कोणता पक्ष लिहितो? त्यामुळे भाजप या पक्षाची आज सर्वत्र सत्ता आली, पक्षाची प्रगती झाली, तरी ‘नेशन फर्स्ट’ हा भाव कधीच दूर जाणार नाही, याची मला खात्री वाटते.

अतुल भातखळकर

(लेखक भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र
प्रदेश सरचिटणीस व आमदार आहेत)

(शब्दांकन : निमेश वहाळकर)

@@AUTHORINFO_V1@@