विशाखा राऊत यांची पालिका सभागृह नेतेपदी निवड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Apr-2018
Total Views |
 

 
 
 
मुंबई : मुंबई महापालिकेच्या सभागृह नेते यशवंत जाधव यांची स्थायी अध्यक्षपदासाठी निवड झाली असल्यामुळे रिक्त झालेल्या सभागृहनेतेपदी विशाखा राऊत यांची बुधवारी निवड करण्यात आली आहे.
 
याबाबतची घोषणा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पत्रकार परिषदेत केली. सभागृह नेते पदासाठी विशाखा राऊत, श्रध्दा जाधव आणि मिलिंद वैद्य या तीन माजी महापौरांच्या नावांची जोरजार चर्चेत होती. परंतु सभागृह नेतेपदाची माळ विशाखा राऊत यांच्या गळ्यात पडली आहे. दरम्यान, सभागृह नेते पदाची अधिकृत घोषणा १० एप्रिलच्या सभागृहात होईल, असे महापौर विश्वनाथ महाडेश्व यांनी सांगितले.
 
विशाखा राऊत या मुंबई महापालिकेत सर्वप्रथम १९९२ व १९९७ मध्ये दुसऱ्यांदा निवडून आल्या होत्या. यानंतर त्यांना महापौर पदाची लॉटरी लागली. त्यानंतर दादर शिवाजी पार्क विभागातून आमदार झाल्या होत्या. परंतु, मधल्या काळात राजकारणात कार्यरत नव्हत्या. सन २०१७ च्या पालिका निवडणुकीत मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी पत्नीला तिकीट दिले. देशपांडे यांच्या पत्नीचे आव्हान परतवून लावण्यासाठी शिवसेनेने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली. पक्षाचा विश्वास सार्थ करीत त्यांनी विजय खेचून आणला. त्यानंतर सिध्दीविनायक ट्रस्टवर सदस्य म्हणून वर्णी लागली. आता सभागृह नेतेपदी निवड झाली आहे.
 
सभागृह नेते पदासाठी तीन माजी महापौरांमध्ये जोरदार चुरस होती. यामधून मिलिंद वैद्य यांचे नाव कालांतराने मागे पडल्याने जाधव आणि राऊत या दोन माजी महापौरांची नावे चर्चेत आली. विशाखा राऊत यांना स्थायी समितीवर सदस्य म्हणून घेण्यात आल्याने सभागृह नेतेपदी त्यांची निवड होईल, हे जवळ जवळ निश्चित झाले होते. परंतु शिवसेनेत बऱ्याचदा धक्कातंत्र अवलंबले आहे. चर्चा असलेले नाव मागे पडून इतर नावाला पदाचा मान मिळाला होता. त्यामुळॆ सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नगरसेवकांसह सर्वानाच सभागृह नेते पदी कोणाची वर्णी लागते याबाबत उत्सुकता लागली होती. मात्र सभागृहात कोणतीही घोषणा न झाल्याने सर्वांचा भ्रमनिरास झाला. मात्र, सभागृहाचे कामकाज संपल्यावर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पत्रकार परिषद घेऊन राऊत यांची सभागृह नेतेपदी निवड केल्याची घोषणा केली. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे राऊत यांच्या नावाचे पत्र आल्याने त्यांची निवड केल्याचे महापौरांनी सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@